खामेनी यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी आक्रमण केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील ! – Iran

इराणची अमेरिका आणि इस्रायल यांना चेतावणी

तेहरान (इराण) – इराणचे माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी कोणत्याही प्रकारचे आक्रमण केल्यास त्याचे अत्यंत गंभीर आणि भयानक परिणाम होतील, अशी चेतावणी इराणने अमेरिका आणि इस्रायल यांना दिली आहे. या दोघांनी २८ फेब्रुवारीला केलेल्या आक्रमणात खामेनी यांचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले नव्हते. आता जवळपास ४ महिन्यांनी खामेनी यांच्यावर ९ जुलै या दिवशी सरकारी सन्मानात अंत्यसंस्कार होणार आहे. ४ जुलैपासून तेहरान येथून अंत्ययात्रा चालू होणार आहे. खामेनी यांचे मूळ गाव मशहद येथे त्यांचा मृतदेह पुरण्यात येणार आहे. या काळात इराणच्या शेजारील राष्ट्रांमध्ये शोकसभा आणि धार्मिक कार्यक्रम यांचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी २ कोटी लोक सहभागी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांच्या समर्थक लॉरा लुमर यांनी सामाजिक माध्यमांत म्हटले, ‘खामेनी यांच्या मृतदेहावरील अंत्यसंस्कार ही इस्रायलसाठी बाँब आक्रमण  करण्यासाठी मोठी संधी आहे.’ यानंतर इराणच्या खाताम अल-अंबिया सेंट्रल मुख्यालयाचे कमांडर अली अब्दुल्ला यांनी सरकारी माध्यमांद्वारे एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. यात त्यांनी अमेरिका आणि इस्रायल यांना चेतावणी दिली की, त्यांनी कोणतीही चुकीची पावले उचलू नयेत. आमच्या देशावर कोणतेही आक्रमण झाल्यास, आमचे सशस्त्र दल किती भीषण प्रत्युत्तर देऊ शकते, याचा त्यांनी विचार करावा.

तत्पूर्वी इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघाची यांनीही इराणच्या जनतेवर किंवा नेतृत्वावर आक्रमण करण्याचा प्रयत्न झाल्यास त्याचे तात्काळ आणि सडेतोड उत्तर दिले जाईल, असे म्हटले होते.