बेळगाव-गोवा मार्गावरील खानापूर ते अनमोडपर्यंतच्या रस्त्याच्या दुपदरीकरणाचे काम अद्याप अपूर्ण

पणजी, ३ जुलै (वार्ता.) – बेळगाव-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खानापूर ते अनमोड या ५३ किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या दुपदरीकरणाच्या कामाची अंतिम मुदत संपूनही हे काम अर्धवट स्थितीत आहे. मे २०२६ पर्यंत हे काम पूर्ण करण्याची अंतिम मुदत होती. या रस्त्यावर अनेक ठिकाणी पूल आणि संरक्षक भिंती यांचे काम अपूर्ण असून पावसामुळे रस्त्यावर खड्डे पडले आहेत. अशीच परिस्थिती राहिल्यास यंदाच्या पावसाळ्यात रामनगर-गोवा मार्ग पुन्हा वाहतुकीसाठी बंद होण्याची शक्यता आहे. गोवा आणि कर्नाटक या राज्यांना जोडणारा हा महामार्ग व्यापार, उद्योग आणि पर्यटन या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. या मार्गावरून प्रतिदिन अनेक मालवाहू ट्रक, प्रवासी बसगाड्या आणि पर्यटक प्रवास करतात; मात्र गेल्या ८ वर्षांपासून चालू असलेले हे काम पूर्ण झालेले नाही.