विधीमंडळात मंत्री अनुपस्थित : दोन्ही सभागृहांत गदारोळ !

  • विधानसभा दोनदा, तर विधान परिषद एकदा स्थगित !

  • मंत्री उदय सामंत यांची सरकारविषयीच अप्रसन्नता !  

मुंबई, ३ जुलै (वार्ता.) – विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात ३ जुलै या दिवशी मंत्री आणि शासकीय अधिकारी यांच्या अनुपस्थितीवरून विधानसभा अन् विधान परिषद येथे प्रचंड गदारोळ झाला. मुंबईच्या महत्त्वाच्या प्रस्तावावर चर्चा चालू असतांना संबंधित विभागांचे मंत्री सभागृहात उपस्थित नसल्याने विधानसभेचे कामकाज दोन वेळा, तर विधान परिषदेचे कामकाज एकदा स्थगित करावे लागले. विधान परिषदेत मंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे वरिष्ठ मंत्री उदय सामंत यांनी अप्रसन्नता व्यक्त केली.

महत्त्वाच्या प्रस्तावावर चर्चा असल्याने मुंबईत मुसळधार पाऊस असतांनाही उपनगरांतून २-२ घंटे प्रवास करून सर्व आमदार वेळेत सभागृहात पोचले होते; मात्र विधानसभेत सत्ताधारी बाकांवर संबंधित खात्याचा एकही मंत्री उपस्थित नव्हता. भाजपचे आमदार योगेश सागर आणि अतुल भातखळकर यांनी तीव्र आक्षेप घेत सभागृह स्थगित करण्याची मागणी केली. वाढता गदारोळ पाहून तालिका अध्यक्षांना प्रारंभी ५ मिनिटांसाठी आणि त्यानंतर पुन्हा १० मिनिटांसाठी विधानसभेचे कामकाज स्थगित करावे लागले.

विधान परिषदेत एका प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी विशेष बैठक बोलावली होती; मात्र तेथेही मंत्री नव्हते. उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, ‘‘उर्वरित मंत्र्यांचे काही दायित्व नाही का ? सुसूत्रता आली नाही, तर प्रतिदिन १०-१५ मिनिटे सभागृह बंद पडेल.’’

आमदार चेतन तुपे यांचा सभागृहात भाषण न करण्याचा निर्णय !

मुंबईच्या संवेदनशील सूत्रावर चर्चा चालू असतांना संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी सभागृहात उपस्थित नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चेतन तुपे यांनी आक्षेप घेत सांगितले, ‘‘चर्चा ऐकायला आणि नोंद घ्यायला अधिकारीच नसतील, तर बोलण्यात काय अर्थ आहे ?’’ या मुजोर कारभाराचा निषेध म्हणून आमदार तुपे यांनी सभागृहात भाषण न करण्याचा निर्णय घेतला.