E-Rickshaws : रस्त्यावरील ई-रिक्शा बंद पाडणारे चिनी ‘मोबाईल ॲप्स’ सरकारने हटवले !

नवी देहली – केंद्र सरकारने ‘गुगल प्ले स्टोअर’ आणि ‘ॲपल ॲप स्टोअर’ यांवरून २ चिनी ‘मोबाईल ॲप्स’ हटवण्याचा आदेश दिला आहे. या आदेशानुसार, ‘बॅट-बीएम्एस्’ आणि ‘ईपॉच लि-आयन’ हे २ ॲप्स हटवण्यात आले आहेत. या दोन्ही ॲप्सचा वापर करून रस्त्यांवर धावणार्‍या ई-रिक्शा बंद पाडल्या जात होत्या. अनेक जण या ॲप्सच्या साहाय्याने ई-रिक्शा कुठूनही नियंत्रित करत होते आणि रस्त्यावरून चालणार्‍या ई-रिक्शा अचानक थांबवत होते. यामुळे अनेक प्रकारचे धोके वाढले होते. या प्रकरणाची त्वरित नोंदघेत इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने हे दोन्ही ॲप्स हटवण्याचा आदेश दिला.

१.  ‘बॅट-बीएम्एस्’ हे ॲप ‘बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम’ नियंत्रित करण्यासाठी वापरले जाते. प्रत्येक ई-रिक्शात बसवलेल्या लिथियम-आयन बॅटरीत एक ‘ब्लूटूथ-इनेबल्ड बीएम्एस्’   यंत्रणा असते. असा दावा करण्यात आला की, ‘बॅट-बीएम्एस्’ ॲप त्या सिस्टमला ‘हॅक’ करून रिक्शा बंद करत होते.

२. या प्रकरणावर सायबरतज्ञ साक्षर दुग्गल यांनीही चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी याला सायबर सुरक्षेचा मोठा मुद्दा म्हटले आहे. ते म्हणाले की, भारत ‘ईव्ही’ (इलेक्ट्रिक व्हेईकल) क्षेत्र गेल्या २ वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहे आणि संपूर्ण जगाचे लक्ष भारतावर आहे; परंतु ‘ईव्ही’ क्षेत्र अजून नवीन आहे. जशा गोष्टी पुढे जातील, तशी आव्हानेही वाढत जातील.

३. सायबर तज्ञांच्या मतानुसार, ‘बीएम्एस्’ म्हणजेच ‘बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम’ अत्यंत स्वस्त असतात. त्यामुळे त्यांच्यात सुरक्षेचे कुठलेही कठोर निकष किंवा व्यवस्था नसते. या कारणांमुळे त्यांचे ब्लूटूथ नेहमी चालू रहातात. ई-रिक्शांमध्ये ही यंत्रणा असल्यामुळे, जर कुणाकडेही त्याचे संचालन (ॲक्सेस) पोचले आणि चालत्या रिक्शाची बॅटरी अचानक ‘बंद’ केली गेली, तर मोठी समस्या निर्माण होऊ शकते. यामुळे चालत्या ई-रिक्शाचा भीषण अपघात होऊ शकतो.