संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी नवीन चांदीचा रथ !

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यासाठी सिद्ध करण्यात येत असलेला विशेष चांदीचा रथ

आळंदी – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यासाठी यंदा वैशिष्ट्यपूर्ण रथ साकारण्यात येत आहे. आळंदीजवळील चिंबळी येथे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हा नवीन रथ सिद्ध केला जात असून यामुळे माऊलींचा पालखी सोहळा अधिक सुलभ होणार आहे. सुमारे दीड टन वजनाचा हा रथ वजनाने अत्यंत हलका असून भाविकांना दर्शनासाठी अधिक सोयीचा ठरेल, अशी माहिती देवस्थानाचे प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे यांनी दिली आहे.

यापूर्वीचा चांदीचा रथ तब्बल अडीच टन वजनाचा असल्याने तो ओढतांना बैलांना  त्रास सहन करावा लागत होता. हीच अडचण लक्षात घेऊन नव्या रथाचे वजन थेट एक टनाने न्यून करण्यात आले आहे, तसेच त्याची उंचीही काही प्रमाणात घटवण्यात आली आहे. ‘अष्टेकर ज्वेलर्स’च्या सहकार्याने चालू असलेले हे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. रथाची बॅटरी काढल्याने आणि त्यात अत्याधुनिक बेअरिंग-कपलिंगचा वापर केल्याने रथ ओढण्यासाठी सुलभ झाला आहे. सुमारे २५ लाख रुपये व्यय करून सिद्ध केलेला हा रथ भाविक स्वतः किंवा बैल अन् ट्रॅक्टरच्या साहाय्याने अगदी सहजपणे ओढू शकणार आहेत.