४ सहस्र १२१ एकर इनाम भूमी ‘श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान’च्या नावे नसल्याने यात घोटाळा नाही !

- श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचा खुलासा

श्री तुळजाभवानीदेवी मंदिर

तुळजापूर – काही प्रसारमाध्यमांनी ‘श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान’चा ४ सहस्र १२१ एकर भूमीचा घोटाळा’ अशा आशायाची वृत्ते प्रसिद्ध केली आहेत. कथित महसुली फेरफारांबाबत मंदिर संस्थानची मालकी किंवा भोगवटा नसल्याने सक्षम न्यायालयाने किंवा शासनाने संस्थान, विद्यमान विश्वस्त मंडळ अथवा प्रशासन यांना पक्षकार केलेले नाही. ४ सहस्र १२१ एकर इनाम भूमी ‘श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान’च्या नावे नसल्याने यात घोटाळा नाही, असा खुलासा प्रसिद्धीपत्रकाद्वारे श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानने केला आहे.

या पत्रकात पुढे म्हटले आहे की, यात नमूद असलेल्या ४०० एकर भूमीवर खासगी लोकांची नावे नोंदवतांना, सदरील फेरफार होत असतांना मंदिर संस्थान अथवा मंदिर प्रशासनास कोणतीही नोटीस प्राप्त झालेली नव्हती. त्याचप्रमाणे मंदिर संस्थानचे म्हणणे ऐकून घेण्यात आलेले नाही. इनाम भूमीवरील खासगी लोकांची नावे लावणे संबंधी तत्कालीन महसूल अधिकार्‍यांचे आदेश हे वर्ष १९९० च्या कालावधीतील असून बहुतांशी आदेश म्हणजे संस्थांच्या वतीने सक्षम न्यायालयात आव्हाने करण्यात येऊन त्यामध्ये श्री तुळजाभवानीदेवीच्या नावाची नोंदसुद्धा महसूल पत्रके करण्यात आलेली आहे.