क्षेपणास्त्रांना अफगाणी दरोडेखोरांची नावे दिल्यावरून पाकला पडला पेच !

  • पाकिस्तान-अफगाणिस्तान यांच्यातील संघर्षाचा असाही परिणाम

  • संरक्षणमंत्र्यांनी दिले नावे पालटण्याचे संकेत

इस्लामाबाद (पाकिस्तान) – भारताचा द्वेष करणार्‍या पाकला तसा कोणताही स्वतंत्र इतिहास नाही. त्यामुळे तो इस्लामच्या बळावर अफगाणी आणि तुर्क आक्रमकांच्या नावांचा वापर त्याच्या क्षेपणास्त्रांसाठी करत आला. उदा. घोरी, अब्दाली, गझनी आदी. तथापि आता अफगाणिस्तानसमवेतचे त्याचे संबंध चांगलेच ताणले गेले आहेत. त्यामुळे पाकिस्तानात विविध वर्तुळांमध्ये अफगाणी आक्रमकांची क्षेपणास्त्रांना दिलेल्या नावांवरून उघडपणे टीका होत असल्याचे पहायला मिळत आहे. याला पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनीही दुजोरा देत क्षेपणास्त्रांची नावे पालटण्याचे सुतोवाच दिले आहेत.

काय म्हणाले संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ ?

१. आसिफ यांनी एका मुलाखतीत खंत व्यक्त केली की, पाकने त्याच्या क्षेपणास्त्रांची नावे अफगाणी नायकांच्या नावावर ठेवली. ही नावे आता पालटली पाहिजेत; कारण यातील बहुतांश ऐतिहासिक व्यक्ती हे आक्रमक आणि लुटारू होते, ज्यांनी पाकच्या भूमीवर केवळ विनाशच केला. (नावे ठेवतांना पाकला हा इतिहास ठाऊक नव्हता का ? – संपादक)

२. मी महमूद गझनवीला नायक मानत नाही. तो चोर आणि दरोडेखोर होता. तो अफगाणिस्तानमधून यायचा, भारताला लुटायचा आणि परत निघून जायचा. आम्ही त्याला नायक बनवले, पण मी त्याला मानत नाही.

३. भारतातील सोमनाथ मंदिरावरील आक्रमणाच्या वेळी गझनवीने मुल्तानमध्ये रहाणार्‍या सहस्रो इस्मायली मुसलमानांची हत्या केली. गझनवी आणि अब्दाली यांसारख्या लोकांची क्षेपणास्त्रांना दिलेली नावे पालटण्याची वेळ आता आली आहे.

संपादकीय भूमिका

भारत आणि हिंदु धर्म यांना पाण्यात पहाणारा पाक इस्लामपूर्व जगताकडे अन् त्याच्या मूळ इतिहासाकडे कधीच जाणार नाही. त्याची मजल १ सहस्र ४०० वर्षांपर्यंतच मर्यादित आहे. त्यामुळे पाक इंडोनेशियासारख्या जगातील सर्वांत मोठ्या इस्लामी देशाप्रमाणे ‘हिंदु इतिहासाच्या पुनरुज्जीवना’चा प्रयत्न करण्याचा विचारही करणार नाही, हेच खरे !