भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे मालवण शहरातील नागरिक त्रस्त

तात्काळ उपाययोजनेसाठी महिलांनी दिले नगराध्यक्षांना पत्र

प्रतिकात्मक छायाचित्र

मालवण – शहरातील रेवतळे येथील सागरी महामार्ग, तसेच संपूर्ण परिसरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. रस्त्यावरून जाणार्‍या नागरिकांच्या अंगावर धावून जाणे, भुंकणे आणि चावण्याचा प्रयत्न करणे, अशा घटना सतत घडत आहेत. शाळेत जाणारी लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या समस्येवर तात्काळ उपाययोजना करावी अन्यथा भविष्यात भटक्या कुत्र्यांमुळे कोणतीही मनुष्यहानी किंवा पशूहानी झाल्यास त्याला प्रशासन उत्तरदायी राहील, अशी चेतावणी रेवतळे परिसरातील महिलांनी नगराध्यक्षा ममता वराडकर यांना एका पत्राद्वारे दिली आहे.

नगराध्यक्षांना निवेदन देण्यासाठी अमृता फाटक, तारका चव्हाण, मीना फाटक, वेदिका गोसावी, मेधा मुरकर, दर्शना चव्हाण, प्राजक्ता हळदणकर, स्वाती बांदेकर, मोहिनी हडकर, राखी हडकर, सीमा गावडे, दीपाली मांजरेकर, पूजा मांजरेकर आणि अपर्णा माडये आदी महिला उपस्थित होत्या.

नगराध्यक्षा वराडकर म्हणाल्या, ‘‘यापूर्वी ८०० भटक्या कुत्र्यांचे यशस्वीरित्या निर्बिजीकरण करण्यात आले आहे. आता नव्याने ४०० भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण केले जाणार आहे. आरोग्य विभागाच्या वतीने याची प्रक्रिया चालू करण्यात आली आहे.’’

संपादकीय भूमिका

भटक्या कुत्र्यांचा उपद्रवापासून नागरिकांचे रक्षण न होणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !