ज्येष्ठ रंगकर्मी विजया मेहता यांचे निधन

ज्येष्ठ रंगकर्मी विजया मेहता

मुंबई – मराठी रंगभूमीला आधुनिक आणि प्रायोगिक स्तरावर नेणार्‍या अन् जागतिक दर्जाची ओळख मिळवून देणार्‍या ज्येष्ठ दिग्दर्शिका, अभिनेत्री आणि रंगकर्मी विजया मेहता यांचे ३० जून या दिवशी रहात्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ९२ वर्षांच्या होत्या. रंगभूमी हीच कर्मभूमी मानत त्यांनी आयुष्यभर नाटकासाठी वाहून घेतले होते. १९६० मध्ये त्यांनी ‘रंगायन’ या प्रायोगिक नाट्यशाळेची स्थापना केली होती. त्या माध्यमातून त्यांनी अनेक प्रस्थापित चौकटी मोडीत काढल्या. नाट्यक्षेत्रात ‘बाई’ म्हणूनच त्या अत्यंत आदराने ओळखल्या जायच्या. अनेक मोठे कलाकार, लेखक, दिग्दर्शक त्यांच्या तालमीत घडले. विक्रम गोखले, भक्ती बर्वे, सुकन्या कुलकर्णी, नाना पाटेकर, नीना कुलकर्णी, रीमा लागू आदी अनेक दिग्गज मराठी कलाकारांची फौजच त्यांच्या शिस्तीतून घडत गेली.

‘हमिदाबाईची कोठी’, ‘वाडा चिरेबंदी’, ‘संध्याछाया’, ‘अखेरचा सवाल’, ‘बॅरिस्टर’, ‘सावित्री’, ‘पुरुष’ आदी अनेक गाजलेली नाटके त्यांनी दिग्दर्शित केली आणि त्यात कामही केले. ‘पेस्तनजी’, ‘स्मृतीचित्रे’, ‘रावसाहेब’ आदी त्यांचे मराठी चित्रपटही सर्वांच्या लक्षात राहिले. ‘मराठी रंगभूमीचा एक अनुभवसंपन्न आणि वैचारिक सुवर्णकाळ त्यांच्यासमवेत संपला’, अशीच प्रतिक्रिया रंगभूमीच्या क्षेत्रातून उमटत आहे. त्यांच्या निधनानंतर मराठी नाट्य आणि चित्रपट सृष्टीतील नामवंत कलाकारांनी दुःखद संदेश प्रसारित केले आहेत. ‘नॅशनल सेंटर फॉर द परमॉर्मिंग आर्ट्स’च्या अर्थात् ‘एन्.सी.पी.ए.’च्या संचालकपदी त्या १७ वर्षे होत्या. ‘झिम्मा : आठवणींचा गोफ’ हे त्यांचे आत्मचरित्रही त्यांच्या सुंदर जीवनप्रवासाचे वर्णन आहे. शासनाने त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित केले होते.