ग्रामपंचायत संगणक परिचालकांना नियमित मानधन ! – ग्रामविकासमंत्री


मुंबई –
राज्यात ग्रामपंचायतीमध्ये नेमलेल्या संगणक परिचालकांची नेमणूक ही ग्रामपंचायतीच्या व्यावसायिक सेवा पुरवण्यासाठी ‘ग्रामउद्योजक’ म्हणून झाली आहे. ही नेमणूक खासगी संस्थेकडून केली जाते. त्यामुळे त्यांना १० सहस्र रुपयांपेक्षा अधिक मानधन देता येत नाही. ही सेवा देतांना त्यांनी विविध दाखले देण्याच्या माध्यमातून प्रत्येक दाखल्यासाठी ठरवून दिलेली रक्कम आकारणे अपेक्षित आहे. परिचालकांची नेमणूक करणारे आस्थापन पालटल्याने त्यांचे मार्चनंतरचे वेतन थकित राहिले; मात्र यापुढील काळात राज्यातील २८ सहस्र ५०० ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत असलेल्या २० सहस्र संगणक परिचालकांना प्रत्येक महिन्याच्या १ ते ५ दिनांकामध्येच ठरलेले मानधन मिळेल, याची व्यवस्था केली जाईल, असे उत्तर राज्याचे ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी प्रश्नोत्तराच्या घंट्यात दिले. ते भाजप आमदार बननराव यादव-लोणीकर यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना बोलत होते.

या प्रश्नाच्या संदर्भात अन्य काही सदस्यांनी ‘संगणक परिचालकांना १५ सहस्र रुपये किंवा १७ सहस्र रुपये असे वाढीव मानधन मिळावे’, अशी मागणी केली. ‘राज्यातील ग्रामपंचायतींची स्थिती पहाता असे वाढीव मानधन देता येत नाही, तसेच संगणक परिचालकांनी ते देत असलेल्या अतिरिक्त सेवेतून पैसे मिळवणे अपेक्षित आहे’, असे उत्तर ग्रामविकासमंत्र्यांनी दिले.