सरस्वती नदीच्या काठावर एकेकाळी एक महान संस्कृती नांदत होती, हे समजणे ही मानवजातीसाठी एक मोठी देणगी आहे. त्या संस्कृतीतील रहिवासी हे वैदिक विद्वान आणि साधक होते, जे वैदिक मंत्रोच्चारात मग्न असत. त्यांचा वेद, मंत्र आणि सरस्वती नदीच्या पवित्र अन् चमत्कारिक जलाच्या शक्तीवर दृढ विश्वास होता.
१ जुलै या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘पाण्यामध्ये ध्वनीची स्पंदने वाहून नेण्याची क्षमता आहे, याची वैज्ञानिक बाजू, सरस्वती नदी वैदिक शब्द आणि ध्वनी कंपने धारण करते, यांमागील तात्त्विक अर्थ, सरस्वती नदी केवळ पाण्याची नसून ध्वनी, ज्ञान आणि चैतन्य असलेली नदी अन् ‘सरस्वती नदी अंतर्धान पावणे ‘, यामागचा कार्यकारणभाव’, यांविषयीची सूत्रे वाचली. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.
(उत्तरार्ध)
लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/1056650.html
लेखक : कर्नल अशोक किणी एच्. (निवृत्त), सरस्वतीदेवीचे उपासक, देहली.

१. धर्माचरणाचे पालन आणि सत्याची जोपासना करून शुद्धतेने साधना केल्यास तिथे सरस्वतीदेवी प्रकट होते !
जेव्हा साधक निष्ठेने वेदांचे पठण करतात, शुद्ध हेतूने विधी-अनुष्ठान करतात आणि धर्म अन् सत्य यांना अनुसरून जीवन जगतात, तेव्हा ते सरस्वतीदेवीला पुन्हा आवाहन करतात. तिच्या या पुनरागमनाचा अर्थ असा की, ज्ञानाचा प्रवाह पुन्हा चालू होतो, व्यक्तींमध्ये प्रज्ञा जागृत होते आणि समाजाला पुन्हा समतोल अन् स्पष्टता प्राप्त होते. सरस्वती बाहेरून येत नाही; ती चैतन्यातूनच प्रकट होते. जिथे धर्माचे (सदाचरणाचे) पालन केले जाते, सत्याची जोपासना केली जाते, नम्रता आणि शुद्धतेने ज्ञानाची साधना केली जाते, तिथे सरस्वती बहरते. अशा प्रकारे धर्म आणि सत्य हे नदीपात्रासारखे कार्य करतात, तर सरस्वती हा ज्ञानाचा प्रवाही प्रवाह आहे. अज्ञानामुळे ती दूर जाते; तर आदर, शिस्त आणि सत्य तिला पुन्हा आमंत्रित करतात. ही प्रक्रिया संस्कृतीच्या पातळीवर आणि प्रत्येक व्यक्तीच्या अंतर्मनातही घडते.
कर्नल अशोक किणी एच्. (निवृत्त) यांचा परिचय

कर्नल अशोक किणी एच्. हे निवृत्त सैन्याधिकारी आणि माता सरस्वतीचे उपासक आहेत. दैवी मातेच्या शक्तीचा आशीर्वाद आणि ‘वाक्शक्ती’ची दीक्षा लाभलेले कर्नल किणी (निवृत्त) हे आजच्या जगात सत्याला वास्तव रूप देण्यासाठी कार्यरत आहेत. ‘इन क्वेस्ट ऑफ गुरु’ (In Quest of Guru) हे पुस्तक त्यांनी त्यांचे शिष्य आनंदा मॅथ्यूज यांच्यासह लिहिले आहे. आनंदा मॅथ्यूज हे हॉलीवूडचे ‘सिनेमॅटोग्राफर’ (चलचित्रीकरण तज्ञ) असून ते सध्या गोव्यात वास्तव्यास आहेत.
२. देवीची सर्व रूपे, म्हणजे एकाच परम सत्याची अभिव्यक्ती !
‘अंबे तमे, देवी तमे, नाडी तमे, सरस्वती’ हे एक भक्तीपूर्ण उद्गार आहे, ज्यामध्ये भक्त देवी मातेला तिच्या विविध रूपांमध्ये संबोधतो. भारतीय अध्यात्मातील स्त्री शक्तीच्या (स्त्री देवतांच्या) सर्वसमावेशक आणि एकात्मिक दृष्टीकोनाचे हे प्रतिबिंब आहे.
अ. ‘अंबे तमे’ याचा अर्थ ‘तूच अंबा आहेस’, असा होतो. या संदर्भात अंबा किंवा दुर्गा ही ‘शक्ती’, म्हणजेच सामर्थ्य, संरक्षण आणि ऊर्जेचा स्रोत म्हणून पूजली जाणारी मातृदेवता आहे. असे म्हणतांना भक्त हे मान्य करतो की, देवी माता पालनपोषण, संरक्षण आणि दुःखांचे निवारण करते.
आ. ‘देवी तमे’ याचा अर्थ ‘तूच ती देवी आहेस’, असा होतो. देवी हा शब्द ‘दिव्य स्त्रीतत्त्वा’साठी वापरला जाणारा एक वैश्विक शब्द आहे. ही ती सर्वोच्च सृजनशील शक्ती आहे, जिच्यातून विश्वाची निर्मिती होते. याचा अर्थ असा की, देवीची सर्व रूपे ही एकाच परम सत्याची अभिव्यक्ती आहेत.
इ. ‘नाडी तमे’ याचा अर्थ ‘तूच तो प्रवाह किंवा ऊर्जेचा मार्ग (ऊर्जावाहिनी) आहेस’, असा होतो. ‘नाडी’ या शब्दाला योगशास्त्रात एक सखोल अर्थही आहे. योग आणि आयुर्वेद यांमध्ये नाड्या, म्हणजे शरिरातील अशा सूक्ष्म वाहिन्या ज्यांतून ‘प्राण’ नावाची जीवनशक्ती प्रवाहित होते. देवीला ‘नाडी’ संबोधणे, म्हणजे ती आपल्यातील जीवनशक्तीचा प्रवाह आहे, अस्तित्वाला आधार देणारे सूक्ष्म स्पंदन आहे आणि ती भौतिक, मानसिक अन् आध्यात्मिक अवस्थांना जोडणारा दुवा आहे. निसर्ग आणि वैश्विक गतीशी जोडणार्या नदीच्या प्रवाहाप्रमाणेही याचा अर्थ लावला जाऊ शकतो.
३. दैवी माता एक असली, तरी तिची अभिव्यक्ती अनेक रूपांतून व्यक्त होत असणे
सरस्वती ही ज्ञान, शहाणपण, वाणी (वाक्) आणि संगीत यांचे प्रतीक आहे. ‘तूच सरस्वती आहेस,’ असे म्हणून भक्त त्या देवीला विद्या, बुद्धी, पवित्र ध्वनी, वाणी आणि सर्जनशील अभिव्यक्तीचा उगम मानतो. या ओळींतून अतिशय सुंदररित्या हे स्पष्ट होते की, ती दैवी माता एकच असली, तरी तिची अनेक रूपे आहेत. शक्ती आणि संरक्षण यांचे प्रतीक असलेली दुर्गा किंवा अंबा, विश्वातील सर्जनशील शक्तीचे दर्शन घडवणारी देवी, आंतरिक ऊर्जा अन् जीवनाचा प्रवाह दर्शवणारी नाडी, तसेच ज्ञान आणि ध्वनी कंपनांच्या रूपात प्रकट होणारी सरस्वती. याचा संबंध या जाणिवेशीही जोडला जातो की, ज्याप्रमाणे पाणी कंपने वाहून नेते, त्याचप्रमाणे ‘नाडी’ आणि ‘सरस्वती’ यांच्या रूपातील ती देवी मानवी शरीर अन् निसर्ग या दोन्हींमध्ये ध्वनी, ऊर्जा आणि चेतना यांचा प्रवाह दर्शवते. सोप्या शब्दांत सांगायचे, तर भक्त असे म्हणत आहे, ‘हे माते, माझे रक्षण करणारी शक्ती, माझ्या आत संचारणारी ऊर्जा आणि मला मार्गदर्शन करणारे ज्ञान, हे तूच सर्व काही आहेस.’ हे एकत्व दर्शवणारे विधान आहे. यात दैवीतत्त्व, ऊर्जा आणि ज्ञान यांच्या सर्व रूपांकडे एक अखंड अन् पवित्र अस्तित्व म्हणून पाहिले जाते. पाणी जीवनाला आधार देते, त्यामुळे पाणी आणि स्वतःचे विचार यांच्याकडे शुद्धता, आदर अन् सकारात्मकता यांच्या भावनेने पाहिल्यास आपल्या कल्याणावर त्याचे अत्यंत प्रभावी परिणाम घडू शकतात.

४. विद्वत्तापूर्ण अभ्यास, वैदिक विधी आणि ज्ञानाचे जतन करणारा सारस्वत समाज
सारस्वत समाज (ज्याला अनेकदा ‘सारस्वत ब्राह्मण’ असेही संबोधले जाते) हा प्राचीन सरस्वती नदीच्या काठावर उगम पावला असल्याचे पारंपरिकरित्या मानले जाते. ‘डी.एन्.ए.’च्या (गुणसूत्रांच्या) अभ्यासावरून असे दिसून येते की, हा समाज स्वतःची संस्कृती आणि परंपरा समवेत घेऊन पश्चिमेकडून सरस्वती नदीच्या काठावर स्थलांतरित झाला होता. ‘सारस्वत’ या नावाचा शब्दशः अर्थ ‘सरस्वतीशी संबंधित’ असा होतो. हा समाज विद्वत्तापूर्ण अभ्यास, वैदिक विधी, ज्ञानाचे जतन, शिक्षण आणि बुद्धीमत्ता यांवर विशेष भर देण्यासाठी ओळखला जातो.
५. सारस्वत संस्कृती : ज्ञान, सत्य आणि विश्वाचे नियम यांच्या सुसंवादावर आधारित एक जीवनपद्धत !
सारस्वत संस्कृतीचा संबंध अनेकदा जगातील सर्वांत प्राचीन शहरी संस्कृतींपैकी एक असलेल्या ‘सिंधू-सरस्वती संस्कृती’शी जोडला जातो. या संस्कृतीत नियोजित शहरे, सांडपाणी व्यवस्था आणि व्यापार जाळ्यांसह प्रगत वस्त्या होत्या. त्यांच्या संस्कृतीत विधी, मंत्रोच्चार आणि मौखिक परंपरा यांद्वारे ज्ञानाचे जतन यांवर विशेष भर दिला जात असे. त्यांच्या आध्यात्मिक जीवनाचा पाया धर्म, सत्य आणि यज्ञ (बलीदान/हवन) यांवर आधारलेला होता, तर त्यांच्या प्रारंभीच्या संस्कृत परंपरांनी तात्त्विक विचारांच्या विकासात मोलाची भूमिका बजावली. इसवी सन पूर्व १९०० च्या सुमारास सरस्वती नदी आटल्यामुळे किंवा तिचा प्रवाह पालटल्यामुळे सारस्वत समुदाय पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि काश्मीर या राज्यांत, तसेच दक्षिणेकडे गोवा, कर्नाटक अन् केरळ इथपर्यंत स्थलांतरित झाले असावेत, असे मानले जाते. या स्थलांतरांमुळे गौड सारस्वत ब्राह्मण, चित्रपूर सारस्वत, कुतुच ब्राह्मण, राजस्थानी सारस्वत आणि काश्मिरी पंडित यांसारखे उपगट निर्माण झाले. जे लोक पश्चिम आणि वायव्य दिशेकडे गेले, त्यांनीही सारस्वत परंपरा, प्रथा अन् सांस्कृतिक वारसा अत्यंत निष्ठेने जपला. वैदिक ज्ञानाचे जतन आणि प्रसार, मंदिर परंपरा अन् विधींचा विकास, तत्त्वज्ञान, कला आणि शास्त्रीय संगीतातील योगदान, तसेच शिक्षण अन् बौद्धिक कार्य यांवर दिलेला विशेष भर यांद्वारे सारस्वतांनी भारतीय संस्कृतीत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. खर्या अर्थाने पाहिले, तर सारस्वत संस्कृती, म्हणजे केवळ एक समुदाय नव्हे, तर ज्ञान, सत्य आणि विश्वाचे नियम यांच्याशी (cosmic order) असलेल्या सुसंवादावर आधारित एक जीवनपद्धत आहे.
६. पृथ्वीवर शाश्वत शांतता प्रस्थापित करण्यासाठी सरस्वतीदेवीचे आवाहन करणे आवश्यक !
आजचे जग आणि मानवजात एका अंधकारमय काळातून जात आहे अन् ते सतत विकसित होणार्या या विश्वाचा निर्माता, तसेच परमचैतन्य यांना मोठ्या प्रमाणावर विसरले आहेत. ज्ञान आणि शहाणपण यांच्या माध्यमातून पृथ्वीवर शाश्वत शांतता प्रस्थापित करणार्या एका नवीन आध्यात्मिक युगाचा प्रारंभ करण्यासाठी आता पुन्हा एकदा सरस्वतीदेवीचे आवाहन करण्याची वेळ आली आहे. भारतासाठी आता जागृत होण्याची आणि उठून उभे रहाण्याची वेळ आली आहे.
(समाप्त)
ब्रिटनला आर्थिक डबघाईतून बाहेर काढणारे दूरदर्शी नेतृत्व हवे !
गौरवशाली सनातन परंपरा !
शास्त्रांनुसार पूजेमध्ये वर्जित गोष्टी
न्यायव्यवस्थेवरील टीकेपेक्षा कलाविष्काराला अधिक महत्त्व देणारा तमिळनाडू उच्च न्यायालयाचा निवाडा !
युद्धबंदी झाली; पण प्रश्न कायम !
अध्यात्मातील विविध परिभाषांचे किंवा शब्दांचे आध्यात्मिक अर्थ !