कुडाळच्या आठवडा बाजारात स्पर्धा परीक्षांच्या प्रश्नपत्रिकांचे मांडले दुकान !

उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपरोधिक आंदोलन

कुडाळ – राज्यात स्पर्धा परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर १ जुलै या दिवशी कुडाळच्या आठवडा बाजारात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने स्पर्धा परीक्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विक्रीकेंद्र उभारून उपरोधात्मक प्रश्नपत्रिका विकण्यासाठी ठेवण्यात आल्या अन् सरकारचा निषेध करण्यात आला. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली अनोख्या पद्धतीने हे आंदोलन करण्यात आले. ‘नीट’ (NEET), ‘टीईटी’ (TET) परीक्षांच्या प्रश्नपत्रिका घाऊक दरात मिळतील’, ‘मुलांचे भवितव्य विकत घ्या’, ‘शिक्षणमंत्र्यांशी संपर्क करा आणि सर्व प्रश्नपत्रिका घाऊक दरात मिळवा’, तसेच ‘मान्सून धमाका ऑफर’, असे फलक हातात घेऊन सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.

या आंदोलनात अमरसेन सावंत, संतोष शिरसाट, गुरुनाथ गडकर, अतुल बंगे, अर्चना बंगे, कृष्णा धुरी यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.