व्हेनेझुएलातून शवविच्छेदन अहवालाविना भारतात पाठवला भारतीय नाविकाचा मृतदेह !

शरिरातील अनेक अवयव गायब असल्याचा नाविकांच्या संस्थेचा दावा

भारतीय नाविक राकेश चौहान

नवी देहली – व्हेनेझुएलामध्ये भारतीय नाविक राकेश चौहान यांचा १ महिन्यापूर्वी मृत्यू झाला होता. त्यांचा मृतदेह सविस्तर माहिती आणि स्थानिक शवविच्छेदन अहवाल यांविना उत्तरप्रदेशातील त्यांच्या मूळ गावी पाठवण्यात आला. यावर नाविकांची राष्ट्रीय संस्था ‘फॉरवर्ड सीमेन्स युनियन ऑफ इंडिया’ने मृत्यूच्या परिस्थितीवर संशय व्यक्त करत भारतात पुन्हा शवविच्छेदन करण्याची मागणी केली होती.

शवविच्छेदनात काय समोर आले ?

‘फॉरवर्ड सीमेन्स युनियन ऑफ इंडिया’नुसार भारतात झालेल्या अधिकृत शवविच्छेदन अहवालात असा दावा करण्यात आला की, मृतदेहात कोणतेही मुख्य अंतर्गत अवयव अस्तित्वात नव्हते. अहवालानुसार मेंदू, हृदय, दोन्ही फुफ्फुसे, यकृत, मूत्रपिंड, प्लीहा, स्वादुपिंड, पोट, आतडे, थायरॉईड, हायॉइड, लॅरिंक्स आणि ट्रेकिया यांसह अनेक महत्त्वाचे अवयव गायब होते. यांसह शवविच्छेदनात मृत्यूपूर्वी झालेल्या कोणत्याही जखमेच्या स्पष्ट खुणा आढळल्या नाहीत. हा मृतदेह अनुमाने एक महिना ‘डीप फ्रीझर’मध्ये ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले.

व्हेनेझुएलातील भारतीय दूतावासाकडे हस्तक्षेप करण्याची मागणी !

संस्थेकडून व्हेनेझुएलाच्या अधिकार्‍यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. व्हेनेझुएलातील भारतीय दूतावासाने या प्रकरणात त्वरित हस्तक्षेप करावा, संपूर्ण शवविच्छेदन अहवाल आणि मृत्यूच्या परिस्थितीचा खुलासा करावा, तसेच पीडित कुटुंबाला न्याय अन् योग्य भरपाई मिळवून द्यावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.