गिरी येथे मुसळधार पावसात बंधारे वाहून गेल्याने शेतकरी हवालदिल

४७ कोटी रुपये खर्चून पूर नियंत्रण प्रकल्पांतर्गत बांधले होते बंधारे

प्रतिकात्मक चित्र

पणजी, १ जुलै (वार्ता.) – गिरी परिसरातील शेतकर्‍यांना पावसाळ्यात होणारा त्रास अल्प करण्यासाठी जलस्रोत खात्याने ४७ कोटी रुपये खर्च करून पूर नियंत्रण प्रकल्प उभारला होता; मात्र काही दिवसच पडलेल्या मुसळधार पावसामुळे या प्रकल्पाच्या अंतर्गत नव्याने बांधलेले बंधारे वाहून गेले आणि शेतकरी पुन्हा संकटात सापडले. सध्या शेतात पाणी साचल्याने शेतकरी हतबल झाले आहेत आणि आता पुढे काय करायचे ? असा प्रश्न शेतकर्‍यांना पडला आहे.

गिरी येथील शेतकर्‍यांचा पावसाळ्यात होणारा त्रास अल्प करण्यासाठी यंदा जलस्रोत खात्याने पुष्कळ प्रयत्न केले होते. या ठिकाणी पावसाळ्यात शेतांमध्ये अतिरिक्त पाणी साचल्याने शेतीची मोठी हानी होते. यामुळे अतिरिक्त पाणी शेतात येऊ नये, यासाठी शेतांमध्ये नियोजनबद्ध पद्धतीने बंधारे उभारण्यात आले होते. या प्रकल्पामुळे शेतात पाणी भरण्याची समस्या सुटेल, अशी शेतकर्‍यांना आशा होती; मात्र काही दिवसांच्या मुसळधार पावसानंतर प्रत्यक्ष परिस्थिती समोर येताच शेतकर्‍यांची आशा धुळीस मिळाली. या ठिकाणी महामार्गाच्या कामासंबंधीची माती आणि ढिगारे वेळीच काढले गेले नाहीत अन् नंतर साचलेला गाळ काढण्याच्या कामातही विलंब झाला. त्याचप्रमाणे पाणी वाहून जाण्यासाठी असलेल्या वाहिन्याही तुंबल्याने पाण्याचा निचरा होऊ शकला नाही. अशा अनेक त्रुटींमुळे प्रकल्पाच्या अंतर्गत उभारलेले बंधारे वाहून गेले. या प्रकल्पावर जलस्रोत खात्याने अनुमाने ४७ कोटी रुपये खर्च केल्याचे सांगितले जात आहे. प्रकल्पामुळे परिस्थिती सुधारण्याऐवजी पूर्वीची स्थिती अधिक चांगली होती, असा दावा अनेक शेतकरी करत आहेत. एवढ्या मोठ्या खर्चानंतरही प्रकल्प अपयशी का ठरला ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.