ब्रिटनला आर्थिक डबघाईतून बाहेर काढणारे दूरदर्शी नेतृत्व हवे !

‘स्टार्मर यांचे काय चुकले ?’, या दैनिक ‘सनातन प्रभात’मधील अग्रलेखात मांडलेली सूत्रे ब्रिटनच्या सध्याच्या स्थितीवर प्रकाश टाकतात. एकेकाळी जगाच्या निम्म्याहून अधिक भागावर साम्राज्य गाजवणारा ब्रिटन आज आर्थिक, सामाजिक आणि राजकीय आव्हाने यांनी वेढलेला दिसतो. विशेषतः ‘ब्रेक्झिट’नंतर ब्रिटनची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर डळमळीत झाली. व्यापार, गुंतवणूक, रोजगार आणि उद्योग क्षेत्र यांवर त्याचे विपरीत परिणाम झाले अन् आजपर्यंत ब्रिटन आर्थिक गर्तेतून बाहेर पडू शकला नाही. गेल्या दशकातील ७ पंतप्रधानांपैकी कुणालाही या समस्यांवर प्रभावी उपाययोजना करता आल्या नाहीत.

राष्ट्रीय आरोग्य सेवा, सार्वजनिक सुविधा, वाढती महागाई आणि कर्जबाजारीपणा यांमुळे नागरिकांमधील असंतोष वाढत चालला आहे. त्याच वेळी उदारमतवादी स्थलांतर धोरणांमुळे पाकिस्तान, मध्य आशिया, आफ्रिका आणि इतर भागांतून मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाले. या स्थलांतरितांमध्ये मुसलमानांची संख्याही लक्षणीय असल्याची चर्चा ब्रिटनमधील राजकारणात वारंवार होत असते. अनियंत्रित स्थलांतरामुळे सामाजिक एकात्मता, सांस्कृतिक पालट आणि कायदा-सुव्यवस्था यांविषयीच्या प्रश्नांना खतपाणी मिळाल्याचे अनेकांचे मत आहे. देशाच्या सर्वोच्च स्थानी कुठल्या मानसिकतेचे नेतृत्व बसते, यावरून पुढील वाटचाल अवलंबून असते.

मागील १० वर्षांकडे बघितल्यानंतर ब्रिटनला सर्वसमावेशक दूरदर्शी आर्थिक प्रश्नांशी दोन हात करणारे योग्य नेतृत्व न मिळाल्यामुळे ब्रिटनची वाटचाल योग्य प्रकारे होऊ शकली नाही. याउलट भारताकडे बघितल्यानंतर वर्ष २०१४ मध्ये नरेंद्र मोदींसारखे खंबीर, कणखर आणि देशाच्या आर्थिक सामाजिक प्रश्नांची योग्य जाण असलेले नेतृत्व लाभल्यामुळे आज देश उद्योग, व्यवसाय, सामाजिक समरसता, पायाभूत सुविधा, बंदरे, नवीन विमानतळ, रेल्वे, संरक्षण उत्पादने निर्यातप्रधान उद्योग, सामरिक शक्ती, तसेच देशातील युवाशक्तीला वाव दिल्यामुळे ‘मेक इन इंडिया’ (भारतात उत्पादन करणे), ‘स्टार्टअप’ योजना वाढली. परिणामी देशामध्ये सकारात्मक वातावरण सिद्ध झाले. त्यामुळे भारताने उत्तुंग भरारी घेतली आणि पुढील काही काळामध्ये भारत ‘जगातील तिसरी अर्थव्यवस्था’ म्हणून नावारूपाला येईल.

याउलट ब्रिटनमध्ये राजकीय ध्रुवीकरण वाढले असून पारंपरिक पक्षांच्या नेत्यांवरील जनतेचा विश्वास न्यून होत आहे. परिणामी जागतिक राजकारणातही ब्रिटनचे वजन पूर्वीइतके राहिलेले नाही. एकेकाळी अमेरिकेचा सर्वांत विश्वासू सहकारी मानला जाणारा ब्रिटन आज दूर गेल्याचे चित्र दिसते. त्यामुळे राष्ट्रीय हिताला प्राधान्य देणारे दूरदर्शी नेतृत्वच ब्रिटनला या संकटातून बाहेर काढू शकते.

– श्री. अनिल दत्तात्रेय साखरे, कोपरी, ठाणे (पूर्व).