साधिका रुग्णाईत असतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने तिला आनंदी रहाता येणे

‘मार्च २०२६ पासून मी तीव्र पोटदुखी आणि मणक्याचा त्रास यांमुळे रुग्णाईत आहे. त्या वेळी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेला नामजप आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचे भक्तीसत्संगातील मार्गदर्शन यांमुळे टप्प्याटप्प्याने माझ्या मनाची चांगली प्रक्रिया होऊन मला रुग्णाईत स्थितीतही आनंदी रहाता आले. त्या वेळी माझे झालेले चिंतन आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

सौ. जान्हवी विभूते

१. रुग्णाईत असतांना आरंभी मनाची स्थिती नकारात्मक होणे आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्यावर मन सकारात्मक होणे

‘आरंभी मला रुग्णाईत स्थिती स्वीकारता येत नव्हती. मला होणार्‍या तीव्र वेदनांमुळे मी काही करू शकत नसल्याने माझ्या मनाची स्थिती नकारात्मक होती. मी मला होत असलेल्या वेदना वैद्यकीय उपचार घेऊनही उणावत नव्हत्या; मात्र औषधांनी मला इतर त्रास होऊ लागले. एक दिवस मी माझ्या स्थितीविषयी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना सांगितले. त्यांनी मला नामजपादी उपाय सांगितले. त्यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्यावर माझे मन हळूहळू सकारात्मक झाले आणि मला परिस्थिती स्वीकारता येऊ लागली, तसेच माझी वेदना सहन करण्याची क्षमता वाढली. माझे मन शांत होऊन स्वतःचे चिंतन होण्यास आरंभ झाला.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

२. वर्तमानकाळात रहाता येऊन मनातील इतर विचार न्यून होणे आणि ‘देव सर्वकाही करत आहे’, याची जाणीव होणे

काही वेळा मी सेवा करतांना मला माझ्या मनात भूतकाळातील वाईट आठवणी किंवा काही प्रसंग सारखे आठवतात. कधी कधी मी त्यात रमते. मला त्यातून बाहेर पडायला पुष्कळ प्रयत्न करावे लागतात. मला कधीतरी भविष्याची चिंता असते; मात्र रुग्णाईत झाल्यापासून मला वर्तमानकाळात रहाण्याची सवय लागली. ‘मी रुग्णाईत असल्याने मी काही करू शकत नाही. ‘देव सर्वकाही करत आहे’, याची मला जाणीव झाली. माझ्या मनातील सर्व विचार न्यून झाले.

३. रुग्णाईत असतांना ‘आपला सांभाळ केवळ देवच करू शकतो आणि ‘सर्वकाही भगवंताच्या इच्छेनेच होत आहे’, ही श्रद्धा वृद्धींगत होण्यास साहाय्य होणे

रुग्णाईत असल्याने स्वतःला काही करता येत नाही. दुसर्‍याच्या साहाय्याने सर्व करावे लागते. त्यामध्ये अपेक्षा असली, तर दुःख होते, उदा. ‘यजमानांनी मला हे का दिले ? ते का दिले नाही ?’, असे होते; मात्र ‘सर्वकाही भगवंताच्या इच्छेनेच होत आहे’, अशी श्रद्धा ठेवली, तर अपेक्षा न्यून होऊन कृतज्ञताभाव वाढतो. ‘आपला सांभाळ केवळ देवच करू शकतो, त्याच्याविना आपले कोणी नाही’, ही श्रद्धा वृद्धींगत होण्यास साहाय्य होते.

४. रुग्णाईत असतांना आलेल्या अनुभूती

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

४ अ. ‘भाव, चैतन्य, प्रीती, शांती आणि क्षात्रभाव’ यांची स्पंदने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या छायाचित्रात आहेत’, असे जाणवणे : २४.१.२०२६ या दिवशी मला थोडे बरे वाटल्यावर मी ध्यानमंदिरात बसून नामजपादी उपाय करत होते. तेव्हा मला ‘प.पू. चंद्रशेखरानंदजी महाराज यांच्या छायाचित्रात निळा रंग, प.पू. अनंतानंद साईश यांच्या छायाचित्रात लाल रंग, प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्रात पिवळा रंग, प.पू. रामानंद महाराज यांच्या छायाचित्रात गुलाबी रंग, तर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या छायाचित्रात सर्वच रंग आहेत’, असे मला जाणवले. ‘भाव, चैतन्य, प्रीती, शांती आणि क्षात्रभाव यांची स्पंदने सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या छायाचित्रात आहेत’, असे मला जाणवले.

४ आ. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांशी सूक्ष्मातून बोलत असतांना दिसलेले दृश्य : माझ्या शरिराला वेदना होत असतांना माझे लक्ष नामजपात लागत नव्हते; म्हणून मी सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांशी सूक्ष्मातून बोलत होते. त्या वेळी मला सूक्ष्मातून दिसले, ‘विष्णुलोकात विष्णु जसा शेषनागावर पहुडलेला असतो, तसे सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर शेषनागावर पहुडले आहेत.’ तेथे सर्वत्र सोनेरी प्रकाश दिसत होता. तेथे अनेक देवता होत्या. तेथील वातावरणातही सगळीकडे सोनेरी प्रकाशच दिसत होता.

४ इ. नामजप करत असतांना डोळे उघडे किंवा बंद असतांनाही कृष्णतत्त्वाचा निळा रंग, पिवळा रंग आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले दिसणे अन् मन एकाग्र होणे : एकदा मी रुग्णाईत असतांना नामजप करत होते. तेव्हा माझ्या डोळ्यांसमोर मध्येच कृष्णतत्त्वाचा निळा रंग दिसायचा. मध्येच माझ्या डोळ्यांसमोर पिवळा रंग आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर दिसतात. मी नामजप करत असतांना डोळे उघडे आणि बंद असतांनाही हे रंग दिसतात अन् माझे मन एकाग्र होते.

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने रुग्णाईत स्थितीतही मला आनंदी रहाता आले आणि त्यातून मला पुष्कळ शिकायला मिळाले’, त्याबद्दल मी गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

– सौ. जान्हवी अभिजीत विभूते, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.६.२०२६)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक