६० टक्के किंवा त्याहून अधिक आध्यात्मिक पातळी असलेल्या जिवाच्या मृत्यूनंतर एखादा सात्त्विक प्राणी किंवा पक्षी याच्या माध्यमातून देवतातत्त्व मृत जिवाला आशीर्वाद द्यायला आलेले असणे

‘सात्त्विक जिवाच्या मृत्यूच्या क्षणी सात्त्विक प्राणी किंवा पक्षी दिसणे’, हा त्या जिवाचा पुढच्या लोकात जाण्याविषयीचा संकेत असल्याचे साधकाला जाणवणे

श्री. शंकर नरुटे

९.१.२०२६ या दिवशी श्रीमती प्रभावती शिंदे (सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या आई, आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ९० वर्षे) यांचे निधन झाले. त्यानंतर १३.१.२०२६ या दिवशी सुश्री विजया चव्हाण (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ९० वर्षे) यांचे निधन झाले. या दोन्ही प्रसंगांच्या वेळी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमाच्या परिसरात नदीच्या बाजूकडून मुंगूस येऊन गेले. हिंदु धर्मात ‘मुंगूस दिसणे’, हे शुभ मानले जाते. ‘सात्त्विक जिवांच्या शेवटच्या क्षणी परिसरात सात्त्विक प्राणी किंवा पक्षी दिसणे’, हा त्या जिवाचा पुढच्या लोकात जाण्याविषयीचा संकेत असतो’, असे मला वाटले. त्यामुळे या संदर्भातील माझ्या मनातील प्रश्न मी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना विचारला. – श्री. शंकर राजाराम नरुटे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ४१ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१९.१.२०२६)

६० टक्के किंवा त्याहून अधिक आध्यात्मिक पातळी असलेल्या जिवाच्या मृत्यूनंतर निर्माण झालेल्या तेथील सात्त्विक वातावरणाकडे आकर्षित होऊन एखादा सात्त्विक प्राणी किंवा पक्षी त्या परिसरात येत असणे

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

प्रश्न : ६० टक्के किंवा त्याहून अधिक आध्यात्मिक पातळी असलेल्या साधकांचा मृत्यू झाल्यावर त्यांना नेण्यासाठी देवदूत येतात. त्यामुळे अशा साधकांच्या मृत्यूच्या समयी देवतांचे वाहन असणारे पक्षी अथवा प्राणी दिसतात का ? – श्री. शंकर नरुटे

उत्तर : ‘६० टक्के किंवा त्याहून अधिक आध्यात्मिक पातळी असलेल्या जिवाच्या मृत्यूनंतर त्याच्या देहाकडून चैतन्य प्रक्षेपित होत असते. त्यामुळे तेथील वातावरण हलके आणि सात्त्विक झालेले असते. त्या सात्त्विक वातावरणाकडे आकर्षित होऊन एखादा सात्त्विक पक्षी किंवा प्राणी त्या परिसरात येतो आणि आपल्याला दर्शन देतो. खरेतर त्या माध्यमातून मृत जिवाला आशीर्वाद द्यायला देवतातत्त्व तेथे आलेले असते, उदा. मुंगुसाच्या माध्यमातून देवीतत्त्व येते. ६० टक्के किंवा त्याहून अधिक आध्यात्मिक पातळी असलेला जीव मृत्यूनंतर महर्लाेकासारख्या उच्चलोकात जातो. त्यामुळे त्याच्या लिंगदेहाला चांगली गती मिळालेली असते.’

– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ (रसायनशास्त्रामधील पीएच्.डी., मुंबई विद्यापीठ), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.

(२०.३.२०२६)