श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या दैवी वाणीतून भक्तीसत्संगात स्रवलेले अमृतकण !
‘साधनेच्या प्रवासात ‘स्वतःला स्वीकारणे’ ही एक अत्यंत महत्त्वाची पायरी आहे. साधनेतील खरा अडथळा हा देहापेक्षाही सूक्ष्म असलेल्या ‘मना’चा असतो. जोपर्यंत आपण स्वतःची मानसिक स्थिती, आपले स्वभावदोष आणि विचारांचे स्वरूप स्वीकारत नाही, तोपर्यंत खर्या अर्थाने ‘अंतर्मुखता’ साध्य होऊ शकणार नाही. आज आपण ‘स्वतःची मानसिक स्थिती स्वीकारणे’, हे सूत्र आध्यात्मिक दृष्टीकोनातून जाणून घेऊया.

१. स्वतःची मानसिक स्थिती स्वीकारणे म्हणजे काय ?
सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी शिकवलेली साधना ही अंतःकरणाच्या शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे. अंतःकरणाचे शुद्धीकरण होण्यासाठी आरंभी अंतर्मनाला पूर्णपणे जाणून घेणे आवश्यक आहे. मन हे अत्यंत चंचल आणि अनंत विचारांचे उगमस्थान आहे. जोपर्यंत आपण आपल्या मनाची वर्तमान स्थिती, मग ती अस्वस्थ असो वा शांत, प्रसन्न असो वा दुःखी, प्रामाणिकपणे स्वीकारत नाही, तोपर्यंत आंतरिक शांततेचा मार्ग प्रशस्त होत नाही.
अनेकदा साधकांना वाटते, ‘मनात केवळ चांगले विचार येणे, म्हणजे चांगली मानसिक स्थिती !’; परंतु साधनेत ‘मन स्वीकारणे’, म्हणजे आपल्या मनात येणारे चांगले आणि वाईट, सकारात्मक अन् नकारात्मक, दोषविरहित आणि दोषयुक्त, असे सर्व विचार लक्षात घेणे. स्वतःमध्ये पालट घडवून आणण्यासाठी या दोन्ही वृत्तींचे तटस्थ राहून किंवा त्रयस्थपणे निरीक्षण करणे आवश्यक असते. ‘स्वतःची मानसिक स्थिती स्वीकारणे म्हणजे काय ?’, हे पुढील सूत्रांवरून लक्षात येईल.
अ. स्वतःमध्ये असलेले स्वभावदोष आणि अहं यांचे पैलू, तसेच नकारात्मक विचार यांचा द्वेष न करता ‘सध्या माझ्या मनाची स्थिती अशी आहे’, हे वास्तव प्रामाणिकपणे स्वीकारणे.
आ. स्वतःच्या मानसिक स्थितीचा स्वीकार करणे, म्हणजे स्वतःच्या दोषांचे समर्थन करणे नव्हे, तर स्वतःच्या मानसिक स्वरूपाचे तटस्थपणे निरीक्षण करणे होय.
इ. स्वतःची मानसिक स्थिती स्वीकारणे, म्हणजे स्वतःला गृहीत धरणे नव्हे, तर स्वतःमधील उणिवांची जाणीव ठेवणे आणि ईश्वरावर श्रद्धा ठेवून त्या उणिवा, त्रुटी घालवण्याचा प्रयत्न करणे होय.
जेव्हा आपण ‘मी जसा आहे, तसा श्री गुरूंच्या चरणी समर्पित आहे’, असा भाव ठेवतो, तेव्हा श्री गुरूंच्या कृपेने आपले मन निर्मळ होते.
२. स्वतःच्या मनाची स्थिती स्वीकारता न येण्याची काही लक्षणे
अ. स्वतःचा स्वभाव अथवा स्वभावात असलेले दोष स्वीकारता न येणे
आ. स्वतःतील दोषांमुळे होणार्या चुका किंवा मनात येणारे अयोग्य विचार स्वीकारता न येणे आणि त्याविषयी न्यूनगंड वाटणे
इ. काही वेळा मनात नकारात्मक किंवा अन्य विचार आल्यास ‘माझ्या मनात अशा प्रकारचे विचार कसे काय येऊ शकतात ?’, असे वाटणे
ई. अनेकदा आपण बाहेरून शांत दिसतो; पण आपल्या मनात विचारांचे काहूर माजलेले असते. आपण आपले स्वभावदोष, उदा. राग, भीती, तुलना किंवा मनाची अस्थिरता आणि नकारात्मकता नाकारण्याचा किंवा दडपण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे आपण त्यांना अजाणतेपणे अधिक ऊर्जा प्रदान करतो. त्यांना खतपाणी घालतो.
३. स्वतःच्या मनाला स्वीकारता येण्यासाठी ठेवायचे काही दृष्टीकोन !
३ अ. ‘दोषांसह स्वतःचा स्वीकार करणे’, हीच मानसिक शांततेची पहिली पायरी आहे ! : साधना करतांना साधकांना अनेक आंतरिक संघर्षांना सामोरे जावे लागते. साधकाच्या मनात येणारे नकारात्मक विचार, राग, मत्सर किंवा भीती, हे त्या साधकाचे खरे स्वरूप नव्हे. या सर्व वृत्ती म्हणजे केवळ चित्तरूपी आकाशात उमटणारे आणि विरणारे तात्पुरते ढग आहेत. जेव्हा साधक मनातील विचारांचा प्रांजळपणे स्वीकार करतो, तेव्हाच त्याच्या मनाचा संघर्ष थांबतो आणि मन शांत होते; म्हणूनच साधकांनी स्वतःचे स्वभावदोष, तसेच मनातील विचार दडपण्यापेक्षा किंवा नाकारण्यापेक्षा ते प्रांजळपणे स्वीकारावेत आणि ते दोष दूर करण्यासाठी प्रयत्नरत रहावे.
३ आ. मन स्वच्छ आणि शुद्ध करण्यासाठी निरंतर प्रयत्नरत रहावे ! : जसे जलाशयाच्या पाण्यावर गाळ आल्याने त्याचे अस्तित्व संपत नाही किंवा काळ्या ढगांमुळे आकाशाचे अस्तित्व नाकारता येत नाही, तसेच तात्पुरत्या नकारात्मक विचारांमुळे आपल्या आत्म्याचे चैतन्य न्यून होत नाही. क्रोध, भीती, मत्सर आणि नैराश्य ही आपली ओळख नसून ती मनावर आलेली तात्पुरती आवरणे आहेत. गढूळ पाणी स्थिर झाल्यावर स्वच्छ होते, तसेच स्वतःचे स्वभावदोष स्वीकारल्याने मन शांत होते. मन स्वच्छ आणि शुद्ध करण्यासाठी निरंतर प्रयत्नरत रहावे. त्यासाठी मनातील विचार स्वीकारून आत्म्याचे चैतन्य अविरत अनुभवावे.
३ इ. संघर्षाकडून स्वीकृतीकडे वाटचाल, म्हणजे आध्यात्मिक शरणागती ! : आपल्या मनात अनेक भावना, तसेच दोष आहेत; म्हणून स्वतःचा तिरस्कार केल्याने मन अधिक अशांत होते आणि अहंकार बळावतो, तर ते प्रांजळपणे स्वीकारल्याने नकारात्मकता न्यून होऊन अहंकाराचा पडदा बाजूला होतो. त्यामुळे साधकांनी आपल्या मनाला संघर्षाकडून स्वीकृतीकडे, म्हणजे स्वतःला स्वीकारण्याच्या स्थितीकडे नेऊन भगवद्चरणी शरणागत व्हावे.
३ ई. ‘स्वतःचे दोष स्वीकारणे’, हा परिवर्तनाचा आरंभ आहे ! : स्वतःला पूर्णपणे स्वीकारणे, म्हणजे दोषांसह जगणे नव्हे, तर दोषांची जाणीव होऊन स्वतःला पालटण्यासाठी मनापासून प्रयत्न करणे होय. जेव्हा आपण स्वतःचे दोष स्वीकारतो, तेव्हाच चित्तशुद्धीची आणि परिवर्तनाची खरी प्रक्रिया चालू होते. त्यामुळे यापुढे स्वतःचे दोष, तसेच उणिवा स्वीकारण्यासह ते दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याचाही निश्चय करा !
‘स्वतःचे मन स्वीकारणे’ हा आत्मविकासाचा आरंभ आहे. आपले मन परिपूर्ण नसते. त्यात काही उणिवा नक्कीच असतात; पण ज्या क्षणी आपण स्वतःचे मन पूर्णपणे स्वीकारतो, त्या क्षणी मनातील आत्मद्वेषाची (स्वतःविषयीच्या द्वेषाची) काळरात्र संपते आणि गुरुकृपेच्या प्रकाशाने आत्मस्वीकृतीचा एक नवा सुवर्णदिन चालू होतो !’
– श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी) (१८.६.२०२६)
शास्त्रांनुसार पूजेमध्ये वर्जित गोष्टी
अध्यात्मातील विविध परिभाषांचे किंवा शब्दांचे आध्यात्मिक अर्थ !
साधिका रुग्णाईत असतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने तिला आनंदी रहाता येणे
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे अनमोल विचारधन !
६० टक्के किंवा त्याहून अधिक आध्यात्मिक पातळी असलेल्या जिवाच्या मृत्यूनंतर एखादा सात्त्विक प्राणी किंवा पक्षी याच्या माध्यमातून देवतातत्त्व मृत जिवाला आशीर्वाद द्यायला आलेले असणे
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !