वैदिक सरस्वती नदी आणि तिचे दैवी स्वरूप !

पाण्यामध्ये स्मरणशक्ती असते आणि ते ध्वनी, संकल्प अन् भावना यांसारखी स्पंदने ‘साठवून’ ठेवू शकते. याचा संबंध वेद परंपरेतील आध्यात्मिक संकल्पनांशी घनिष्ठपणे जोडलेला आहे. तेथे ‘मंत्र’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या ध्वनीकडे एक शक्तीशाली स्पंदन म्हणून पाहिले जाते, तर पाण्याला ऊर्जेचे वाहक आणि शुद्धीकरण करणारे माध्यम मानले जाते. सरस्वती नदीच्या काठावर एकेकाळी एक महान संस्कृती नांदत होती, हे समजणे ही मानवजातीसाठी एक मोठी देणगी आहे. त्या संस्कृतीतील रहिवासी हे वैदिक विद्वान आणि साधक होते, जे वैदिक मंत्रोच्चारांत मग्न असत. त्यांचा वेद, मंत्र आणि सरस्वती नदीच्या पवित्र अन् चमत्कारिक जलाच्या शक्तीवर दृढ विश्वास होता.

(पूर्वार्ध)

लेखक : कर्नल अशोक किणी एच्. (निवृत्त), सरस्वतीदेवीचे उपासक, देहली.

सरस्वती नदीचे संग्रहित छायाचित्र

१. मासारू एमोटो यांनी केलेल्या प्रयोगातून पाणी मानवी विचार, शब्द आणि भावना यांना प्रतिसाद देत असल्याचे सिद्ध

वैदिक विज्ञान आणि सरस्वती नदीचा प्रवाह यांचा परस्परसंबंध समजून घेण्यासाठी आपण ‘मासारू एमोटो’ (Masaru Emoto) यांच्या ‘द हिडन मेसेजेस इन वॉटर’ (The Hidden Messages in Water) या पाण्याविषयीच्या सुंदर पुस्तकातील एका आधुनिक उदाहरणाचा विचार करू शकतो.

मासारू एमोटो त्यांच्या पुस्तकासह

या पुस्तकात लेखकाने असे स्पष्ट केले आहे, ‘पाणी मानवी विचार, शब्द आणि भावना यांना प्रतिसाद देते.’ एमोटो यांनी काही प्रयोग केले, ज्यामध्ये त्यांनी पाण्याला ‘प्रेम’ आणि ‘कृतज्ञता’ यांसारखे सकारात्मक शब्द, तसेच नकारात्मक शब्द अन् कठोर भावना, तसेच संगीत, प्रार्थना आणि उच्चारलेले संकल्प यांचा स्पर्श होऊ दिला. त्यानंतर त्यांनी ते पाणी गोठवले आणि त्यातून सिद्ध झालेल्या स्फटिकांची छायाचित्रे घेतली. त्या छायाचित्रांवरून असे दिसून आले की, सकारात्मक प्रभावांमुळे सुंदर आणि सममितीय (symmetrical) स्फटिक सिद्ध होतात, तर नकारात्मक प्रभावांमुळे विद्रूप किंवा अपूर्ण आकृत्या निर्माण होतात.

The HIDDEN MESSAGES in WATER Audiobook | Book …

२. पाण्यामध्ये ध्वनीची स्पंदने वाहून नेण्याची क्षमता आहे, याची वैज्ञानिक बाजू

‘पाण्यामध्ये ध्वनीची स्पंदने वाहून नेण्याची क्षमता असते’, या कल्पनेला वैज्ञानिक आणि दार्शनिक अशा दोन्ही बाजू आहेत. जेव्हा आपण वैदिक काळातील सरस्वती नदीच्या संदर्भात या संकल्पनेचा विचार करतो, तेव्हा तिला एक सखोल प्रतिकात्मक आणि आध्यात्मिक स्वरूप प्राप्त होते. वैज्ञानिक दृष्टीकोनातून पहाता ध्वनी हा ऊर्जेचा एक प्रकार आहे, जो माध्यमामध्ये कंपने निर्माण करून प्रवास करतो. हवा हे विरळ माध्यम आहे, तर पाणी हे अधिक घन आणि एकसंध (cohesive) माध्यम असल्याने त्यातून ध्वनीचे वहन अधिक कार्यक्षमतेने होते. जेव्हा ध्वनीलहरी पाण्यातून प्रवास करतात, तेव्हा त्या पाण्याच्या पृष्ठभागावर लहरी आणि कंपनांचे असे नमुने निर्माण करतात, जे पुष्कळ दूरवर जाऊ शकतात. म्हणूनच महासागरांमधील जलचर प्राण्यांमध्ये पाण्याद्वारे होणारा संवाद अत्यंत प्रभावी ठरतो. थोडक्यात सांगायचे, तर पाण्यामध्ये ध्वनीची कंपने प्रत्यक्षपणे वाहून नेण्याची क्षमता असते.

कर्नल अशोक किणी एच्. (निवृत्त) यांचा परिचय

कर्नल अशोक किणी एच्.

कर्नल अशोक किणी एच्. हे निवृत्त सैन्याधिकारी आणि माता सरस्वतीचे उपासक आहेत. दैवी मातेच्या शक्तीचा आशीर्वाद आणि ‘वाक्‌शक्ती’ची दीक्षा लाभलेले कर्नल किणी (निवृत्त) हे आजच्या जगात सत्याला वास्तव रूप देण्यासाठी कार्यरत आहेत.

‘इन क्वेस्ट ऑफ गुरु’ (In Quest of Guru) हे पुस्तक त्यांनी त्यांचे शिष्य आनंदा मॅथ्यूज यांच्यासह लिहिले आहे. आनंदा मॅथ्यूज हे हॉलीवूडचे ‘सिनेमॅटोग्राफर’ (चलचित्रीकरण तज्ञ) असून ते सध्या गोव्यात वास्तव्यास आहेत.

३. सरस्वती ही केवळ भौतिक नदी नसून  ज्ञान, वाणी आणि प्रज्ञा यांचे प्रतीक !

वैदिक विचारसरणीत जलाच्या या भौतिक गुणधर्माला एका सूक्ष्म आध्यात्मिक तत्त्वाचे स्वरूप दिले गेले आहे. प्राचीन ऋषींचा असा विश्वास होता की, शब्द हे केवळ एक यांत्रिक कंपन नसून ती सृष्टीची एक मूलभूत शक्ती आहे. नादब्रह्म ही संकल्पना, म्हणजेच नादाच्या स्वरूपातील विश्व या विचाराचे प्रतिबिंब दर्शवते की, संपूर्ण अस्तित्वाची निर्मिती ही आदिम कंपनांपासून झाली आहे. ‘ओम’ किंवा ‘औम’ हा पवित्र ध्वनी सर्व प्रकारच्या ध्वनींचे आणि सृष्टीचे मूळ मानला जातो. या दृष्टीकोनात सरस्वती नदीला एक अद्वितीय स्थान आहे; ती केवळ एक भौतिक नदी नसून एक पूजनीय देवी आणि ज्ञान, वाणी अन् प्रज्ञा यांचे प्रतीक मानली जाते.

४. सरस्वती नदी वैदिक शब्द आणि ध्वनी कंपने धारण करते, यांमागील तात्त्विक अर्थ

वेदांमध्ये सरस्वतीचे वर्णन ‘प्रवाहित होणारी (नदी)’ असे केले आहे, जी भूमी आणि बुद्धी या दोघांचेही पोषण करते. ‘ऋग्वेदा’तील सूक्तांमध्ये सरस्वतीची स्तुती अनेकदा वाणीची (संस्कृतमध्ये वाक्) प्रेरणा देणारी आणि दैवी ज्ञानाची वाहक म्हणून केली जाते. जेव्हा सरस्वती नदी वैदिक शब्द आणि ध्वनी कंपने धारण करते, असे म्हटले जाते, तेव्हा त्यामागे एक सखोल तात्त्विक अर्थ दडलेला असतो. वैदिक ऋषींनी या नदीच्या काठावर अनेक सूक्तांची रचना केली होती आणि नदीचा प्रवाह हे पवित्र ज्ञानाच्या अखंड प्रवाहाचे प्रतीक बनले. ज्याप्रमाणे पाणी वहाते आणि जीवनाला आधार देते, त्याचप्रमाणे ध्वनी विशेषतः पवित्र मंत्र पिढ्यान्‌पिढ्या प्रवाहित राहून ज्ञान जतन करतो. शुद्धता आणि प्रसारण यांच्यात एक प्रतिकात्मक संबंध आहे. पाण्याकडे शुद्ध करणारे घटक म्हणून पाहिले जाते आणि धार्मिक विधींमध्ये जागा अन् वस्तू पवित्र करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे वैदिक मंत्रोच्चारांमुळे मन आणि पर्यावरण शुद्ध होते, अशी धारणा आहे. सरस्वती नदी या स्पंदनांचे वहन करते, ही संकल्पना असे सुचवते की, एकदा उच्चारलेला पवित्र ध्वनी हा विश्वाच्या प्रवाहाचा एक भाग बनतो. तो निसर्गाद्वारेच आत्मसात करण्यासह जतन केला जातो आणि प्रसारितही केला जातो.

‘सरस्वती नदी अंतर्धान पावणे’, यामागचा कार्यकारणभाव

सरस्वती नदी

जेव्हा वैदिक ज्ञानाभोवती अज्ञानाचा अंधकार पसरतो, तेव्हा सरस्वती अंतर्धान पावते; मात्र जेव्हा वैदिक मंत्रोच्चार आणि विधय यांद्वारे तिची पुन्हा उपासना अन् आवाहन केले जाते आणि जिथे धर्म अन् सत्य हेच ज्ञानसाधकांसाठी आधारभूत असतात, तेव्हा ती पुन्हा प्रकट होते. त्यामुळे जेव्हा आपण सरस्वतीच्या अंतर्धान पावण्याविषयी बोलतो, तेव्हा तो केवळ एखादी नदी आटण्याचा विषय नसतो, तर ते समाजातील सत्य, ज्ञान आणि शहाणपण यांच्या र्‍हासाचे प्रतीक असते. जेव्हा ‘अविद्या’ (अज्ञान) पसरते, तेव्हा लोक सत्य आणि धर्म यांपासून दूर जातात, ज्ञान विकृत होते किंवा विस्मृतीत जाते अन् पवित्र ध्वनी स्वतःची शुद्धता आणि मूळ उद्देश गमावून बसतो. अशा स्थितीत शुद्ध ज्ञानाचा प्रवाह असलेली सरस्वती स्वतःला मागे घेते. ही माघार, म्हणजे विचारांमधील स्पष्टता अल्प होणे, आध्यात्मिक जाणीव क्षीण होणे आणि उच्च चेतनेपासून तुटले जाणे होय. पारंपरिक समजूतीनुसार सरस्वती नदी अदृश्य झाली (संस्कृतमध्ये जिला ‘गुप्तगामिनी’ म्हटले जाते); कारण ती भूमीखालून वाहू लागली. प्रतिकात्मक अर्थाने याचा अर्थ असा की, ज्ञानाच्या बाह्य पवित्र परंपरा कमकुवत होतात आणि त्याच वेळी आंतरिक बुद्धीवर आवरण येते किंवा ती मलीन होते. सरस्वतीचे अदृश्य होणे, म्हणजे ज्ञान आता सहज उपलब्ध, दृश्य किंवा महत्त्वपूर्ण राहिलेले नाही.

– कर्नल अशोक किणी एच्. (निवृत्त)

५. वैदिक मंत्रांच्या स्पंदनांचा विचार, भावना आणि पर्यावरण यांवरील प्रभाव

आध्यात्मिक अर्थाने नदी ही चैतन्याच्या प्रवाहाचे प्रतीक मानली जाते. वैदिक मंत्रांची स्पंदने केवळ ऐकू येणार्‍या ध्वनीपुरती मर्यादित नसतात, ती सूक्ष्म ऊर्जा मानली जातात; जी विचार, भावना आणि पर्यावरण यांवरही प्रभाव पाडतात. ऋषिमुनींनी निसर्गाकडे, म्हणजेच नद्या, वारा आणि अवकाश यांच्याकडे या वैश्विक स्पंदनांमधील (किंवा वैश्विक अनुनादातील) सहभागी घटक म्हणून पाहिले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Raju Pushola (@rajupushola)

६. सरस्वती नदी केवळ पाण्याची नसून ध्वनी, ज्ञान आणि चैतन्य असलेली नदी !

पाण्यामध्ये कंपने वाहून नेण्याची क्षमता असते आणि सरस्वती नदी वैदिक ध्वनींचे वहन करते, या समजूतीकडे ३ स्तरांवरून पाहिले जाऊ शकते. भौतिकदृष्ट्या पाणी ध्वनीचे प्रभावीपणे वहन करते; सांस्कृतिकदृष्ट्या ही नदी वैदिक ज्ञान आणि मंत्रोच्चार यांचे उगमस्थान होती अन् आध्यात्मिकदृष्ट्या ती ज्ञान अन् वैश्विक कंपने यांच्या अखंड प्रवाहाचे प्रतीक आहे. थोडक्यात सांगायचे, तर सरस्वती ही केवळ पाण्याची नसून ती ध्वनी, ज्ञान आणि चैतन्य यांची नदी आहे, जिथे वेदांची कंपने अखंडपणे प्रवाहित होऊन बाह्य जग अन् अंतरात्मा या दोघांचेही पोषण करतात.

लेखक : कर्नल अशोक किणी एच्. (निवृत्त), सरस्वतीदेवीचे उपासक, देहली.