आळंदी (जिल्हा पुणे) बसस्थानकातील फलाटांच्या नावाच्या पाट्या गायब

पिण्याच्या पाण्यासह अन्य सुविधांची वानवा !

श्री. अजय केळकर, प्रतिनिधी, दैनिक ‘सनातन प्रभात’, कोल्हापूर

नावांच्या पाट्या नसलेले आणि केवळ वर छत असलेले उघडे फलाट

आळंदी (जिल्हा पुणे) – ८ जुलैला आळंदी येथून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे; मात्र वारकर्‍यांसाठी ज्या प्राथमिक सुविधा गावात असणे अपेक्षित आहेत, त्या सुविधा मात्र आळंदी गावात दिसत नाहीत. राज्य परिवहन महामंडळाच्या ज्या बसगाड्या आळंदी येथून पुणे शहर, देहू यांसह अनेक ठिकाणी जातात, त्यांच्या फलाटांच्या नावाच्या पाट्याच तेथे नसल्याची दयनीय स्थिती आढळून आली.

श्री. अजय केळकर

स्थानकावर पिण्याचे पाणी नाही, तसेच स्थानकात महिलांसाठी ‘हिरकणी’ कक्षाची व्यवस्था नाही, असे दिसून आले. आळंदी हे तीर्थक्षेत्र असून राज्यातून अनेक भाविक आणि वारकरी येथे येतात. त्यामुळे फलाटांवर नावाच्या पाट्या असणे अत्यावश्यक आहे; मात्र त्या दिसल्या नाहीत. येथे अनेक बसगाड्या या फलाटाजवळ न लावता त्याच्या समोरच्या बाजूला लावलेल्या आढळून आल्या. यामुळेही अनेक भाविक आणि वारकरी यांची गैरसोय होते.

‘देहूगाव’ ही एकच पाटी आळंदी येथील फलाटावर आहे

याखेरीज फलाटांना केवळ वरूनच पत्र्याचे छत आहे. डावीकडे, किंवा पाठीमागच्या बाजूला कोणत्याही प्रकारचा पत्रा अथवा वारा, पाऊस यांपासून रक्षण होण्यासाठी कशाचीच व्यवस्था नाही.  यामुळे जोराचा पाऊस आल्यास फलाटावर उभे असूनही वारकरी भाविक भिजतात, अशी स्थिती आहे. हडपसर आणि अन्य ठिकाणी जाण्यासाठी येथूनच थोड्या अंतरावरून गाड्या सुटतात. तेथेही अशीच स्थिती आढळली. ‘पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड’ (पी.एम्.पी.एम्.एल्.) आणि स्थानिक प्रशासन यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी भाविक अन् वारकरी यांनी केली आहे.