सोलापूर येथील अनधिकृत चर्च आणि महापालिका सेवकाची गैरकृत्ये यांची चौकशी होणार !

  • हिंदु जनजागृती समिती आणि हिंदु राष्ट्र सेना यांच्या पाठपुराव्याला यश

  • सोलापूर महापालिका आयुक्तांच्या पाठोपाठ राज्य सरकारही कृतीच्या पावित्र्यात

विधी व न्याय राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांना निवेदन सादर करतांना हिंदु जनजागृती समितीचे पदाधिकारी

सोलापूर, ३० जून (वार्ता.) – शहरातील बापूजीनगर येथील शासकीय समाजमंदिराचा बेकायदेशीरपणे ‘चर्च’ म्हणून वापर करणे, परिसरात धार्मिक तेढ निर्माण करणे आणि हिंदु आरक्षणाचा गैरवापर करून शासकीय नोकरी लाटणार्‍या सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील लिपिक दत्तात्रय कानेपागूल उपाख्य येहान मार्क कानेपागूल याच्या कथित गैरकृत्यांची सखोल चौकशी करण्याचा आदेश सोलापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिला आहे. या संदर्भात आयुक्तांनी सामान्य प्रशासन विभागाच्या उपायुक्त श्रीमती सोनाली यादव यांना त्वरित अहवाल सादर करण्याचा लेखी आदेश दिला आहे.

या प्रकरणाविषयी हिंदु राष्ट्र सेना आणि हिंदु जनजागृती समिती यांनी पाठपुरावा केला होता. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन सोलापूरचे माजी मंत्री आणि भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांनी सोलापूर महानगरपालिका आयुक्तांकडे या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याची मागणी केली होती. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्याचे विधी व न्याय राज्यमंत्री श्री. आशिष जयस्वाल यांनी या प्रकरणात थेट हस्तक्षेप करत सोलापूरच्या जिल्हाधिकार्‍यांना संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून तात्काळ अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे. महानगरपालिका आयुक्त आणि राज्यमंत्री या दोघांनीही एकाच वेळी चौकशीचे चक्र फिरवल्यामुळे आता या प्रकरणाची सर्व अंगाने चौकशी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शासकीय वास्तूवर थेट अतिक्रमण

सोलापूर महानगरपालिकेने शासकीय समाजमंदिर केवळ सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रमांसाठी भाडेतत्त्वावर दिले होते. या कराराची मुदत संपलेली आहे, तसेच मूळ कराराच्या अनेक अटी धाब्यावर बसवून या सार्वजनिक वास्तूला बेकायदेशीरपणे ‘चर्च’चे स्वरूप देणे हे थेट ‘कायदेशीर अतिक्रमण’ ठरते. परिसरातील लोकांना ध्वनीक्षेपकाच्या मोठ्या आवाजामुळे त्रास देणे, गरीब हिंदूंचे धर्मांतर करणे, धार्मिक भावना दुखावणारी वक्तव्य करणे आदी अनेक गैरकृत्ये तेथे होत असल्याच्या तक्रारी आहेत.

महापालिका सेवक कानेपागूल याने ‘हिंदु मोची’ समाजाच्या आरक्षणाचा लाभ घेऊन शासकीय नोकरी मिळवली; मात्र सद्य:स्थितीत त्याने ख्रिस्ती धर्म स्वीकारला असून तो ‘जिजस गॉस्पेल सोसायटी’चा मुख्य ‘पास्टर’ (धर्मप्रचारक) म्हणून काम पहात आहे. शासकीय सेवेत राहून दुहेरी लाभ घेणे, हा शासनाची फसवणूक करणारा गंभीर गुन्हा आहे.

राष्ट्रपुरुषांच्या जयंतीला मज्जाव

या सार्वजनिक समाजमंदिरात स्थानिक नागरिकांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि जांबमुनी महाराज यांची जयंती साजरी करण्यास मज्जाव केला जातो. त्याचप्रमाणे ध्वनीक्षेपक लावून हिंदूंच्या देवतांविषयी अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्ये करून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा पद्धतशीर प्रयत्न चालू आहे.

हिंदु जनजागृती समितीच्या प्रमुख मागण्या

‘जिजस गॉस्पल सोसायटी’चा महानगरपालिकेच्या सोबतचा भाडेकरार रहित करून त्याला त्वरित टाळे ठोकावे आणि सार्वजनिक वापरासाठी खुली करावी, अशी प्रमुख मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे. ‘महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९’चा भंग केल्याप्रकरणी महापालिकासेवक कानेपागूल याला सेवेतून तात्काळ बडतर्फ करण्यात यावे. यासोबतच अनुसूचित जातीच्या आरक्षणाचा गैरवापर केल्याप्रकरणी त्याच्या जात प्रमाणपत्राची फेरचौकशी करून शासनाची फसवणूक केल्याविषयी त्याच्यावर कठोर फौजदारी गुन्हे नोंद करण्यात यावेत. (अशा मागण्या का कराव्या लागतात ? प्रशासनाने स्वत:हून कारवाई करणे आवश्यक आहे. – संपादक)

‘‘प्रशासन आणि विधी व न्याय राज्यमंत्री यांनी दिलेल्या चौकशीच्या आदेशांचे आम्ही स्वागत करतो. आता प्रशासनाने कोणतीही दिरंगाई न करता पुढील १५ दिवसांत संबंधित अनधिकृत चर्चची वास्तू ‘सील’ करावी आणि दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी; अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल’’, अशी स्पष्ट चेतावणी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी दिली आहे.