इयत्ता ६ वीच्या इतिहास आणि नागरिकशास्त्राच्या पाठ्यपुस्तकात कोकणातील कातळशिल्पे !

रत्नागिरी – सहस्रो वर्षांपूर्वीच्या मानवी जीवनाचे साक्षीदार असलेला कोकणातील कातळशिल्परूपी अमूल्य वारसा आता विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा भाग होणार आहे. इयत्ता सहावीच्या इतिहास आणि नागरिकशास्त्र या विषयाच्या पाठ्यपुस्तकात कातळशिल्पांच्या माहितीचा समावेश झाल्याने विद्यार्थ्यांना या सांस्कृतिक ठेव्याचा अभ्यास करता येणार आहे. कातळशिल्पांचा पाठ्यपुस्तकात समावेश होणे, हा केवळ अभ्यासक्रमातील एक भाग नव्हे, तर महाराष्ट्राच्या प्रागैतिहासिक सांस्कृतिक वारशाच्या जतन आणि संवर्धनाच्या दिशेने टाकले गेलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

जिल्ह्यातील विविध भागांत कातळांवर कोरलेली कातळशिल्पे गेल्या काही वर्षांत प्रकाशात आली आहेत. यामध्ये विविध प्राणी, मानवी आकृती, भौमितिक रचना, दिशादर्शक खुणा आणि चित्रात्मक शिल्पांचा अमूल्य ठेवा समोर आला आहे. या कातळशिल्पांचा अभ्यासक्रमात समाविष्ट झाल्याने आता विद्यार्थ्यांना सहस्रो वर्षांपूर्वीच्या मानवाच्या जीवनशैलीची, विचारविश्वाची आणि कलात्मक अभिव्यक्तीची ओळख होणार आहे. इतिहास हा केवळ पुस्तकातील विषय नसून आपल्या आजूबाजूच्या भूमीत ही शिल्पे अनुभवता येतील.

कातळशिल्पांचा युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या सूचीत समावेश करण्याची प्रक्रिया चालू असून रत्नागिरी जिल्ह्यातील कशेळी, रूंढेतळी, देवाचेगोठणे, बारसू, देवीहसोळ, जांभरूण, कुडोपी आणि उक्षी या ८ महत्त्वपूर्ण स्थळांचा त्यामध्ये समावेश करण्यात आला आहे.

पाठ्यपुस्तकात कातळशिल्पांचा समावेश झाल्याबद्दल आनंद व्यक्त करतांना संशोधक सुधीर रिसबुड आणि धनंजय मराठे यांनी सांगितले की, गेल्या १५ वर्षांहून अधिक काळ आम्ही कातळशिल्पांचा शोध, संशोधन, संवर्धन आणि जनजागृतीसाठी सातत्याने कार्य करत आहोत. या शिल्पांची शास्त्रीय नोंद, जागरूकता निर्माण करणे आणि या वारशाचे महत्त्व समाज, संशोधक, तसेच शासनापर्यंत पोचवण्याचा अविरत प्रयत्न केला.

या विषयाला शालेय अभ्यासक्रमात स्थान मिळणे म्हणजे आमच्या खडतर प्रवासाला मिळालेली मोठी पावती आहे. कातळावर कोरलेल्या त्या आदिम रेषांनी सहस्रो वर्षांचा प्रवास करून पाठ्यपुस्तकात स्थान मिळवले आहे. आता त्या केवळ पुस्तकाच्या पानांवर न रहाता प्रत्येक विद्यार्थ्याच्या कुतूहलात, विचारांत आणि संवेदनशील मनात कोरल्या जाव्यात; त्यातून भविष्यातील संशोधक, संवर्धक आणि आपल्या सांस्कृतिक वारशाचा अभिमान बाळगणारा सजग नागरिक घडावा, हीच या संपूर्ण प्रवासाची खरी कमाई !