पिंपळी खुर्द येथील महामार्गालगतचे धोकादायक काचेचे भंगार हटवले

हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्या पाठपुराव्याला यश !

महामार्गाच्या लगत ठेवलेले भंगारातील काचेच्या बाटल्यांचे ढीग

चिपळूण, २९ जून (वार्ता.) – चिपळूण-कराड महामार्गालगत पिंपळी खुर्द येथे अवैध आणि धोकादायक पद्धतीने साठवून ठेवलेले काचेच्या बाटल्यांचे भंगार शेवटी हटवण्यात आले आहे. ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’ने या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधत केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही कारवाई करण्यात आली. यामुळे महामार्गावरील प्रवासी आणि स्थानिक नागरिक यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.

१. पिंपळी खुर्द येथील महामार्गाला लागूनच मोठ्या प्रमाणावर काचेच्या बाटल्या आणि भंगार साहित्य उघड्यावर रचून ठेवण्यात आले होते. या मार्गावरील वाहनांची आणि पादचार्‍यांची वर्दळ पहाता, हे साहित्य वाहतुकीच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत धोकादायक बनले होते. एखादा अपघात झाल्यास काचेच्या तुकड्यांमुळे मोठी जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली होती.

२. ही गोष्ट लक्षात येताच हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या कार्यकर्त्यांनी तातडीने पावले उचलली. समितीच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग उपविभागीय कार्यालय आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले यांना लेखी तक्रार अर्ज देऊन या धोक्याची कल्पना देण्यात आली.

बाटल्यांचे ढीग हटवल्यानंतरचे छायाचित्र

३. प्रशासनाने या तक्रारीची दखल घेत संबंधित गोडाऊन मालक विकास ननावरे यांना पोलीस आणि महामार्ग कार्यालयामार्फत कायदेशीर कारवाईची समज दिली. शेवटी अनेक दिवस अवैधपणे रस्त्याशेजारी पडून असलेले हे धोकादायक भंगार तिथून हटवण्यात आले.

४. हा प्रश्न तडीस नेण्यासाठी हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे श्री. अनुराग उतेकर, हेमंत चाळके, प्रशांत उतेकर आणि संतोष घाग यांनी विशेष परिश्रम घेतले.

संपादकीय भूमिका

समस्येविषयी नागरिकांनी तक्रार केल्यानंतर कृती करणारे नव्हे, तर स्वतःहूनच तत्परतेने कारवाई करणारे प्रशासन हवे !