राजापूर ‘आयटीआय’मध्ये ‘शिवराज्याभिषेक पंच परिवर्तन’ उत्सव उत्साहात साजरा

तरुणांनी छत्रपतींचा वारसा आणि विचार आत्मसात करावेत ! - दिलीप गोखले

राजापूर, ३० जून (वार्ता.) – आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा चालवत आहोत. त्यांचे विचार आत्मसात करणे आणि त्यांच्या आदर्शांवर चालत देशाला प्रगतीच्या मार्गावर नेणे आजच्या काळात अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध वक्ते दिलीप गोखले यांनी येथे केले.

येथील मधू दंडवते शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) ‘न्याय, धर्म, जनकल्याण, सुशासन आणि राष्ट्रीयता गौरवशाली विजय !’ या ब्रीदवाक्यासह ‘शिवराज्याभिषेक पंचपरिवर्तन उत्सव’ अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. दिलीप गोखले यांनी आजच्या तरुण पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचे अद्वितीय कार्य, स्वराज्य स्थापनेची आणि सुशासनाची माहिती करून देत विद्यार्थ्यांना राष्ट्रभक्तीची प्रेरणा दिली.

सूत्रसंचालन करतांना प्रा. युवराज माळवी यांनी विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या वैभवाशाली इतिहासाची आणि संस्कृतीची ओळख करून दिली. या कार्यक्रमाला संस्थेचे सर्वश्री भाटकर, मुल्ला, पावस्कर, पवार, धुमाळ, राजन रहाटे, सपकाळ, महाकाळ यांच्यासह संस्थेतील शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.