आनंदी, प्रेमळ आणि सहनशील वृत्तीच्या रत्नागिरी येथील कै. (सौ.) कविता औंधकर (वय ७२ वर्षे) !

१८.६.२०२६ या दिवशी रत्नागिरी येथील सौ. कविता शशिकांत औंधकर (वय ७२ वर्षे) यांचे निधन झाले. ३०.६.२०२६ या दिवशी त्यांच्या मृत्यूनंतरचा तेरावा दिवस आहे. त्यानिमित्त त्यांचे कुटुंबीय आणि साधक-परिचारिका यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये, तसेच त्यांच्या मृत्यूपूर्वी अन् मृत्यूनंतर जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

कै. (सौ.) कविता औंधकर

१. सौ. दीपा अमित औंधकर (कै. (सौ.) कविता औंधकर यांची सून), रत्नागिरी

१ अ. जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

सौ. दीपा अमित औंधकर

१ अ १. आनंदी : ‘२ वर्षांपासून आमवातामुळे माझ्या सासूबाईंचे (सौ. कविता औंधकर यांचे) गुडघे निकामी झाले होते. त्यामुळे त्या चालू शकत नव्हत्या. २ वर्षांपासून त्या एकाच जागी बसून असायच्या, तरीही त्या आनंदी होत्या.

१ अ २. उत्तम स्मरणशक्ती : त्या स्वतः उच्चशिक्षित होत्या. त्यामुळे त्यांचा विविध विषयांचा अभ्यास चांगला होता. त्यांची स्मरणशक्ती शेवटपर्यंत चांगली होती.

१ अ ३. ‘कुटुंबातील सदस्यांनी त्यांच्या समवेत बसावे किंवा त्यांना वेळ द्यावा’, अशी त्यांची अपेक्षा नव्हती.

१ अ ४. त्यांच्यामध्ये ‘नीटनेटकेपणा, काटकसर, संयम, स्वयंशिस्त, इतरांचा विचार करणे’, इत्यादी बरेच गुण होते.

१ आ. शेवटचे आजारपण

१ आ १. स्थिर राहून परिस्थिती स्वीकारणे

अ. त्यांच्या पायाची जखम दिवसेंदिवस पुष्कळ वाढत होती. जेव्हा ‘त्यांच्या पायाची जखम बरी होत नाही’, असे लक्षात आले, तेव्हा आधुनिक वैद्यांनी ‘त्यांचा डावा पाय मांडीपासून काढावा लागेल’, असे सांगितले. तेव्हाही त्या स्थिर होत्या.

आ. शस्त्रकर्माच्या २ दिवस आधी त्यांना रुग्णालयात भरती केले होते. त्या २ दिवसांतही त्या सतत आनंदी असायच्या. शस्त्रकर्म झाल्यावर त्या रडल्या नाहीत किंवा त्यांना भेटायला कुणी नातेवाईक आले, तरी त्या स्थिर असायच्या.

१ इ. मृत्यू

१ इ १. ‘सासूबाईंचा शेवटचा श्वास चालू आहे’, हे लक्षात येऊनही त्यांच्याकडे पाहून भीती न वाटणे : ‘सासूबाईंचा शेवटचा काळ जवळ आला आहे’, असे आधुनिक वैद्यांनी आम्हाला सांगितले होते. त्यांना अतीदक्षता विभागात ठेवले होते. ‘त्यांचा शेवटचा श्वास चालू आहे’, हे लक्षात येऊनही त्यांच्याकडे पाहून मला भीती वाटली नाही. त्यांचा श्वास संथपणे थांबला. त्या वेळी माझ्याकडून ‘या जिवाला गती मिळू दे आणि त्यांच्या लिंगदेहाभोवती संरक्षककवच निर्माण होऊ दे’, अशी गुरुदेवांच्या चरणी प्रार्थना झाली.’

२. कु. अपाला औंधकर (कै. (सौ.) औंधकर यांची नात, वय १९ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६० टक्के), फोंडा, गोवा.

२ अ. जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

कु. अपाला औंधकर

२ अ १. ‘व्हॉट्स ॲप’वर पाठवलेल्या साधनेविषयीच्या लेखांना चांगला प्रतिसाद देणे : ‘आमच्या कुटुंबाचा ‘व्हॉट्स ॲप’वर ‘फॅमिली’ गट होता. त्या गटामध्ये सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या चौकटी, साधनेविषयीची सूत्रे, तसेच काही संग्रह लेख मी किंवा आई (सौ. दीपा औंधकर) पाठवत असे. ते लेख वाचून आजीही त्यांना आवर्जून प्रतिसाद द्यायची. तिच्या प्रतिसादातून ‘तिला त्याविषयी मनापासून चांगले वाटले आहे’, असे मला जाणवायचे.

२ अ २. महर्षींनी नाडीपट्टीत उल्लेख केल्याप्रमाणे ती प्रतिदिन ‘हरे राम हरे राम राम राम हरे हरे । हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ।’, हा महामंत्र आठवणीने पूर्ण करायची.

२ आ. जाणवलेले पालट

१. मी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या अंतर्गत सेवा आणि संशोधन कार्यात सहभागी असल्याने गोव्यात रहाते. ‘मी घरी रहावे’, असे तिला पूर्वी वाटायचे; पण नंतर तिने ते पूर्णपणे स्वीकारले होते. यातच ‘तिची साधना झाली आहे’, असे आम्हाला जाणवले.

२. ती इतकी आजारी असूनही ‘तू ये किंवा थांब’, असे मला कधी बोलली नाही. ‘तू सेवेला प्राधान्य दे’, असेच ती मला म्हणायची.

३. माझे दैनिक ‘सनातन प्रभात’मधील लेख वाचून ती आईला म्हणाली, ‘‘अपालाच्या गुरूंनी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी) तिला भरभरून दिले आहे. असे कुणीही देऊ शकणार नाही !’’

२ इ. मृत्यूपूर्वी जाणवलेली सूत्रे

२ इ १. देवाच्या अनुसंधानात असणे : आजी रुग्णालयात, तसेच अतीदक्षता विभागात असतांना तिला ‘तू कोणता नामजप करत आहेस ?’, असे विचारल्यावर ती ‘नारायण’, असे सांगायची. आजीला एवढे शारीरिक त्रास असूनही ती शेवटच्या दिवसांमध्येही कुलदेवी ‘श्री यमाईदेवी’ हिचे स्मरण करायची.

२ इ २. गुरुदेवांच्या आवाजातील ‘साधना’ ही ध्वनीफीत लावल्यावर जाणवलेली सूत्रे

अ. तिच्या मृत्यूच्या आदल्या दिवशी तिची शारीरिक स्थिती पुष्कळच खालावली होती. तेव्हा मी तिच्या कानाशी गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) आवाजातील ‘साधना’ ही ध्वनीफीत (ऑडिओ कॅसेट) लावली. ती इतर कोणत्याही गोष्टीला प्रतिसाद देत नव्हती; पण ही ध्वनीफीत लावताच ती पुष्कळ हसली. ‘जणू गुरुदेवांचा आवाज ऐकून तिला आनंद झाला होता’, असे मला जाणवले.

आ. त्या ध्वनीफितीत ‘प्रतिदिन ५ – ६ घंटे नामस्मरण करणार्‍याला साधक म्हणावे’, असे आहे. तेव्हा आजीने ध्वनीफितीच्या दिशेने बोट करून ‘मीही नामस्मरण करत आहे’, असे खुणावून सांगितले. त्या वेळी माझ्या डोळ्यांतून कृतज्ञतेने भावाश्रू आले. ‘तिच्यात गुरुदेवांप्रती अव्यक्त भावाची निर्मिती झाली होती’, असे मला जाणवले.

२ इ ३. उशीखाली दैनिक ‘सनातन प्रभात’ ठेवणे, तसेच नामजप इत्यादी उपाय केल्यावर ‘आय.सी.यू. सायकोसिस’मधून बाहेर पडणे : आजीला ‘आय.सी.यू. सायकोसिस’ (टीप) झाला होता. त्यामुळे ती विचित्र बोलायची. त्या वेळी मी तिच्या उशीखाली दैनिक ‘सनातन प्रभात’चा अंक ठेवला आणि तिच्या समोर गुरुदेवांच्या चरणांचे छायाचित्र ठेवले. तेव्हा ती शांत झाली.

टीप – आय.सी.यू. सायकोसिस : हा अतीदक्षता विभागात भरती असलेल्या रुग्णांमध्ये आढळणारा एक तात्पुरता मानसिक विकार आहे. यामध्ये रुग्ण गोंधळात पडतो आणि वास्तवापासून काही काळासाठी दूर जातो.

आईने तिच्याकडून ‘निर्गुण’ आणि ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले’, असा जप करून घेतल्यावर ती ‘आय.सी.यू. सायकोसिस’मधून बाहेर पडली.

२ ई. मृत्यूनंतर जाणवलेली सूत्रे

१. आजीचे निधन गुरुवारी झाले आणि त्या दिवशी ‘गुरुपुष्यामृतयोग’ होता. हा दिवस अत्यंत शुभ होता.

२. आजीचा मृतदेह घरी आणल्यावर ‘ती ध्यानात आहे’, असे आम्हाला जाणवले. तिचा चेहरा तेजस्वी आणि सुंदर दिसत होता.

३. घरी अखंड ‘श्री गुरुदेव दत्त ।’, हा नामजप लावून ठेवला होता. त्यामुळे वातावरणात रज-तमाचे प्रमाण अत्यल्प होते. ‘घरात कुणाचा मृत्यू झाला आहे’, असे वाटत नव्हते. याचे पाहुण्यांनाही आश्चर्य वाटले.

४. आजीची अंतिम यात्रा निघाल्यावर तेथून गायींचा कळप गेला. ‘हा एक शुभ संकेत आहे’, असे मला जाणवले.

५. ‘वातावरणात दत्ततत्त्व कार्यरत झाले आहे’, असे जाणवून केशरी रंगाचा प्रकाश दिसत होता, तसेच वातावरणात पुष्कळ थंडावा जाणवत होता.

६. आजीचे सर्व विधी भावपूर्ण वातावरणात पार पडले.’

३. सौ. अक्षता रूपेश रेडकर (कै. (सौ.) कविता औंधकर यांच्या सुनेची लहान बहीण), फोंडा, गोवा.

३ अ. प्रेमभाव : ‘मी जेव्हा दीपाताईच्या घरी जायचे, तेव्हा आईंनी (दीपाताईच्या सासूबाईंनी) मला त्यांच्या परिवारातील सदस्याप्रमाणे वागणूक दिली. त्यामुळे मी त्यांच्या घरी सहजतेने रहायचे.

सौ. अक्षता रूपेश रेडकर

३ आ. थकवा असूनही भरतकाम आणि विणकाम आनंदाने शिकवणे : गेल्या वर्षी आई पुष्कळ थकल्या होत्या. तेव्हा मी रत्नागिरी येथे त्यांच्या घरी गेले होते. त्यांना भरतकाम आणि विणकाम उत्तम प्रकारे यायचे. ‘मलाही ती कला शिकायची आहे’, असे त्यांना कळले. तेव्हा त्यांना पुष्कळ शारीरिक थकवा असूनही त्यांनी आनंदाने शक्य होईल तितके मला शिकवले. माझ्या काही पोषाखांवर त्यांनी स्वतः कष्टाने नक्षी विणून दिली.

३ इ. ‘तीव्र वेदना होत आहेत’, असे एकदाही व्यक्त न करणे : त्यांच्या पायाचे शस्त्रकर्म झाल्यावर त्यांची शारीरिक स्थिती खालावत गेली. आई वेदनांमुळे हाता-पायांची हालचाल करू शकत नव्हत्या. त्यांचे हात आणि पाय सुजले होते. त्यांची त्वचा ठिकठिकाणी काळी पडली होती. अशा स्थितीत त्यांनी स्वतःहून ‘मला तीव्र वेदना होत आहेत’, असे एकदाही व्यक्त केले नाही. आम्ही विचारल्यावरही ‘वेदना होत नाहीत’, असेच त्या म्हणायच्या. मी भौतिकोपचार तज्ञ (फिजिओथेरपिस्ट) असल्याने रुग्णांना वेदनांच्या दृष्टीने पडताळले आहे. अशा स्थितीत अल्प वेदना होत असूनही बरेच रुग्ण ‘वेदना होत आहेत’, असे सांगतात आणि त्यांचे त्याकडेच अधिक लक्ष असते. आईंच्या वेदनांचे प्रमाण पाहून ‘वेदना होत नाहीत’, असे त्यांनी म्हणणे’, हे एक रुग्ण म्हणून अत्यंत कौतुकास्पद आहे’, असे मला जाणवले. इतक्या कठीण शारीरिक स्थितीतही सकारात्मक रहाणे त्यांना जमत होते.’

४. सौ. समृद्धी सनगरे (कै. (सौ.) कविता औंधकर यांना ‘ड्रेसिंग’ करायला येणारी साधक-परिचारिका), रत्नागिरी

४ अ. सहनशीलता : ‘आजींच्या पायाच्या जखमेची मलमपट्टी (ड्रेसिंग) करण्यासाठी त्या कधीही सिद्धच असायच्या. मलमपट्टी करतांना किंवा काढतांना ‘दुखत आहे’, असे त्या कधीच बोलल्या नाहीत. मलमपट्टी (ड्रेसिंग) काढतांना काही वेळा ती त्वचेला चिकटल्याने त्यांना वेदना व्हायच्या; पण त्यांनी आम्हाला कधी तसे जाणवू दिले नाही. त्यांच्या चेहर्‍यावरून ते दिसायचे. सलाईन लावण्यासाठीही त्या सहज सिद्ध झाल्या.

४ आ. प्रेमभाव : त्या दीपाताईंशी जशा प्रेमाने बोलायच्या, तशाच त्या माझ्याशीही प्रेमाने बोलायच्या. त्यामुळे त्यांच्याविषयी माझ्या मनात पुष्कळ आपुलकी निर्माण झाली.

४ इ. दीपाताई त्यांना जे काही सांगायच्या, त्याला त्या लगेचच ‘हो’ म्हणायच्या. त्यांनी कधीही ‘नाही’, असे म्हटले नाही.

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने ‘कठीण शारीरिक प्रारब्ध स्वीकारणे कसे शक्य होऊ शकते ? गुरु साधकाच्या प्रत्येक कुटुंबियाची काळजी कशी घेतात ? आणि त्यांची साधना कशी करून घेतात ?’, हे मला अनुभवता आले’, याबद्दल मी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

(सर्व सूत्रांचा दिनांक : २२.६.२०२६)