बोरी येथे ३० वे गोमंतक मराठी साहित्य संमेलन

फोंडा, २१ जून (वार्ता.) – मराठी भाषेची चळवळ गोव्यात अनेक वर्षांपासून चालू आहे. येथे मराठी आणि कोकणी या दोन्ही भाषा शतकानुशतके गुण्यागोविंदाने नांदत आहेत. मातृभाषेतून शिक्षण घेतल्यास त्याचे सकारात्मक परिणाम भविष्यात निश्चितपणे दिसून येतात. यामुळे मातृभाषेतील शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. साहित्याचा समाजावर दीर्घकाळ प्रभाव पडतो. साहित्य हे केवळ स्वत: किंवा एखादा प्रदेश यांच्यासाठी नसून ते समाज घडवण्याचे एक प्रभावी माध्यम आहे. साने गुरुजी यांच्या साहित्याचा प्रभाव महाराष्ट्र आणि गोवा यांसह पूर्ण देशावर पडला, असे प्रतिपादन सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांनी केले. गोमंतक साहित्य सेवक मंडळ, पणजी; कला आणि संस्कृती संचालनालय, गोवा सरकार आणि श्री नवदुर्गा संस्थान, बोरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ३० व्या गोमंतक मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी मंत्री सुभाष शिरोडकर बोलत होते. याप्रसंगी संमेलनाध्यक्ष तथा साहित्यिक विठ्ठल गावस, स्वागताध्यक्ष श्याम प्रभुदेसाई, गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रा. अनिल सामंत, इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझाचे अध्यक्ष दशरथ परब, साहित्य सेवक मंडळाचे अध्यक्ष रमेश वसकर, कार्याध्यक्ष सुनील सावकार, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे व्यवस्थापक मीनानाथ उपाध्ये आदींची उपस्थिती होती.
याप्रसंगी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी योगदान देणारे अधिवक्ता दशरथ सावंत, लक्ष्मी जोग, जयवंत आडपईकर, प्रकाश परब, वसंतराव महाडिक, विनोद नाईक आदी मान्यवरांचा मंत्री सुभाष शिरोडकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
|
मराठीला राजभाषेचा दर्जा देण्याच्या आंदोलनाला मराठीप्रेमींनी पाठिंबा द्यावा ! – विठ्ठल गावस, संमेलनाध्यक्ष संमेलनाध्यक्ष तथा साहित्यिक विठ्ठल गावस म्हणाले, ‘‘मराठी भाषा गोव्यावर बाहेरून आलेल्यांनी लादल्याचा आरोप तथ्यहीन आहे. वास्तविक मराठी भाषेचा गोव्यातील धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रांवर खोलवर प्रभाव आहे. मराठी भाषा आणि साहित्य यांच्या संवर्धनासाठी सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे. गोव्यात सध्या मराठीला राजभाषेचा दर्जा देण्यासाठी आंदोलन चालू आहे आणि सर्व मराठीभाषिकांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला पाहिजे.’’ या वेळी दशरथ परब, सुनील सावकार आणि श्याम प्रभुदेसाई यांनी त्यांचे विचार मांडले. कार्यक्रमात विविध साहित्यकृतींचे मंत्री सुभाष शिरोडकर यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यामध्ये विनोद नाईक यांचा ‘प्राजक्ता’ हा कवितासंग्रह, किरण तळावलीकर यांची बाल साहित्यकृती, माधुरी उजगावकर यांचे पुस्तक, रितिका गावडे यांचे ‘बोलके संस्कार’ आणि रमेश वसकर यांचे ‘दिवसाही तारे’ यांचा समावेश होता. कार्यक्रमात रमेश वसकर यांनी स्वागत आणि सौ. श्रुती हजारे यांनी सूत्रसंचालन केले, तर आभार राजमोहन शेट्ये यांनी मानले. |
योग हा गोमंतकियांच्या जीवनाचा भाग व्हायला हवा ! – मुख्यमंत्री प्रमोद सावंत
युवतीला फूस लावून पळवून नेल्याच्या संशयाने ग्रामस्थांनी एका शिक्षकाला चोपले !
इयत्ता १० वीच्या परीक्षेतील कॉपी प्रकरणाचे मुख्य सूत्रधार मुख्याध्यापकच
गोव्यात अवैध खाणकाम : साळगावकर समूह आणि संबंधित आस्थापनांची अनुमाने १ सहस्र २३ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त
गडकर आळी (सातारा) येथील महिलांनी घातला अधिकार्यांना घेराव !
कचरा प्रक्रिया सक्तीविरोधात ‘हाऊसिंग सोसायटी फेडरेशन’ आक्रमक