भावाच्या स्तरावर प्रयत्न करून भावानंद अनुभवणार्‍या ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सनातनच्या सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधिका सुश्री मधुरा भोसले (वय ४३ वर्षे) !

‘ज्येष्ठ शुक्ल षष्ठी (२०.६.२०२६) या दिवशी सनातनच्या सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधिका सुश्री मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) यांचा वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्यांच्या आईच्या लक्षात आलेल्या त्यांच्या गुणवैशिष्ट्यांपैकी काही सूत्रे आपण २०.६.२०२६ या दिवशीच्या लेखात पाहिली. आज उर्वरीत सूत्रे येथे दिली आहेत.

भाग २ 

भाग १ वाचण्यासाठी करा → https://sanatanprabhat.org/marathi/1052797.html

सुश्री (कु.) मधुरा भोसले

८. सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता

८ अ. सूक्ष्मचित्रातील सत्यतेचे प्रमाण : ती कधी सूक्ष्मचित्रही काढते. देहली येथे झालेल्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त रामनामाचा सामूहिक जप करण्यात आला. त्याचे सूक्ष्मचित्र मधुराने काढले होते. त्याची सत्यता ९० टक्के असल्याचे संतांकडून सांगण्यात आले आहे.

८ आ. सहज बोलतांनाही मधुराच्या बोलण्यातून ज्ञान व्यक्त होणे : एकदा आम्ही बोलत असतांना पांडवांचा विषय निघाला. त्या वेळी मधुरा जे बोलत होती, ते सूक्ष्म ज्ञान असल्याचे मला जाणवले.

८ इ. भविष्यात घडणार्‍या घटना सूक्ष्मातून आधीच दिसणे : मधुराला नजीकच्या काळात घडणार्‍या गोष्टी आधीच सूक्ष्मातून दिसतात.

१. एकदा तिला आंब्याचा रस ठेवलेली वाटी दिसल्याचे तिने मला सांगितले. त्यानंतर काही घंट्यांनी मी स्वयंपाकघरात गेले. तेव्हा संतांसाठी स्वयंपाक करणार्‍या एका साधिकेने मला हाक मारली. मी तिला आंब्याच्या रसाबद्दल काहीही न सांगताही त्या साधिकेने मला एका वाटीत मधुरासाठी आंब्याचा रस दिला.

२. एकदा मधुराला वाटले, ‘पिवळ्या रंगाची साडी नेसलेली एक साधिका रात्री खोलीत येणार आहे.’ त्या रात्री आमच्या संपर्कात फारशी न येणारी साधिका दुसर्‍या एका साधिकेला शोधत अकस्मात् आमच्या खोलीत आली. तिने पिवळ्या रंगाची साडी नेसली होती.

३. एकदा मी रामनाथ देवस्थानातील कापड विक्रीकेंद्रातून देवीला अर्पण केलेल्या साड्यांमधील एक साडी खरेदी केली. ‘मी ती विशिष्ट रंगाची साडी विकत घेणार आहे’, हे मधुराला आधीच दिसले होते. मी घरी आल्यावर तिला साडी दाखवली. तेव्हा तिने मला तसे सांगितले.

९. भावाच्या स्तरावर प्रयत्न करून भावस्थिती अनुभवणे 

सौ. कस्तुरी भोसले

ईश्वराच्या अनुसंधानात रहाण्यासाठी ती सतत वेगवेगळे आध्यात्मिक भाव ठेवते. त्यानुसार तिला तशा अनुभूतीही येतात. ती दिवसभर त्याच भावस्थितीत असते.

९ अ. महाप्रसाद घेत असतांना भावाच्या स्तरावर करत असलेले प्रयत्न : महाप्रसादात पिठले-भाकरी असल्यास ती प.पू. गजानन महाराज यांचा प्रसाद समजून ग्रहण करते आणि गुरुप्रसादाचा अधिक लाभ घेते. महाप्रसादात मुगाच्या डाळीची खिचडी असली की, मधुराला संत कर्माबाईंचे स्मरण होते आणि मधुरा सूक्ष्मातून भगवान जगन्नाथाला घास भरवते. त्या वेळी तिच्या तोंडात गोड चव येते.

एकदा गुढीपाडव्याच्या दिवशी आश्रमात मिष्टान्न केले होते. मधुराला त्या दिवशी त्रास होत असल्यामुळे तिला काही खावेसे वाटत नव्हते. मी तिला थोडेसेच मिष्टान्न वाढले आणि मी भोजनकक्षात महाप्रसाद घेण्यासाठी गेले. मी महाप्रसाद घेऊन खोलीत आल्यावर तिने मला आणखी मिष्टान्न आणायला सांगितले. ती म्हणाली, ‘‘मी सूक्ष्मातून पहिला घास प.पू. गुरुदेवांना भरवल्यावर चित्रातील भगवान जगन्नाथ माझ्यापुढे प्रकट झाला (आमच्या खोलीत भगवान जगन्नाथाचे चित्र आहे.) आणि म्हणाला, ‘मलाही आश्रमातील प्रसाद भरव.’ त्याला मिष्टान्न भरवल्यामुळे माझ्यासाठी मिष्टान्न राहिले नाही.’’ तिची अनुभूती ऐकून मला आनंद झाला. मी तिला पुन्हा मिष्टान्न आणून दिले.

९ आ. सण आणि उत्सव या दिवशी भावाच्या स्तरावर करत असलेले प्रयत्न : मधुरा सण, उत्सव आणि यज्ञ असतांना ‘त्या त्या देवतेचे तत्त्व अधिकाधिक मिळावे’, यासाठी दिवसभर नवीन वस्त्रे परिधान करते.

ती जन्माष्टमीच्या दिवशी दिवसभर गोपीभावात रहाते. ती श्रीकृष्णाचा नामजप अधिकाधिक करते. ती घागरा परिधान करून सूक्ष्मातून कृष्णासह रासलीला खेळते. त्या वेळी ‘मी भावावस्थेतील एका गोपीलाच पहात आहे’, असे मला वाटते.

ती श्रीरामनवमीच्या दिवशी तिच्याजवळ असलेला लहानसा पाळणा सजवते. ती त्या पाळण्यात प्रभु श्रीरामाचे चित्र ठेवते आणि त्याला हलकासा झोका देऊन रामजन्माचा आनंद घेते. त्या वेळी ती खोलीत थोडा वेळ गीतरामायणातील गाणी लावून त्रेतायुगातील वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करते. तेव्हा ‘ती शबरीभावात असते’, असे मला जाणवते.

९ इ. ती कधी अभिजात (पूर्वीचे) संगीत ऐकतांना विशेषतः बासरी ऐकतांना वृंदावनात असल्याप्रमाणे भावस्थिती अनुभवते.

९ ई. आम्ही कधीतरी समुद्रकिनारी जातो. तेव्हा मधुरा आठवणीने समवेत समुद्रदेवतेला वहाण्यासाठी नारळ आणि फुले घेते.

९ उ. ‘गुरुबंधूंना साहाय्य करणे’, हे गुरुदेवांची सेवा करण्यासारखे आहे’, असा मधुराचा भाव असणे.

९ ऊ. गुरुबंधूंवर प्रेम करणे म्हणजे गुरुदेवांवर प्रेम करणे : तिला आश्रमातील साधकांविषयी फार आपुलकी वाटते. तिला कुणी भेट दिल्यास ‘ते प.पू. गुरुदेव आणि आश्रमातील साधक यांच्या प्रेमामुळेच मिळाले’, याची तिला जाणीव असते. साधिकांनी तिच्यासाठी घरून काही पदार्थ आणून दिल्यास ती मैत्रिणींना तो पदार्थ आवर्जून देते. ‘गुरुबंधूंवर प्रेम करणे’, हे गुरुदेवांवर प्रेम करण्यासारखे आहे’, हे ती सतत लक्षात ठेवते.

कुटुंबियांना साधनेत साहाय्य करणार्‍या सनातनच्या सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधिका सुश्री मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ४३ वर्षे) !

‘सनातनच्या सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधिका सुश्री मधुरा भोसले यांची त्यांच्या वडिलांच्या लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

डॉ. भिकाजी भोसले

१. मायेतून अलिप्तता

मी मधूनमधून आमच्या नातेवाइकांना भेटायला गावी जातो. पूर्वी मी गावाहून आल्यानंतर मधुरा नातेवाइकांची बारकाईने विचारपूस करायची; मात्र आता तिच्या बोलण्यात एक प्रकारची अलिप्तता जाणवते.

२. प्रेमभाव

मला वयोमानानुसार गुडघ्यांचा त्रास होतो. मधुराची प्रकृती ठीक असतांना ती माझे पाय चेपून देते.

३. आध्यात्मिक प्रगल्भता

‘प्रत्येक प्रसंगात साधनेच्या दृष्टीने कसा विचार करायला हवा’, याविषयी ती मला सांगते. तिने दिलेले साधनेचे दृष्टीकोन प्रगल्भ असतात. त्याचा मला लाभ होतो.

४. साधनेत साहाय्य करणे

मधुरा तत्त्वनिष्ठ आहे. माझ्या वागण्या-बोलण्यात काही अयोग्य असल्यास ती तत्त्वनिष्ठतेने माझी चूक सांगून मला साधनेत साहाय्य करते.’

– डॉ. भिकाजी भोसले (सुश्री मधुरा यांचे वडील), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.५.२०२६)

१०. देव आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या प्रती भाव

अ. मधुरा प्रत्येक गोष्ट देवाला विचारून करत असल्यामुळे मला ‘मधुराला काही सुचले’, असे तिच्या बोलण्यातून कधी व्यक्त होत नाही. ती कर्तेपणा देवाच्या चरणी समर्पित करते. ‘देवच सर्व करतो’, हा भाव मधुराच्या मनात सतत जागृत असतो.

आ. मधुरा प्रत्येक गोष्टीकडे आध्यात्मिक दृष्टीने पहाते. ती प्रत्येक गोष्ट देवाशी जोडते. एकदा तिच्या एका मैत्रिणीला आलेली अनुभूती तिने मधुराला सांगितली. त्या वेळी मधुराने त्या अनुभूतीचे आध्यात्मिक स्तरावर विश्लेषण केले. ते ऐकून त्या साधिकेची भावजागृती झाली.

इ. मधुराला ईश्वराकडून मिळालेल्या विविध विषयांवरील ज्ञानासंबंधी तिचे दैनिक ‘सनातन प्रभात’मधील लेख वाचून बरेच साधक भ्रमणभाष करून तिचे कौतुक करतात. मी भोजनकक्षात गेल्यावर पुष्कळ साधक तिच्या सूक्ष्म परीक्षण विषयक लेखांची माझ्याकडे पुष्कळ स्तुती करतात. मी तिला त्याविषयी सांगितल्यावर त्यांचे कौतुकोद्गार ऐकून ‘हे प.पू. गुरुमाऊलींविषयी गौरवोद्गार आहेत’, अशा विनम्रभावाने ती नमस्कार करते.

ई. मधुराला स्वप्नातही प.पू. गुरुदेवांचे दर्शन होते. एकदा तिला स्वप्नात दिसले, ‘प.पू. डॉक्टर (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) योगिराज शिवाच्या रूपात आमच्या घरी आले आहेत. आम्ही (मधुरा, मी आणि तिची आजी (माझी दिवंगत आई) त्या योगिराजांचे आदरातिथ्य करत आहोत. नंतर मधुराला त्या योगिराज शिवाच्या रूपातील प.पू. डॉक्टर नारायणाच्या रूपातही दिसू लागले.’

नाव तिचे ‘मधुरा’ आणि भावही मधुर तिचा ।

सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधिका सुश्री मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) यांच्या ४३ व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर सुचलेले भावकाव्य मी गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) चरणी अर्पण करत आहे.

सुश्री (कु.) मधुरा भोसले

गुरुदेवांच्या छत्रछायेखाली, उमलले एक सुंदर फूल ।
भक्ती आणि ज्ञान यांच्या वाटेवर, तिने टाकले पाऊल ।। १ ।।

नाव तिचे ‘मधुरा’ आणि भावही मधुर तिचा ।
गुरुचरणी समर्पित झाली, करून त्याग मायेचा ।। २ ।।

कु. संध्या माळी

सूक्ष्म-चित्रांच्या रेषांमधून, ती रेखाटते भाव अनमोल ।
तिच्या हातातील कुंचल्याला, लाभले गुरुदेवांचे आशिष ।। ३ ।।

एका इवल्याशा बिंदूमध्ये, अवघे ब्रह्मांड ती दाविते ।
कलेच्या साधनेतून, ती गुरूंचेच रूप पूजिते ।। ४ ।।

केवळ कलाच नाही, तर लाभले तिला ‘सूक्ष्म ज्ञान’।
दृश्यापलीकडचे पहाण्याचे, लाभले तिला दिव्य वरदान ।। ५ ।।

गुरूंच्या कृपेने ती जाणते, विश्वाचे अनादि गुपित ।
मनातील गूढ भावनांना, ती करते गुरुचरणी अर्पित ।। ६ ।।

भक्तीयोगाचा सुगंध पसरला, तिच्या अंतरीच्या गाभार्‍यात ।
निसर्ग, जीव अन् जग, हे सर्व तिला दिसते गुरुदेवांत ।। ७ ।।

समर्पणाच्या भावात, ती प्रतिदिन नव्याने न्हाते ।
केवळ गुरूंच्या ध्यासाने, तिचे जीवन पावन होते ।। ८ ।।

ज्ञानयोगाची प्रखर ज्योत, तिच्या बुद्धीमध्ये तेवते ।
सत्य आणि असत्य यांतील भेद, ती सहजतेने जाणते ।। ९ ।।

चित्त शांत, बुद्धी स्थिर आणि वाणीत आहे अमृताची धार ।
अशा ज्ञानमय शिष्येचा, हा जीवनप्रवास सुंदर फार ।। १० ।।

कलेची साधना, ज्ञानाचा प्रकाश आणि भक्तीचा हा मेळ ।
श्रीविष्णूच्या वैकुंठात पसरला चंदनाचा परिमळ ।। ११ ।।

धन्य ती शिष्या मधुरा आणि धन्य ते गुरुदेव ।
अशीच राहो कृपा श्री गुरूंची, तिच्यावर निरंतर ।। १२ ।।

– कु. संध्‍या माळी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.६.२०२६)

११. जाणवलेले पालट 

मधुरा सतत वाईट शक्तींच्या त्रासावर मात करून साधना आणि सेवा करते. ती दिवसाचा अधिकाधिक वेळ भावावस्थेत रहाते. तिच्या आवाजात माधुर्य आले आहे, तसेच तिच्या चेहर्‍यावर एक वेगळाच गोडवा आला आहे. तिच्या चेहर्‍यावर तेज दिसते. ती सतत प्रफुल्लित आणि प्रसन्न दिसते.

१२. कृतज्ञता आणि प्रार्थना

‘प.पू. गुरुमाऊली, मधुराची पुढील आध्यात्मिक उन्नती लवकरात लवकर व्हावी’, अशी आपल्या सुकोमल चरणी प्रार्थना आहे.

‘आपणच मधुराची गुणवैशिष्ट्ये मला दाखवून दिलीत; म्हणूनच मी ही सूत्रे लिहू शकले’, त्याबद्दल मी आपल्या सुकोमल चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

(समाप्त)

–  सौ. कस्तुरी भोसले (सुश्री मधुरा यांच्या आई), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.५.२०२६)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक
  • सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्‍याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात.