रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या साधनावृद्धी शिबिराच्या वेळी साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !         

‘९ ते ११.१.२०२६ या कालावधीत रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात साधनावृद्धी शिबिर झाले होते. त्या वेळी शिबिरात सहभागी झालेल्या साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

१. सौ. स्मिता माईणकर, सांगली

अ. ‘मला आश्रमात आल्यावर सर्वत्र गुरुदेवांचे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे) अस्तित्व जाणवत होते.

. या कालावधीत माझ्या मनात कोणतेही अनावश्यक किंवा नकारात्मक विचार आले नाहीत. माझा नामजप पुष्कळ एकाग्रतेने होत होता. मला पुष्कळ आनंद अनुभवता आला.

इ. ‘सर्वांचीच साधना व्हावी’, ही तळमळ आमच्यापेक्षा गुरुदेवांनाच अधिक आहे’, या विचाराने ‘साधना चांगली होण्यासाठी पुष्कळ प्रयत्न वाढवले पाहिजेत’, याची मला तीव्रतेने जाणीव झाली.’

२. सौ. मोहिनी मांढरे, रायगड

२ अ. ‘शिबिराच्या ठिकाणी आल्यावर ‘सभागृह ही एक दैवी पोकळी असून मी त्या पोकळीत गेले आहे’, असे मला वाटले.

२ आ. वक्त्यांची वाणी चैतन्यमय जाणवून विषयाचे सहजतेने आकलन होणे : वक्ते विषय मांडत असतांना ‘गुरुवाणीच ऐकत आहे’, असे मला जाणवले. श्री. चैतन्य तागडे (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ४० वर्षे) बोलत असतांना मला त्यांच्या मागे पांढरा प्रकाश दिसला. त्यांच्या नावाप्रमाणेच मला त्यांची वाणी चैतन्यमय वाटली. त्यामुळे मला विषयाचे सहजतेने आकलन झाले.

२ इ. ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ सूक्ष्मातून प्रीतीमय दृष्टीने सर्वांना न्याहाळत आहेत’, असे मला जाणवले.

२ ई. ‘प्रत्येक साधकात गुरुरूप आहे’ याची देवाने मला अनुभूती दिली.

२ उ. आश्रमातील चैतन्याने त्रास दूर होणे आणि पुन्हा उत्साहाने शिबिरात सहभागी होता येणे : दुसर्‍या दिवशी मला ताप आला आणि माझ्या पोटात दुखून मला उलट्या झाल्या. माझे डोके दुखू लागले होते. तेव्हा साधिकेने आश्रमातील वैद्यांकडून मला औषध आणून दिले आणि मला नामजपादी उपाय करायला सांगितले. आश्रमातील चैतन्याने माझा त्रास दूर झाला. मला तिसर्‍या दिवशी पुन्हा उत्साहाने शिबिरात सहभागी होता आले.’

३. सौ. दीपाली सिंगाभही, चंद्रपूर

अ. ‘श्री. चेतन राजहंस (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ४२ वर्षे) शिबिराचा उद्देश सांगत होते. तेव्हा ‘त्यांच्या माध्यमातून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले बोलत आहेत’, असे मला जाणवत होते. तेव्हा माझी भावजागृती झाली.’

४. श्री. वामन दत्ताराम परब, पिंगुळी, कुडाळ, सिंधुदुर्ग.

४ अ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे अस्तित्व जाणवून दैवी सुगंध येणे : ‘मला आश्रमात आल्यावर सूक्ष्मातून गुरुमाऊलींचे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे) अस्तित्व जाणवत होते. शिबिरात होत असलेल्या भावजागृतीच्या प्रयोगांच्या वेळी ‘प्रत्यक्ष गुरुदेव समोर बसले आहेत’, असे मला सूक्ष्मातून दिसत होते. तेव्हा मला दैवी सुगंधही आला.

४ आ. शिबिराच्या कालावधीत माझा नामजप एकाग्रतेने होत होता, तसेच ‘सूत्रे आध्यात्मिक स्तरावर ग्रहण होत आहेत’, हे मला अनुभवता आले.

४ इ. मला आश्रमाच्या वास्तूत चैतन्य जाणवत होते. मला आश्रमाच्या भिंती, भूमी आणि लादी यांच्याकडे पाहून चैतन्य जाणवत होते.’

५. सौ. मीनाक्षी कोल्हे, नाशिक

५ अ. आश्रमातील चैतन्य आणि ऊर्जा यांमुळे साधिकेला होणारा घशाचा त्रास उणावणे : ‘शिबिराच्या आधी १५ दिवस माझ्या घशाला आतून सूज आली होती. मला अन्न आणि पाणी गिळतांना पुष्कळ वेदना होत होत्या. त्यासाठी मी ‘ॲलोपॅथी’च्या गोळ्या घेत होते. मी आश्रमात आल्यावर शिबिराच्या पहिल्याच दिवशी माझा घशाचा त्रास पुष्कळ उणावला. नंतर तिसर्‍या दिवशी माझा त्रास पूर्ण दूर झाला. ‘येथील चैतन्य आणि ऊर्जा यांमुळे हे शक्य झाले’, असे मला वाटले.

५ आ. सर्वत्र चैतन्य जाणवणे : ‘आश्रमात प्रत्येक ठिकाणी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे अस्तित्व आहे’, असे मला जाणवले. ‘सर्वत्र जणू चैतन्याचा वर्षाव होत आहे आणि मी त्यात न्हाऊन निघत आहे’, असे मला जाणवत होते.’

६. श्रीमती लक्ष्मी सं. गुरव, नंदीहळ्ळी, बेळगाव.

६ अ. सभागृहात प्रवेश करतांना पांढरा शुभ्र प्रकाश दिसणे : ‘शिबिराच्या पहिल्या दिवशी सभागृहात प्रवेश करतांनाच मला पांढरा शुभ्र प्रकाश दिसला. शिबिर चालू असतांना ‘माझ्या आज्ञाचक्रातून पांढरा प्रकाश शरिरात जात आहे’, असे मला जाणवले.

६ आ. ‘सभागृहाचा आकार मोठा झाला आहे’, असे जाणवणे : ‘मी जसजशी सभागृहात पुढे जात होते, तसतशी सभागृहाची रूंदी वाढत जाऊन त्याचा पुष्कळ मोठा आकार झाला आहे. मी उच्च लोकात आहे’, असे मी अनुभवत होते. मी पुष्कळ वेळ या स्थितीत होते.

६ इ. दुसर्‍या दिवशी दुपारच्या सत्रात मला १० ते १५ मिनिटे पुष्कळ त्रास झाला. माझ्या शरिरातून गरम वाफा निघत होत्या. माझ्या तळहाताला घाम आला होता. माझे हात-पाय पुष्कळ दुखू लागले. माझे डोकेही पुष्कळ जड झाले. त्याच वेळी सभागृहातील ‘वायरिंग’ची पट्टी सुटून खाली आली. तेव्हा ‘मोठ्या वाईट शक्तींनी आक्रमण केले असेल’, असा विचार माझ्या मनात आला. काही वेळाने मला बरे वाटू लागले.’

(लेखातील सर्व सूत्रांचा : दिनांक ११.१.२०२६)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक