वेदपाठशाळा चालवणे, हे मदरसे चालवण्याइतके सोपे नाही ! – प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी, खासदार, भाजप

पुणे – वेदपाठशाळा चालवणे, हे मदरसे चालवण्याइतके सोपे नाही; पण आता आपण त्यांचे गळे आवळायला लागलो आहोत. आपल्याला पाठिंबाही मिळत आहे, ही एक जमेची बाजू आहे, असे विधान भाजपच्या राज्यसभा खासदार आणि वक्फ बोर्डासंबंधीच्या संयुक्त संसदीय समितीच्या सदस्या प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी यांनी केले. ‘आम्ही सारे ब्राह्मण’ व्यावसायिक पत्रिकेच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

विविध पुरस्कार प्रदान

या कार्यक्रमात वेदमूर्ती देवव्रत रेखे यांना ‘ब्राह्मण भूषण’, तर युवा उद्योजक विनय पाचलग यांना ‘करिअर भूषण’ आणि कीर्तनकार ह.भ.प. अमृता करंबेळकर यांना ‘डॉ. रामचंद्र देखणे स्मृती कीर्तनकार’ पुरस्काराने गौरवण्यात आले. ‘कर्‍हाडे ब्राह्मण संघा’ला यंदाचा ‘भगवान परशुराम ब्राह्मण संस्था’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच मंजिरी धूपकरलिखित ‘गुरु-शिष्य संवाद (दासबोध)’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. नाशिकच्या काळाराम मंदिराचे महंत सुधीरदास, वेदमूर्ती महेश रेखे आदी या वेळी उपस्थित होते. श्री. राहुल सोलापूरकर यांनी सूत्रसंचालन केले.

‘नॅशनल मॅन्युस्क्रीप्ट्स मिशन’ला १ सहस्र कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी

प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी पुढे म्हणाल्या की, यापूर्वी पाश्चिमात्त्यांना अधिक महत्त्व दिले जात होते; पण आता पुन्हा एकदा आपला आपल्यावर विश्वास बसू लागला आहे. पुरुषार्थाची कमाल दाखवणार्‍या ऋषीमुनींनी अपौरुषेय असलेले वेद जतन केले, ते प्रसारित केले. पुढच्या कित्येक पिढ्यांनंतर आजही ते मौखिक पद्धतीने जिवंत आहेत. या प्रयत्नांना बळ देण्यासाठी केंद्र सरकार ‘नॅशनल मॅन्युस्क्रीप्ट्स मिशन’च्या माध्यमातून वेद, प्राचीन ग्रंथसंपदा आणि त्यातील ज्ञानाचे भांडार पुढे नेण्याचे काम करण्यात येत आहे. हे ज्ञान आजच्या काळात कसे कालसुसंगत आहे, ते जगाला अर्पण करता येईल का, या सगळ्यांचा विचार या ‘मिशन’मध्ये करण्यात येत आहे. त्यासाठी १ सहस्र कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.


हनुमानगढीच्या प्रसादाविना निवडणूकही जिंकता येत नाही ! – महंत सुधीरदास

महंत सुधीरदास

वेदपाठशाळांना, वैदिकांना अनुदान नाही. उत्तरप्रदेशमध्ये मात्र अशी परिस्थिती नाही. हनुमानगढीच्या प्रसादाविना निवडणूकही जिंकता येत नाही. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही हनुमानगढीला घाबरतात. हनुमानगढी जे सांगेल, तेच उत्तर प्रदेशमध्ये घडते. दलित समाजातून येणार्‍या मायावतींनी संपूर्ण वेद अध्ययन केलेल्या पंडितांना १० सहस्र रुपये आणि घनपाठी आहेत, त्यांना १५ सहस्र रुपये मानधन चालू केले होते. आता महाराष्ट्राला एक ब्राह्मण मुख्यमंत्री लाभला आहे. त्यांच्यासमोर हा प्रश्न मांडू आणि तोडगा काढू.