गडकर आळी (सातारा) येथील महिलांनी घातला अधिकार्‍यांना घेराव !

१५ दिवसांपासून पाण्याची टंचाई 

प्रतीकात्मक छायाचित्र

सातारा, २१ जून (वार्ता.) – १५ दिवसांपासून पाण्याच्या तीव्र टंचाईने गडकर आळी आणि समाधीचा माळ परिसरातील नागरिक विविध अडचणींना तोंड देत आहेत. शेवटी सहनशीलतेचा उद्रेक होऊन महिलांनी नगर परिषद कार्यालयात जाऊन पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांना घेराव घातला. ३ जूनपासून नळ कोरडे आहेत. घरात पाणी येत नाही. पाणी कधी देणार ? अशा एक ना अनेक प्रश्नांचा भडीमार केला. मागील वेळी जाब विचारायला आल्यानंतर आम्हाला कार्यालयातून बाहेर काढण्यात आले होते. त्या वेळी दमदाटी करणारे नगरसेवक आता कुठे आहेत ? आमचे नगरसेवक कुठे गेले आहेत ? मत मागायला घरोघरी येणारे आता का दिसत नाहीत ? असे अनेक प्रश्न महिलांनी उपस्थित केले.

पाणीपुरवठा अभियंता शहाजी वाठारे म्हणाले की, काही तांत्रिक अडचणींमुळे गडकर आळी आणि समाधीचा माळ परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. तो दुरुस्त करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. काही दिवसातच पाणीपुरवठा सुरळीत होईल.

संपादकीय भूमिका

स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर पाण्यासाठी जनतेला संघर्ष करावा लागणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !