‘ज्येष्ठ शुक्ल षष्ठी (२०.६.२०२६) या दिवशी सनातनच्या सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधिका सुश्री मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या आईच्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
सुश्री मधुरा भोसले यांना त्यांच्या ४३ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

‘आम्ही (मी आणि मधुरा भोसले) रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात १५ वर्षांपासून रहात आहोत. मधुरा माझी आध्यात्मिक मैत्रीण आणि मार्गदर्शक झाली आहे. ‘तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधक कन्येची सेवा करतांना कौटुंबिक जीवन साधनामय कसे करायचे’, हे मला शिकायला मिळते’, त्याबद्दल मी गुरुमाऊलींच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) सुकोमल चरणी अत्यंत ऋणी आहे.
१. इतरांना साहाय्य करणे
एकदा एका साधिकेने ती राबवत असलेल्या स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलन प्रक्रियेच्या संदर्भात मधुराकडे साहाय्य मागितले. तेव्हा मधुराने त्या साधिकेमधील स्वभावदोष आणि अहं यांचे पैलू सांगितले. मधुराचे बोलणे ऐकून त्या साधिकेने मधुराला विचारले, ‘‘तू एवढे अचूक कसे काय सांगितले ? ’’ तेव्हा मधुरा म्हणाली, ‘‘मी देवाला विचारले. त्याने जे मला सुचवले, तेच मी तुला सांगितले. यात माझी स्वतःची बुद्धी कुठेच नाही.’’
तेव्हा त्या साधिकेला वाटले, ‘मधुरामध्ये देवाप्रती दृढ श्रद्धा आहे आणि ती अंतर्मुख आहे. तिने देवाचे विचार ग्रहण करून प्रेमाने आणि नम्रतेने सांगितले; म्हणूनच तिने सांगितलेले स्वभावदोष आणि अहंचे पैलू स्वीकारता आले. मनाचा संघर्ष झाला नाही.’
२. इतरांना आनंद देणे

मधुराने लिहिलेले लेख आवडल्यामुळे प.पू. गुरुदेव अनेक वेळा तिला प्रसाद पाठवतात. ती त्यातील थोडा प्रसाद आध्यात्मिक त्रास असणार्या साधकांना देते. ती साधकांना वाढदिवसानिमित्त लहानशी भेट पाठवून त्यांच्या आनंदात सहभागी होते.
३. स्वयंपूर्ण होण्याचा प्रयत्न करणे
पूर्वी मधुराला असलेल्या तीव्र आध्यात्मिक त्रासामुळे अधिक प्रमाणात माझे साहाय्य लागत होते. आता ती बर्याच प्रमाणात स्वयंपूर्ण होत आहे. प.पू. गुरुदेवांच्या अपार कृपेमुळेच तिचा त्रास आता मध्यम स्वरूपाचा झाला आहे.
४. त्रास होत असतांनाही आईची सेवा प्रेमाने करणे
मला कधी कधी आध्यात्मिक त्रास होतो. माझ्या मनात कधी नकारात्मक विचार येतात. मला कधी निराशा येते, तर कधी वयोमानानुसार काही शारीरिक त्रास होतात. त्या वेळी मधुरा मला माझ्या आध्यात्मिक त्रासांवर मात करण्यासाठी प्रेरणा देते. तिला त्रास होत असूनही ती प्रेमाने आणि मनापासून माझी सेवा करते. तेव्हा प्रेमळ आणि लाडक्या लेकीच्या सहवासात मी लहान होते अन् मला होत असलेल्या त्रासाच्या वेळी मधुरा माझी आई होते.
५. निसर्गप्रेमी आणि पक्षीप्रेमी
मधुराला खोलीच्या खिडकीतून दिसणारा निसर्ग पाहून पुष्कळ आनंद होतो. आमच्या खोलीच्या खिडकीसमोरच असलेल्या काजूच्या झाडाशी तिचा संवाद होतो. दिवसभरात झाडांवर बसणारे पक्षी तिच्याशी सूक्ष्मातून बोलतात. काही चिमण्या खिडकीच्या गजावर येऊन बसतात आणि चिवचिवाट करून तिच्याशी बोलून जातात.
सायंकाळी खोलीत येणारे सूर्याचे किरण खोलीतील भिंतीवर असलेल्या प.पू. गुरुदेवांच्या ब्रह्मोत्सवाच्या छायाचित्रावर पडतात. तेव्हा ‘तो ‘किरणोत्सव’ आहे’, असे वाटून तिला आनंद होतो. ‘मधुरा निसर्गाकडे पहात असतांना ती जणू निसर्गाशी एकरूप झाली आहे’, असे मला वाटते.
६. स्वतःतील कलागुणांतून आनंद घेणे
मधुरामध्ये अनेक कलागुणही आहेत, उदा. चित्र काढणे, चित्र रंगवणे, पाककला इत्यादी. तिला कधी उत्साह वाटत नसल्यास त्या वेळी ती नुसती झोपून न रहाता एखादे चित्र काढते, तर कधी पूर्वी काढलेले चित्र रंगवून त्यातून आनंद घेते.
७. सूक्ष्मातील ज्ञान प्राप्त करण्याच्या सेवेतील तत्परता
मधुराला त्रास होत असतांनाही ती नेहमीच सूक्ष्मातील ज्ञान प्राप्त करण्याची सेवा प्राधान्याने करते. त्या ज्ञानाच्या धारिका वेळेवर पाठवणे, त्यातील शंकांची उत्तरे देणे आणि पडताळून आलेल्या धारिकांमध्ये सुचवलेले पालट करणे, या सेवा ती तत्परतेने करते. तिचे लेख वाचून प.पू. गुरूदेवांनी ते आवडल्याचे तिला कळवल्यावर ‘आपली सेवा गुरुचरणी रुजू झाली’, याचा तिला आनंद होतो.
– सौ. कस्तुरी भोसले (सुश्री मधुरा यांच्या आई), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.५.२०२६) (क्रमश:)
अनंत कोटी ब्रह्मांडांचा नायक असलेला भगवंत सूक्ष्मातून कार्य करत असूनही त्याला देहधारणा करून पृथ्वीवर अवतार घ्यावे लागण्यामागील अध्यात्मशास्त्र !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
दैनिक ‘सनातन प्रभात’मधील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची चौकट वाचतांना श्रीराम आणि हनुमान यांच्यामधील अद्वैताच्या संदर्भात साधकाला आलेल्या अनुभूती !
अनंत कोटी ब्रह्मांडांचा नायक असलेला भगवंत सूक्ष्मातून कार्य करत असूनही त्याला देहधारणा करून पृथ्वीवर अवतार घ्यावे लागण्यामागील अध्यात्मशास्त्र !
गुर्वाज्ञापालनाचे महत्त्व सांगणारी एक बोधप्रद कथा !
इतरांचा विचार करणारे आणि सेवाभावी वृत्ती असलेले रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्री. प्रताप वंका !