आंतरराष्ट्रीय योग दिवस ही भारतियांसाठी अभिमानाची गोष्ट ! – जिल्हा न्यायाधीश अनिलकुमार अंबाळकर

रत्नागिरीत पतंजलि योग समिती परिवाराच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

रत्नागिरी – योग केल्यामुळे शरीर आणि मन सुदृढ, निरोगी बनते. योगाकडे लोक चाळिशीनंतर म्हणजे बर्‍याच उशिरा वळतात. योग ही जीवनशैली आहे. लहान मुलांचे शरीर लवचिक असते; मात्र माणूस मोठा होऊ लागल्यानंतर साचलेला मळ बाहेर काढण्याकरता आसनांचा उपयोग होतो, असे पतंजलि योगसूत्रांमध्ये सांगितले आहे. आंतरराष्ट्रीय योग दिवस ही भारतियांसाठी अभिमानाची गोष्ट आहे, असे प्रतिपादन जिल्हा न्यायाधीश अनिलकुमार अंबाळकर यांनी केले.

पतंजलि योग परिवार, अधिवक्ता परिषद, द. रत्नागिरी जिल्हा भाजप आणि सकाळ माध्यम समूहाच्या वतीने १२ व्या आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमात ते बोलत होते. माळनाका येथील ‘देसाई बँक्वेट हॉल’ध्ये कार्यक्रम झाला. याप्रसंगी या कार्यक्रमाला नगराध्यक्षा (सौ.) शिल्पा सुर्वे, विधी सेवा प्राधिकरणचे सचिव, न्यायाधीश आर्.आर. पाटील, अधिवक्ता परिषदेचे जिल्हाध्यक्ष अधिवक्ता एम्.एम्. जैन, राज्य महिला पतंजलि योग समितीच्या संरक्षक सदस्या सौ. रमा जोग, पतंजलि योग समितीचे जिल्हाध्यक्ष अधिवक्ता विद्यानंद जोग आणि भाजपचे जिल्हा सरचिटणीस ओंकार फडके आदी उपस्थित होते.

आंतरराष्ट्रीय योग दिनाविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रसंघात मांडलेल्या ठरावाला १७७ देशांनी पाठिंबा दिला आणि वर्ष २०१५ पासून हा दिन साजरा होत आहे. पतंजलि परिवाराच्या वतीने विनाखंड कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे.

नगराध्यक्षा (सौ.) शिल्पा सुर्वे यांनी सांगितले की, योग ही आपल्याला मिळालेली अमूल्य देणगी आहे. आपले शरीर निरोगी, सुदृढ ठेवण्यासाठी योग हे प्रभावी माध्यम आहे. नित्यनेमाने योग करा आणि निरोगी रहा.

या कार्यक्रमाचे औचित्य साधून रा.भा. शिर्के प्रशाला, नानल गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार आणि विविध आसनांची प्रात्यक्षिके दाखवली, तसेच स्वरदा लोवलेकर आणि सहकार्‍यांनी योगनृत्य सादर केले. योगशिक्षिका नीता साने आणि सहकार्‍यांनी योग, आसनांचे प्रात्यक्षिक सादर केले. कार्यक्रमात रत्नागिरीतील न्यायाधीश, न्यायिक अधिकारी, अधिवक्ता आणि महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. योग शिक्षक अनंत आगशे यांनी सूत्रसंचालन केले. अधिवक्त्या (सौ.) प्रिया लोवलेकर यांनी आभार मानले.

प.पू. योगऋषि स्वामी रामदेवजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली योगाभ्यास, आरोग्य जनजागृती आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश या वेळी दिला जाणार आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ‘भारत स्वाभिमान ट्रस्ट’चे जिल्हाध्यक्ष मारुति अलकुटे, युवा भारत जिल्हाध्यक्ष ब्रिजेश पटेल, महिला पतंजलि योग समितीच्या जिल्हाध्यक्ष सौ. हर्षदा डोंगरे आदींसह सर्व योगशिक्षकांनी योगदान दिले.