आजच्या काळात योगाभ्यासाकडे केवळ शारीरिक व्यायाम किंवा ताणतणाव न्यून करण्याचे मानसिक साधन म्हणून पाहिले जाते. यातूनच ‘महर्षि पतंजलि यांनी देवभक्ती सांगितली नाही’ किंवा ‘योगाभ्यासाचा देवाशी काहीही संबंध नाही’, असे चुकीचे समज काही जणांकडून पसरवले जातात; परंतु मुळात ‘पातंजलयोगसूत्र’ हा ग्रंथ अभ्यासला असता हे स्पष्ट होते की, महर्षि पतंजलि यांनी केवळ ईश्वराचा उल्लेखच केला नाही, तर ‘ईश्वराप्रती संपूर्ण समर्पण (भक्ती) हा समाधी प्राप्त करण्याचा सर्वांत जलद आणि खात्रीशीर मार्ग असल्या’चे सांगितले आहे !

१. समाधीचा सोपा मार्ग – ईश्वराची भक्ती !
महर्षि पतंजलि यांनी पहिल्याच ‘समाधीपादा’त चित्तवृत्ती निरोधाचे कठीण उपाय जसे की, श्रद्धा, वीर्य, स्मृति आणि समाधी हे सांगितल्यानंतर साधकाला एक अतिशय सोपा आणि प्रभावी पर्याय दिला आहे.
‘ईश्वरप्रणिधानाद्वा ।’
– (पातंजलयोगसूत्र १.२३)
अर्थ : किंवा ईश्वराच्या विशेष भक्तीने (प्रणिधानाने) सुद्धा समाधी लाभते.
येथे ‘वा’ (किंवा) हा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे. ‘जर एखाद्याला कठीण तपश्चर्या जमली नाही, तर केवळ ईश्वराच्या चरणी सर्वस्व अर्पण केल्यानेही योग साध्य होतो’, हे महर्षि पतंजलि यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे. त्यामुळे ‘पतंजलि यांनी भक्ती सांगितली नाही’, हे म्हणणे या सूत्राच्या थेट विरोधात आहे.
२. योगाभ्यासाचा आरंभ असलेल्या क्रियायोगाचा अविभाज्य भाग : ईश्वराशी अनुसंधान

‘साधनापादा’च्या आरंभीच पतंजलि ‘क्रियायोग’ सांगतात, जो साधकांसाठी प्रत्यक्ष कृतीचा भाग आहे.
‘तपःस्वाध्यायेश्वरप्रणिधानानि क्रियायोगः ।’
– (पातंजलयोगसूत्र २.१)
अर्थ : तप, स्वाध्याय आणि ईश्वरप्रणिधान मिळून क्रियायोग होतो.
येथे महर्षि पतंजलि स्पष्ट करतात की, योगाभ्यासाचा आरंभच मुळात ईश्वराच्या अनुसंधानाने होतो. जर तुम्ही ईश्वराला वगळले, तर तो ‘क्रियायोग’ उरत नाही, ती केवळ शारीरिक कसरत ठरते.
३. ईश्वरभक्ती हा अनिवार्य नियम, म्हणजे आचरणाचा पाया !
अष्टांगयोगातील दुसरी पायरी, म्हणजे ‘नियम’ (स्वतःसाठी पाळायची बंधने). यातही पतंजलींनी ईश्वराचा उल्लेख टाळलेला नाही.
‘शौचसंतोषतपःस्वाध्यायेश्वरप्रणिधानानि नियमाः ।’
– (पातंजलयोगसूत्र २.३२)
अर्थ : शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वरप्रणिधान हे
५ नियम आहेत.
म्हणजेच अष्टांगयोगाच्या अभ्यासात ईश्वरभक्ती हा ‘पर्याय’ नसून तो एक ‘अनिवार्य नियम’ आहे. म्हणूनच योगशास्त्राला सेश्वर सांख्य, म्हणजेच ‘ईश्वर ही संकल्पना मान्य असलेले’, असे म्हटले आहे आणि बाकी बहुतेक संकल्पना ‘सांख्य दर्शना’च्या असलेले दर्शन मानले आहे.
४. ‘ईश्वरप्रणिधान’ म्हणजे नक्की काय ?
‘ईश्वरप्रणिधान’ या शब्दाचा अर्थ पुष्कळ सखोल आहे. ‘प्रणिधान’ म्हणजे प्रकर्षाने केलेले धारण किंवा संपूर्ण शरणागती. आपण जे काही कर्म करतो (योगाभ्यास असो वा व्यावहारिक काम), त्याचे फळ ईश्वराला अर्पण करणे. ‘मी हे केले’ हा अहंकार सोडून ‘हे ईश्वराची शक्ती करवून घेत आहे’, असा भाव ठेवणे.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली म्हणतात,
‘हे मजचिस्तव जाहलें । परी म्यां नाहीं केलें । ऐसें जेणें जाणितलें । तो सुटला गा ॥’
– (‘ज्ञानेश्वरी’, अध्याय ४, ओवी ८१)
समर्थ रामदासस्वामी म्हणतात,
‘रघुनाथ स्मरोन कार्य करावें । तें तत्काळचि सिद्धि पावे । कर्ता राम हें असावें । अभ्यंतरीं ॥’
– (‘दासबोध’ ६/७/३३)
थोडक्यात ‘ईश्वरप्रणिधान’ म्हणजे ‘आत्मनिवेदन भक्ती’ होय.
५. ‘ईश्वरप्रणिधाना’चे फळ काय ?
हे सगळे संदर्भ सांगितल्यावरही काही जण म्हणतात की, ईश्वर हा केवळ एकाग्रतेसाठी एक ‘आलंबन’ (ऑब्जेक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन) आहे; पण तसे नसून महर्षि पतंजलि त्याचे फळ सांगतांना स्पष्टपणे म्हणतात,
‘समाधिसिद्धिरीश्वरप्रणिधानात् ।’
– (पातंजलयोगसूत्र २.४५)
अर्थ : ईश्वरप्रणिधानामुळे ‘समाधी’ची सिद्धी प्राप्त होते.
‘जे योगाचे अंतिम ध्येय आहे (समाधी), ते केवळ ईश्वराच्या शरणागतीने प्राप्त होते’, असे महर्षि पतंजलि ठामपणे सांगतात. यात कोणतीही संदिग्धता नाही !
योगाभ्यासाला विश्वविख्यात करण्यासाठी त्याच्या मूळ संकल्पना पालटण्याची कोणतीही आवश्यकता नाही. तसे करणे ही साक्षात् महर्षि पतंजलि यांची प्रतारणा आहे !
– वैद्य परीक्षित शेवडे, आयुर्वेद वाचस्पति, डोंबिवली.
ध्यान
हठयोग
ध्यानाचे प्रमुख शारीरिक उपयोग !
अनेक शास्त्रे सांगणारी भारतीय संस्कृती !
मंत्रांसह सूर्यनमस्कार शिकून अनुभवा स्वास्थ्य आणि शक्ती !
कंबरदुखी, पचन, ताण, मधुमेह यांवर एकाच वेळी कार्य करणारे ‘बायोमेकॅनिकल’ भुजंगासन !