संपादकीय : तीर्थक्षेत्रांच्या दु:स्थितीचे मूळ ! तीर्थक्षेत्रांच्या दु:स्थितीचे मूळ !

AI निर्मित छायाचित्र

कैलास पर्वताचे स्थान आणि अनेक ऋषिमुनींच्या तपोभूमीचे  क्षेत्र, तसेच अनेक तीर्थक्षेत्रांचे स्थान यांमुळे भारतामध्ये हिमाचल प्रदेशाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळेच हिमाचल प्रदेशाला भारतामध्ये ‘देवभूमी’ नावाने ओळखले जाते. भारतातीलच नव्हे, तर हिंदु धर्मावर श्रद्धा असलेले जगभरातील भाविक या देवभूमीत येतात. अशी ही देवभूमी भक्ती परंपरेसाठी चर्चेत यायला हवी; परंतु दुर्दैव हे आहे की, मद्यांच्या बाटल्यांचा ढीग आणि अस्वच्छता यांमुळे काही दिवसांपूर्वी हिमाचल प्रदेशाचे नाव चर्चेत आले. हिंदूंच्या देवभूमीच्या अशा प्रकारच्या अवहेलनेविषयी एका विदेशी महिलेने कळकळ व्यक्त केली. एका विदेशी महिलेला हिंदूंच्या तीर्थक्षेत्राच्या विदारक स्थितीविषयी वेदना होतात; परंतु देशातील हिंदूंना त्याविषयी खंत वाटत नाही, हे त्याहून मोठे दुर्दैव ! देवभूमीत मद्याच्या बाटल्यांचा खच आणि कचरा पाहून  ‘देवभूमीला कचर्‍याने भरू नका’, अशी कळकळीची विनंती या विदेशी महिलेने केली. समस्त हिंदूंसाठी ही स्थिती लाजिरवाणी तर आहेच; परंतु आत्मचिंतन करायला लावणारी आहे. ही स्थिती केवळ हिमाचल प्रदेशाची नाही, तर हिंदूंच्या बहुतांश तीर्थक्षेत्रांची आहे. तीर्थक्षेत्रे आणि धार्मिक स्थळी हिंदू लाखोंच्या संख्येने जातात; परंतु तेथे कसे वागावे, याची जाण किती हिंदूंना असते ? याचा विचार केला, तर हिंदूंची आणि हिंदु धर्माची विदारक स्थिती लक्षात येईल. धार्मिक स्थळी, म्हणजे अगदी जागृत मंदिरांच्या बाहेर पडलेला कचर्‍याचा ढीग, धार्मिक स्थळांच्या ठिकाणी होणारी धक्काबुक्की, सरकारीकरण झालेल्या मंदिरांमध्ये होणारा भ्रष्टाचार, मंदिरांमध्ये तोकड्या कपड्यांनी प्रवेश करणे, मंदिरांच्या जवळ असलेली मद्यालये आणि मांसविक्रीची दुकाने, धार्मिक स्थळांना आलेले पर्यटनस्थळांचे स्वरूप ही हिंदूंच्या अधोगतीची लक्षणे आहेत. हिंदु धर्माच्या र्‍हासाची जी कारणे आहेत, त्यामध्ये धार्मिक स्थळांविषयी असलेली अनास्था हे एक महत्त्वाचे कारण होय. हिंदूंनी या गोष्टींचा गांभीर्याने विचार केला नाही, तर भविष्यात हिंदूंच्या तीर्थक्षेत्रांची स्थिती अधिकच विदारक होईल.

आत्मचिंतन करावे लागेल !

हिंदूंच्या सर्वच तीर्थक्षेत्रांची उणे-अधिक प्रमाणात अशी दु:स्थिती पहायला मिळते. नुकताच अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीतील श्रीराममंदिराच्या दानपेटीमध्ये चोरी झाल्याचा प्रकार उघड झाला. या चोरीचा छडा लावण्यासाठी उत्तरप्रदेश सरकारकडून विशेष अन्वेषण पथकाची स्थापना करण्यात आली आहे. यातून सत्य प्रकार उघडकीस येईल, अशी आशा आहे; परंतु ही स्थिती काही चांगली नव्हे. महाराष्ट्रात मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिर, अहिल्यानगर जिल्ह्यातील श्री शनैश्‍वर देवस्थान, कोल्हापूरमधील श्री महालक्ष्मीदेवीचे मंदिर, महाराष्ट्राची कुलदेवता श्री तुळजाभवानीदेवीचे मंदिर अशा जागृत देवस्थानांमध्ये भ्रष्टाचार झाला असून त्याविषयी अन्वेषण चालू आहे. यांतील बहुतांश प्रकरणांमध्ये तर मंदिरांमध्ये घोटाळे करणारे त्या त्या मंदिरांचे विश्‍वस्तच असल्याचे आढळून येत आहे. यातून परिस्थिती कधीच हाताबाहेर गेली आहे, हे लक्षात घ्यायला हवे. मंदिरात अर्पण केलेल्या, म्हणजे भगवंताच्या धनावर विश्‍वस्तच डल्ला मारत आहेत. अन्वेषणाच्या नावाखाली वर्षानुवर्षे हे खटले न्यायालयात चालू आहेत. या आरोपींना राजकारणी पाठीशी घालत आहेत. अशी हिंदूंच्या तीर्थक्षेत्रांची केविलवाणी स्थिती आहे, म्हणजे केवळ मंदिराचा परिसर अस्वच्छ, मद्यालये-मांसाची दुकाने यांनी अपवित्र होत आहे, असे नाही, तर थेट आता मंदिरांमध्येच अपप्रकार चालू आहेत आणि एवढे होऊनही हिंदु समाज निद्रिस्त आहे. ही परिस्थिती निश्‍चितच हिंदूंना विचार करायला भाग पाडणारी आहे.

AI निर्मित छायाचित्र

धर्मशिक्षणाविना २ पिढ्या

ही परिस्थिती पालटायची असेल, तर या परिस्थितीला कोण कारणीभूत आहे ? याच्या मुळापर्यंत जाऊन त्यावर उपाययोजना काढणे आवश्यक आहे. हिंदूंची तीर्थक्षेत्रे ही केवळ देशाच्या संस्कृतीचेच नव्हे, तर हिंदु धर्माचे प्रतिनिधीत्व करतात. तीर्थक्षेत्रे, म्हणजे हिंदु धर्माचे शक्तीस्रोत आहेत. ज्याप्रमाणे केंद्रबिंदूमुळे वर्तुळाचा परिघ पूर्ण होतो, त्याचप्रमाणे मंदिरे आणि तीर्थक्षेत्रे ही हिंदु धर्माचा केंद्रबिंदू आहे. समस्त हिंदूंचे आणि हिंदु धर्माचे ते संरक्षककवच आहेत. राष्ट्र पारतंत्र्यात असेल, तर ते स्वतंत्र करण्याची प्रेरणा हिंदूंच्या धर्मग्रंथांतून आणि त्यासाठी लागणारी शक्ती या धर्मस्थळांतूनच मिळते. त्यामुळे या धर्मस्रोतांवरील आक्रमण, म्हणजे हिंदूंना बलहीन करण्याचा प्रयत्न आक्रमकांनी केला. मोगलांनी आक्रमण करतांना प्रथम हिंदूंची मंदिरे तोडली आणि धर्मग्रंथ जाळले. ब्रिटिशांनी त्याही पुढे जाऊन हिंदूंना धर्मशिक्षणच मिळू नये, यासाठी मेकॉले शिक्षणपद्धत निर्माण केली. मोगलांच्या तोडफोडीच्या काळातही हिंदूंना धर्मशिक्षण देणारी व्यवस्था अस्तित्वात होती; परंतु ब्रिटिशांनी ही व्यवस्थाच नष्ट केली. मेकॉले शिक्षणपद्धतीतून शिक्षण घेतलेल्या हिंदूंच्या २ पिढ्या जाऊन आता तिसरी पिढी येऊ घातली आहे. हिंदु धर्माच्या र्‍हासाचे मूळ यामध्येच आहे. हिंदूंची पुढील पिढीही धर्मशिक्षणापासून वंचित राहिली, तर मात्र हिंदु धर्माचा आणखी र्‍हास होईल. त्यामुळे येणार्‍या काळात भारतीय शिक्षणपद्धतीत हिंदु धर्म आणि संस्कृती यांचे शिक्षण मिळेल, अशी व्यवस्था करणे अनिवार्य झाले आहे. मुळात भारतासारख्या हिंदूबहुल राष्ट्रात शासकीय शाळांतूनच हिंदूंना धर्मशिक्षण मिळणे, हा त्यांचा धार्मिक अधिकार आहे. प्रत्येक देशाची राज्यघटना तेथील बहुसंख्यांकांच्या हिताचे आणि संस्कृतीचे रक्षण करणारी असते. भारतात मात्र राज्यघटना बहुसंख्यांक हिंदूंऐवजी अल्पसंख्यांकांच्या धार्मिक हिताच्या रक्षणाला झुकते माप देणारी आहे. यामध्ये पालट होणे आवश्यक आहे. सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली बहुसंख्य समाजाला धर्मशिक्षणापासून वंचित ठेवणे, हाच मुळात त्या संस्कृतीवर आघात आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतर हिंदूंना दुय्यम वागणूक देत काँग्रेसने असे अनेक आघात हिंदूंवर केले. हिंदूंचे राजकीय क्षेत्रात प्रतिनिधीत्व करणार्‍या भाजपने देशात हिंदुहिताचे रक्षण करणारी व्यवस्था निर्माण करण्याला प्राधान्य देणे आवश्यक आहे.

धर्मशिक्षण घटनात्मक अधिकार

तीर्थक्षेत्रांचे पावित्र्य न राखणे, हा एक भाग आहे. मुळात धर्माचेच महत्त्व नसल्यामुळे हिंदु समाज धर्मावरील विविध आघातांविषयी निष्क्रीय आहे. धर्मशिक्षणामुळेच हिंदूंमध्ये धर्माभिमान निर्माण होईल आणि धर्माभिमान निर्माण झालेला हिंदूच धर्मरक्षणाकरता पुढे येईल, हे सूत्र लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे हिंदुहिताचे रक्षण करणारी प्रणाली कार्यरत होण्याकडेच हिंदूंनी प्राधान्य देणे आवश्यक आहे. धर्मावरील आघातांविषयी हिंदू जागृत होत आहेत; मात्र त्यांच्यामध्ये अद्यापही धर्मशिक्षणाचा अभाव आहे. धर्माचे ज्ञान प्राप्त झाल्यास साधना आणि धर्माभिमान यांचा संगम असलेला हिंदु समाज अधिक तेजस्वी कार्य करू शकेल. यासाठी येणार्‍या काळात पुस्तकी ज्ञानासह हिंदु धर्मशास्त्र प्रत्येक हिंदूपर्यंत पोचवण्यावर हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि धार्मिक संस्था यांनी भर देणे आवश्यक आहे.