संपादकीय : अमेरिकी तरुणांची रचनात्मकता !

एकीकडे ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या माध्यमातून भारतातील काही सहस्र ‘कॉकरोच’ (तरुण) स्वत:च्या बेरोजगारीचे खापर प्रस्थापित व्यवस्थेवर फोडत आहेत. दुसरीकडे अमेरिकेतील तरुण प्रस्थापित व्यवस्था अधिक सशक्त करण्यासाठी ‘समर ऑफ लड’ उत्सव साजरा करत आहेत. भारतात अराजकाची बिजे पेरली जात आहेत, तर अमेरिकेत समाजाला सशक्त करण्यासाठी प्रयत्न होत आहेत. यामुळे भारतातील ‘नकारात्मक टीके’च्या दबावतंत्राच्या वातावरणात अमेरिकेतील ‘रचनात्मक प्रयत्ना’चे प्रतीक असलेल्या या उत्सवाचे महत्त्व समजून घेणे अधिक आवश्यक झाले आहे.

समर ऑफ लड !

‘समर ऑफ लड’ नावाचा उत्सव न्यूयॉर्कमध्ये २८ जून ते ५ जुलै या कालावधीत पार पडला. या उत्सवाचा उद्देश होता, ‘समाजाला, विशेषकरून तरुणांना सामाजिक माध्यमांच्या विखारी जोखडातून बाहेर काढणे.’ ‘डिजिटल लाईफ’ला सर्वस्व मानत असल्याने सामाजिक स्वास्थ्य गमावत चाललेल्या तरुणांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा हा प्रयत्न होता. मानवाने बनवलेल्या तंत्रज्ञानाच्या, म्हणजे स्वत:च्या जाळ्यात कोळ्याप्रमाणे मानवच अडकत चालल्याने त्याला त्याच्या बाहेर पडून त्यावर नियंत्रण मिळवण्याचा हा आशावाद कौतुकास्पद आहे. येथे हे लक्षात घेतले पाहिजे की, हा उपक्रम तंत्रज्ञानविरोधी नव्हता, तर तंत्रज्ञानाचा विवेकशील (जुडिशियस) वापर करण्यावर भर देणारा होता.

तोटेच अधिक ! (?)

सामाजिक माध्यमांच्या जोडीला ‘एआय’ने आपल्या जीवनात केलेल्या प्रवेशामुळे आयुष्य कमालीचे पालटून गेले. जगातील कोणत्याही भागातील आणि कोणत्याही विषयातील माहिती प्रत्येक व्यक्तीच्या ‘ॲट द टिप्स ऑफ युवर फिंगर्स अवे’ असते, म्हणजे भ्रमणभाषद्वारे आपल्याला ती माहिती क्षणार्धात मिळवता येते. आपली अनेक कामे आज कृत्रिम बुद्धीमत्ता करत आहे. ३ वर्षांपूर्वी ‘चॅट जीपीटी’ने तंत्रज्ञान क्षेत्रात क्रांती केली, तर आज त्याची जागा ‘क्लॉड’ घेऊ पहात आहे.

जग अत्यंत वेगवान झाले आहे. एवढे की, अनेकांना ‘फोमो’सारख्या मनोविकृती जडल्या. ‘फीअर ऑफ मिसिंग आऊट’, म्हणजेच जगातील घडामोडींविषयी सातत्याने स्वत:ला अद्ययावत् ठेवण्याच्या शर्यतीत आपण मागे रहायला नको, याचे भय सतावणे. ‘सतत ‘अपडेटेड’ असलो, तर समाजात आत्मविश्वासाने संवाद साधू शकेन’, अशी ही विचित्र चिंता. ही चिंता समाजातील एका मोठ्या घटकाला सतावत आहे. एक मोठा गट असाही आहे की, जो आपली मित्रमंडळी आणि नातेवाईक यांना भेटायला गेला, तरी आपल्या भ्रमणभाषात गुंतून समोर असलेल्या प्रत्यक्ष व्यक्तींच्या भाव-भावनांशी समरस होऊ शकत नाही. आपण सर्वांनी हे उणे-अधिक अनुभवले असणार.

आजचे तंत्रज्ञान हे मानवाला मनोविकारांच्या चक्रव्यूहात अडकवत चालले आहे. ‘नोटिफिकेशन’ येताच त्वरित भ्रमणभाष पडताळण्याचा उतावीळपणा (डोपामाईन ड्रिव्हन रिवॉर्ड लूप), झोपेवर झालेला विपरीत परिणाम, आत्मविश्वासात घट, ताण आणि मानसिक थकवा आदी अनेक समस्यांनी मनुष्य ग्रासला गेला आहे. विशेषत्वाने ‘मिलेनियल्स’, ‘जेन झी’ आणि आता काही अंशी ‘जेन अल्फा’ पिढ्या ‘डिजिटल लाईफ’च्या आहारी गेल्या आहेत. त्याची भयावहता ‘अनियंत्रित स्क्रीन टाईमचे धोके : शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य आणि एकूणच जीवनावर होणारे परिणाम’ नावाच्या ‘सेज जर्नल’ या जागतिक माध्यमावर प्रसारित झालेल्या शोधप्रबंधातून आपणास लक्षात येईल. जीन ट्वेंगी, थॉमस जॉयनर आणि गॅब्रिएल मार्टीन या मानसशास्त्रज्ञांनी सादर केलेल्या या प्रबंधानुसार जे किशोरवयीन तरुण दिवसाला ५ घंट्यांहून अधिक वेळ ‘स्क्रीन’वर घालवतात, त्यांच्या मनातील आत्महत्येचे विचार अथवा प्रत्यक्ष कृती करण्याची शक्यता १ घंट्यांहून न्यून वेळ स्क्रीनवर घालवणार्‍या तरुणांपेक्षा ७० टक्क्यांनी वाढते.

गेल्या दशकभरापासून रूढ झालेल्या ‘डिजिटल डिटॉक्स’सारख्या संकल्पना मनुष्याच्या याच विनाशकारी ‘स्क्रीन टाइम’वर लगाम आणण्यासाठी आणि मनोस्वास्थ्य चांगले राखण्यासाठी प्रयत्नशील आहेत. ॲपलने ‘स्क्रीन टाइम’ आणि गूगलने ‘डिजिटल वेलबिईंग’ यांसारखी साधने सादर करून या समस्येची नोंद घेतली. अमेरिकेतील जॉर्जटाऊन विद्यापिठातील काल न्यूपोर्ट नावाच्या वैज्ञानिकाने ‘डिजिटल मिनिमलीझम्’ आणि ‘डीप वर्क’ या पुस्तकांतून दाखवून दिले की, जर तुम्हाला रचनात्मक अन् परिणामकारक कार्य करायचे असेल, तर तुम्ही तंत्रज्ञानाचा विवेकपूर्ण वापर केला पाहिजे.

अशा धोरणांचा अंगीकार केला जात असतांना आता त्याला एका चळवळीचे रूप आले आहे. ‘समर ऑफ लड’ उत्सवात त्याचे दर्शन घडले. यात सहभागी झालेल्या शेकडो लोकांनी न्यूयॉर्क शहरात विविध उपक्रम हाती घेतले. यात शिवणकाम करण्यापासून विविध समस्यांवर खुली चर्चा यांसारखे उपक्रम होते. विशेष म्हणजे सहभागी असणार्‍यांनी भ्रमणभाषचा वापर करणे टाळले. या उत्सवाचा प्रचार करण्यासाठी कोणत्याही सामाजिक माध्यमाचा वापर करण्यात आला नाही. भित्तीपत्रके लावून आणि पुस्तिका प्रकाशित करून त्यांचे वितरण केले गेले. यास शेकडो लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. १९ व्या शतकात सूत कामगारांनी यंत्रविरोधी आंदोलन केले होते. त्यांना ‘लड’ असे म्हटले जात. आताच्या आंदोलनाचे नाव त्यातून समोर आले. अशात डामियन थॉमस या सहआयोजकाचे बोल विचारप्रवण करणारे आहेत. ते म्हणाले, ‘आमचा उद्देश एवढाच आहे की, आमच्या समाजाने कसे वागावे, यावर कुणाचे नियंत्रण आहे तुमचे कि मार्क झुकेरबर्ग यांचे ?’ थॉमस यांचे उद्बोधक विचार भारतीय (हिंदु) तरुणांनाही दिशादर्शक ठरणारे आहेत.

भारतीय तरुणांसाठी…

या उत्सवातून तंत्रज्ञानावर मानवी नियंत्रण मिळवण्याचा संदेश देण्यात आला. मानवी नियंत्रण, म्हणजे मनावरील नियंत्रण. आज सामाजिक माध्यमांची आस्थापने तरुणांच्या मनावरच नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतात. भारतीय तरुणांनी या संदर्भात वेळीच सावध होणे आवश्यक आहे. अमेरिकेतील उत्सव हा मानसिक स्तरावर कार्य करणारा वरवरचा प्रयत्न आहे. मुळात मनावर नियंत्रण मिळवण्यासाठी खोलवर जाऊन प्रयत्न होणे आवश्यक असते. त्यामुळे ‘समर ऑफ लड’सारखा उपक्रम एका अर्थी कौतुकास्पद असला, तरी त्याचा कायमस्वरूपी परिणाम होणे खचितच शक्य आहे. यासाठी हिंदु धर्मातील शिकवणीचे पुनरुज्जीवन करणे आवश्यक आहे. ‘ब्रह्मबिंदू उपनिषद’, ‘कथा उपनिषद’, ‘भगवद्गीता’ हे मनोनिग्रहावर मार्गदर्शन करण्यासह भगवंताचे नाम कसे कार्य करते, हेसुद्धा सांगतात. याचा उपयोग केला, तर हिंदु तरुण ‘हिंदु वे’मध्ये (हिंदु पद्धतीने) अधिक श्रेयस्कररित्या सामाजिक माध्यमांच्या चक्रव्यूहातून बाहेर पडतील, हे निश्चित !

तंत्रज्ञान मानवाला मनोविकारांच्या चक्रव्यूहात अडकवते. त्यावर मनोनिग्रहाद्वारे मात करण्यासाठी साधनाच आवश्यक !