ध्यान 

‘महर्षि पतंजलींनी यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी ही योगाची ८ अंगे सांगितली आहेत. (संदर्भ : योगसूत्र)

१. ध्यान म्हणजे काय ?

महर्षि पतंजलींनी सांगितलेल्या अष्टांगयोगातील ध्यान ही ७ वी पायरी आहे. ध्यान शब्द संस्कृत भाषेतील ‘ध्यै’ या धातूपासून निर्माण झाला आहे. त्याचा अर्थ ‘चिंतन करणे’, असा आहे. ध्यान एखाद्या वस्तूवर (वृक्षावर) अथवा वस्तूंच्या समुहावर (उदा. पान, फूल, खोड या अवयवांवर) करता येते. चित्ताची धारणा असेल, तेथेच चित्त स्थिर होणे आणि ते दुसर्‍या विषयावर न जाणे, याला ‘ध्यान’ असे म्हणतात.

  • ‘धारणेसाठी जो विषय निवडला असेल, त्या विषयाचा अनेक क्षणांपर्यंत व्यत्ययरहित होणारा अनुभव म्हणजे ध्यान’, अशी महर्षि पतंजलींनी ध्यानाची व्याख्या केली आहे.
  • ‘तत्र प्रत्ययैकतानता ध्यानम् ।’ (संदर्भ : योगसूत्र)

म्हणजे सैरभैर धावणारे मन ध्यानामुळे नियंत्रित होते. मनात विक्षेप उत्पन्न करणारे रजोगुण आणि तमोगुण दुर्बळ होतात अन् क्रमाक्रमाने चित्त शुद्ध होते. ध्यान हे शाश्वत आनंदापर्यंत पोचण्याचा एकमात्र राजमार्ग आहे. ध्यानासाठी यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार आणि धारणा या पहिल्या ६ अंगांची पूर्वपीठिका नितांत आवश्यकता असते. त्यांचा अभ्यास केल्याखेरीज ध्यान साध्य होत नाही. (संदर्भ : विष्णुपुराण)

२. संयम

धारणा, ध्यान आणि समाधी यांना योगशास्त्रात एकत्रितपणे ‘संयम’ अशी संज्ञा आहे. (संदर्भ : योगसूत्र) धारणेमध्ये ज्या गोष्टीवर चित्त स्थिर केले आहे, त्याच गोष्टीवर ध्यान करणे अभिप्रेत आहे.

  • महर्षि व्यास यांच्या मते ‘परमेश्वरावरील धारणा आणि ध्यान यांमुळे योग्याला समाधी शीघ्र साध्य होते आणि समाधीचे फळही मिळते.’ (संदर्भ : ‘व्यासभाष्य’ आणि ‘वार्त्तिक’)
  • महर्षि पतंजलि यांनी ‘ईश्वराच्या ध्यानाने साधनेतील सर्व विघ्ने दूर होतात’, असे म्हटले आहे (संदर्भ : योगसूत्र)
  • ‘यथाभिमतध्यानाद्वों’ (संदर्भ : योगसूत्र) या सूत्रात ‘योग्याला जे अभिष्ट (इष्ट किंवा प्रिय) असेल, त्याचे त्याने ध्यान करावे. त्यामुळे चित्ताला स्थिरता प्राप्त होते’, असे म्हटले आहे.

३. ध्यानाचे प्रकार  

‘घेरण्डसंहिते’त स्थूलध्यान, ज्योतिर्ध्यान आणि सूक्ष्मध्यान असे ध्यानाचे ३ प्रकार वर्णन केले आहेत. स्थूलध्यान हे मूर्तीवर केले जाते, ज्योतिर्ध्यान हे २ भुवयांमधील ओंकाररूपी तेजावरील ध्यान आहे, तर सूक्ष्मध्यान हे ब्रह्माची बिंदूच्या स्वरूपात कल्पना करून सिद्ध केलेले ध्यान होय. हा बिंदू आणि कुंडली देवता एकच आहेत, असे ‘घेरण्डसंहिता’ सांगते. वसिष्ठसंहितेत निर्गुण ध्यान हे ब्रह्मावर केले जाते. ब्रह्मप्राप्ती हे त्याचे उद्दिष्ट आहे, तर सगुण ध्यान हे विष्णु, वैश्वानर अग्नी, दोन्ही भुवयांच्यामध्ये असलेली ज्योत, हृदयकमळातील पुरुष आणि सोम मंडलातील आत्मा अथवा आदित्य मंडलातील पुरुष यांवर सांगितले आहे. (संदर्भ : वसिष्ठसंहिता)

४. धारणा, ध्यान आणि समाधी

धारणा आणि ध्यान यांमध्ये ध्यान करणारा साधक, ध्यानाचा विषय अन् ध्यानाची क्रिया या तिन्ही गोष्टींची जाणीव स्पष्ट असते. समाधीत मात्र केवळ ध्यानाचा विषयच चित्त व्यापून रहातो. धारणेतील विषयाच्या जाणिवेचे विघ्नरहित सातत्य टिकवणे, म्हणजे ध्यान. ‘ध्यानाच्या अवस्थेची होणारी परिणती, म्हणजे समाधी होय.’ धारणा, ध्यान आणि समाधी ही एकाग्रतेची उत्तरोत्तर विकसित होत जाणारी रूपे आहेत. ध्येय, ध्याता आणि ध्यान या त्रिपुटीच्या जाणिवेचा लोप, म्हणजे ‘समाधी’ होय.

५. ध्यान करण्याचे लाभ

  • अष्टांगयोगात ध्यान हे अंतिम सत्य आहे. ज्यात व्यक्तीला अंतर्ज्ञान प्राप्त होते.
  • ध्यान केल्याने व्यक्तीला आंतरिक शांती आणि आनंदी जीवनाचा अनुभव येतो.
  • ध्यान केल्याने तणाव न्यून होतो, मानसिक आरोग्य सुधारते आणि आत्मजागरूकता वाढते.
  • ध्यानातून निसर्गाशी एकरूपता साधता येते. निसर्गाचे संकेत समजू लागतात.
  • ‘स्वतःमध्ये स्थित असणे’, असा स्वास्थ्य शब्दाचा अर्थ आहे. ध्यानामुळे ही स्थिती प्राप्त होते.
  • शारीरिकदृष्ट्या बलवान, मानसिकदृष्ट्या शांत, स्थिर आणि भावनिकदृष्ट्या मृदु असणे, म्हणजे निरोगी असणे. ध्यानापर्यंतच्या अष्टांगयोगाच्या सरावामुळे साधकाला आरोग्य मिळते.
  • ध्यानातून साधक ऊर्जासंपन्न होऊन तेजःपुंज होतो.
  • प्राणायाम आणि ध्यान यांमुळे मनातील सर्जनशीलता उमलत जाते.
  • ध्यानाच्या सरावाने साधक निरिच्छ होत जातो आणि इतरांच्या कल्याणासाठी क्रियाशील रहातो.
  • विश्वातील प्रत्येक संवाद हा स्पंदनांद्वारे होतो. ध्यानामुळे शरिरातील आणि शरिराच्या प्रत्येक पेशीतून होणारी स्पंदने अधिकाधिक सकारात्मक होतात.

(साभार : ‘समय निरामय’ पंचांग)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.