विस्मरण होण्याची कारणे आणि स्मरणशक्ती चांगली ठेवण्यासाठीचे उपाय !

‘कोविड’ महामारीनंतर विशेषकरून विस्मरण होणे, इतक्यातच घडलेले प्रसंग नीट न आठवणे, छोट्या गोष्टी विसरणे, नाव लक्षात न रहाणे, अशा लक्षणांचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. ‘डिमेंशिया’ या संबोधनाखाली अनेक लक्षणे दिसतात. प्रत्येकाला त्या नावाखाली घातले नाही, तरी स्मरणशक्ती न्यून होत जाणे, इंद्रिये कमकुवत होणे, ही वयानुसार येणारी पायरी सध्या मात्र लहान वयापासून वाढीव प्रमाणात दिसत आहे. याची पुढील काही कारणे आहेत –


विस्मरण होण्याची कारणे

१. प्रदूषित हवेमुळे नाकातून रक्तात सूक्ष्म हानीकारक कण जाऊन मेंदूतील स्मरणशक्तीसाठी कारणीभूत अवयवांमध्ये झीज करतात. याने स्मरणशक्ती आणि विचारशक्ती दोन्हींवर परिणाम होतांना दिसतो.

२. झीज होणे, हे वाताचे कर्म आहे. सध्या विचित्र हे झाले आहे की, आरामदायक वातावरणामुळे (वातानुकूलित खोली, सुखासन, शारीरिक कष्ट फारसे नसणे) अन्न पोटात तर जाते, वजन वाढते; पण योग्य धातूंपर्यंत पोचत नाहीत. थोडक्यात अंगी लागत नाही. आयुर्वेदानुसार वयाच्या ७० वर्षांनंतर वाताचा काळ चालू होतो; पण सध्या शारीरिक ताण नसले, तरी मानसिक ताण वात वाढवतात आणि मेंदूवर लहान वयापासून परिणाम करतांना दिसतात.

३. नद्या आणि भाज्या यांच्यामधील विविधता न्यून झाल्याने शहरातील लोकांच्या पोटामध्ये विशिष्ट पद्धतीचे काही ‘बॅक्टेरिया’ दिसेनासे होऊ लागले आहेत. यातच कामाचे स्वरूप, चिंता आणि पोटाचे आजार यांमुळे आतड्याचा सूक्ष्म विदाह होत रहातो. पोषकांश नीट पोचत नाहीत. मुख्यतः ग्रहणीसारखे आजार आणि त्यातून पोषकांश कमतरता याने स्मरणशक्ती अन् विचारशक्ती न्यून होतांना दिसते.

४. सतत शोक, चिंता यांमुळे एकाग्रता करणे कठीण होते. यामुळे गोष्टी स्मरणात ठेवण्याची क्षमता न्यून होते. ‘कोविड’ महामारीनंतर ज्या व्यक्तींमध्ये आधीपासून विचारशक्ती आणि स्मरणशक्ती संबंधी त्रास होते, ते पुष्कळ वाढलेले दिसत आहेत.

५. प्रतिदिन साधारण १-२ घंट्यांचे ‘माईंडलेस स्क्रोलिंग’ (वेळेचे भान न रहाता भ्रमणभाष वा टीव्ही पहात रहाणे) कुठल्याही गोष्टीवर एकाग्रता करण्याची क्षमता न्यून करते.

६. मद्यपान (कितीही अल्प असले, तरी त्यातील वारंवारता महत्त्वाची), सिगारेट, तंबाखू आणि इतर व्यसने विचारशक्ती अन् स्मरणशक्ती यांसाठी अतिशय घातक आहेत. मेंदूवर काम करणार्‍या, मन शांत करणार्‍या आणि झोप आणणार्‍या औषधी गोळ्यांची जुनाट सवयही यादृष्टीने त्रासदायक आहे.

अवयव सुरक्षित ठेवण्यासाठीचे उपाय

मेंदू आणि इंद्रिये हे अवयव अतिशय जपायला हवेत. या अवयवांना काही त्रास झाल्यास त्याची दुरुस्ती अवघड असते आणि त्याच्या बदल्यात मेंदू किंवा नसा मिळण्याइतके शास्त्र प्रगत नाही. जेव्हा बाह्य परिस्थिती पालटता येणे शक्य नाही, तेव्हा आपल्या अवयवांना सुरक्षित ठेवण्यासाठी पुढील काही गोष्टी करता येतील –

१. अभ्यंग : शरीर किंवा किमान डोके आणि पाय या ठिकाणी लावलेले तेल वात आटोक्यात ठेवते, शारीरिक झीज होण्याचा वेग न्यून करते. सध्या डोक्याला तेल लावणे जवळपास बंद झाले आहे.

२. नस्य : नाकावाटे टाकलेले औषधी सिद्ध तेलाचे किंवा तूपाचे २-२ थेंब खांद्यावरील सर्व अवयव, म्हणजेच नाक, मेंदू आणि ज्ञानेंद्रिये यांचे काम चांगले ठेवते. चिंता सहन करण्याची क्षमता वाढवते. स्मरणशक्ती चांगली ठेवते. तुम्ही प्रदूषणयुक्त भागात रहात असल्यास बाहेर जातांना मुखपट्टीचा आवर्जून वापर करा. प्रदूषणयुक्त भागाच्या आसपास व्यायाम न करणे, नस्य शक्य नसल्यास नाकातून तेल / तूप यांचे बोट फिरवणे, श्‍वासाचे व्यायाम करावेत.

३. चांगली झोप : चांगली झोप घेणेे महत्त्वाचे आहे. भरपूर स्वप्ने, तुटक झोप किंवा झोप न लागणे यांवर औषधे घ्यावीत. डोक्याच्या ठिकाणी तेलात भिजवलेला कापूस (शिरोपिचू) ठेवणे, शिरोधारा, लेप, वैद्यकीय सल्ल्यानुसार नस्य हे उपाय करावेत.

वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये

४. आयुर्वेदाचे उपचार : सुवर्ण, अश्‍वगंधा, ब्राह्मी, तगर, गोरखमुंडी, शंखपुष्पी, औषधी सिद्ध तूप या व्यतिरिक्त इतर शारीरिक लक्षणांनुसार मनावर काम करणारी औषधे मेंदू आणि स्मरणशक्ती नीट ठेवायला साहाय्य करतात. यातही वैद्यकीय सल्ला घेणे महत्त्वाचे !

५. पचन : हे चांगले असणे आवश्यक आहे. पोटाचे त्रास मेंदूवर आणि पर्यायाने त्याच्या सर्व कामांवर परिणाम करतात. प्रतिदिन पोट साफ होणे आणि पोषण तत्त्व नीट पोचणे आवश्यक आहे. तसे नसेल, तर चाचण्या करून औषधोपचार लगेच चालू केले, तर लाभ होतो.

६. अन्य : ‘विसराळूपणा वाढत चालला आहे’, असे लक्षात आल्यास वेळीच चाचण्या करून घेणे उपयोगी ठरते. मानसिक ताणाची कामे सतत असलेल्या लोकांमध्ये ‘ब्राह्मी’सारख्या काही वनस्पतींपासून सिद्ध केलेल्या तूप, नस्य, शिरोधारा यांचा उपयोग करता येतो. ध्यान आणि नामस्मरण यांचाही लाभ होतो.

प्रतिदिन काही ना काही वाचन किंवा पाठांतर याची सवय ठेवावी. जे वाचू ते परत परत वाचून लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करावा. नवीन काहीतरी शिकत रहावे, त्यावर चर्चा कराव्यात. याने मेंदू ताजातवाना रहातो आणि नवीन गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी साहाय्य होते.

७. लहान मुलांविषयी घ्यावयाची काळजी : लहान मुलांमध्ये त्यांच्या हातात भ्रमणभाषचे नियंत्रण न देता त्याचा यथायोग्य वापर करावा. मूल एक जागी स्वस्थ बसत नसेल, सतत वळवळ करत असेल, अभ्यासाची बैठक फारच अल्प असेल; तोंडाला लाळ, वारंवार शिंका, मलप्रवृत्ती अधिक वेळ होत असेल, तर मेंदूची वाढ पूर्ण नीट होत नाही, एकाग्रता आणि स्मरणशक्ती अल्प पडते. अशांमध्ये बर्‍याचदा ‘कृमी’ (जंत) या रोगाचे निदान होते. अशांमध्ये केवळ एक वेळ कृमीची गोळी न देता कृमी परत होऊ नये, यासाठी औषधे दिली जातात आणि त्यानंतर बुद्धीवर काम केले जाते. याविषयी आयुर्वेदाचा दृष्टीकोन फार वरचढ ठरतो.

लहान मुलांमध्ये रासायनिक रंग आणि ‘पॅकेट फूड’ (पाकीट बंद अन्न) न्यूनतम ठेवणे अतिशय आवश्यक आहे. त्यातील रंग मेंदूला घातक आहेत. या व्यतिरिक्त ‘प्रज्ञाविवर्धन स्तोत्र’, ‘गणेश स्तोत्र’ त्यांच्याकडून प्रतिदिन म्हणून घ्यावीत.

ज्ञानेंद्रिये आणि मेंदू यांच्यासंबंधी सर्व गोष्टींची काळजीच घ्यायला लागते. बाहेरील कारणांचा जोर जितका अधिक असतांना तर अधिकच काळजी घ्यायला लागते.

– वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये, यशप्रभा आयुर्वेद, पुणे. (१५.६.२०२६)