आज १९ जून या दिवशी सरसेनापती नेताजी पालकर यांच्या ‘घरवापसी’ला (हिंदु धर्मात परत घेण्याला) ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने...
छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक देशातील एक महत्त्वपूर्ण घटना असून त्या घटनेचे पडसाद देशाच्या विविध भागांत उमटले होते. त्या काळात संदेशवहनाची अपुरी साधने असतांनासुद्धा सातासमुद्रापलीकडे छत्रपती शिवरायांच्या शिवराज्याभिषेकाची चर्चा झाली होती. ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशी शके १५९६, म्हणजेच ६ जून १६७४ या दिवशी श्री शिवराज्याभिषेकाच्या नंतर स्वराज्यात काही आमूलाग्र पालट झाले होते. त्यामध्ये स्वभाषा, स्वदेशी आणि स्वधर्म इत्यादींचा उल्लेख होतो. स्वधर्मासाठी परधर्मात गेलेल्यांचे शुद्धीकरण, म्हणजेच ‘घरवापसी’ची मोहीम चालू करण्यात आली होती. आज देशात ‘घरवापसी’ हा शब्दप्रयोग प्रसारमाध्यमे आणि समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात चर्चिला जात असतो. कधी कधी तर दूरचित्रवाहिन्यांवर ‘घरवापसी’ विषयावर खुली चर्चा अनेक वेळा होत असते. त्यामुळे घरवापसी म्हणजे काय ? याची चर्चा करणे आवश्यक आहे. प्रलोभन, दबावतंत्र किंवा बळजोरीने हिंदु धर्माचा त्याग करून एक पोथीवादी धर्माचा स्वीकार केलेल्या हिंदूंना त्यांचे शुद्धीकरण करून पुन्हा स्वधर्मात सन्मानाने परत घेण्याच्या प्रक्रियेला ‘शुद्धीकरण मोहीम’ किंवा ‘घरवापसी’ म्हटले जाते. ‘घरवापसी’ हा शब्दप्रयोग आज कुणाला जरी नवीन वाटत असेल; परंतु महाराष्ट्रात त्याची पहिली मोहीम छत्रपती शिवाजी महाराज यांनी ३५० वर्षांपूर्वी केलेली आहे. इस्लामी सत्तेच्या जुलूमी काळात जी माणसे हिंदु धर्म सोडून परधर्मात गेली होती, त्यांचे शुद्धीकरण करवून हिंदु धर्मात घेण्याचे कठीण काम छत्रपती शिवरायांनी केलेले आहे. बजाजी निंबाळकर आणि नेताजी पालकर यांच्या शुद्धीकरणाचा शिवकालीन इतिहासामध्ये उल्लेख आहे.

१. छत्रपती शिवरायांकडून शुद्धीकरण मोहिमेला प्रोत्साहन
परकीय इस्लामी आक्रमकांच्या जुलूमी टोळ्या हिंदुस्थानमध्ये आल्या, तेव्हा त्यांनी तलवारीच्या जोरावर हिंदु समाजावर प्रचंड अत्याचार करून धर्मांतरे घडवून आणली. क्रूरकर्मा औरंगजेबाच्या काळात हिंदु समाजावरील अत्याचाराला सीमा उरल्या नव्हत्या. तीर्थयात्रांवर जिझिया कर आणि धर्मांतर, हे औरंगजेबाचे सर्वांत मोठे अत्याचार होते. गुरुपुत्र जोरावरसिंह आणि छत्रपती संभाजी राजे यांचा धर्मांतरासाठी प्रचंड छळ केला होता, तसेच तत्कालीन हिंदु समाजव्यवस्थेत मुसलमानांनी बाटवलेल्यांना हिंदु धर्मात परत घेण्यास हिंदूंचाच फार मोठा विरोध असायचा. धर्मांतरित माणसाला अपवित्र मानून संबंधसुद्धा तोडले जात. त्यामुळे छत्रपती शिवरायांनी समाजाचा हा विरोध मोडून काढण्यासाठी शुद्धीकरण मोहीम, म्हणजेच घरवापसीला प्रोत्साहन दिले होते. त्यासाठी यंत्रणासुद्धा उभी केली होती; कारण त्या काळात बाटवलेल्यांना स्वधर्मात परत घेण्याची कोणतीही सोय किंवा धार्मिक विधी नव्हता; परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांनी हा अन्यायकारक नियम मोडून काढण्यासाठी ‘शुद्धीकरण’, म्हणजेच ‘घरवापसी’ मोहीम हाती घेतली होती.
आज ‘घरवापसी’ मोहीम प्रभावी करणे आवश्यक !

‘धर्मांतर, म्हणजे राष्ट्रांतर’ आणि ‘घरवापसी मोहीम, म्हणजे राष्ट्र पुनर्जागरण’, हा उदात्त विचार घेऊन आपल्या देशात शुद्धीकरण म्हणजेच ‘घरवापसी’ चळवळ चालू झाली असून त्याची मूळ प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज यांचीच आहे. ३५० वर्षांपूर्वी छत्रपती शिवरायांनी ही मोहीम चालू केली होती. अनेक वर्षे इस्लामी धर्मात राहिलेल्या बजाजी निंबाळकर यांच्यापासून नेताजी पालकर आणि त्यांच्या बायका-मुलांनाही छत्रपती शिवरायांनी शुद्ध करून घेतले. त्यामुळे आज राष्ट्रहितासाठी ख्रिस्ती आणि मुसलमान झालेल्या लोकांनी स्वतःला शुद्ध करून घेण्यासाठी शुद्धीकरण, म्हणजेच ‘घरवापसी’ मोहीम प्रभावी करणे आवश्यक आहे.
– श्री. अशोक राणे
२. बजाजी निंबाळकर यांचे शुद्धीकरण
महाराष्ट्रात आदिलशाही, कुतूबशाही, मोगल यांच्या इस्लामी सत्तेचा मोठा प्रभाव होता आणि त्यांनी बाटवाबाटवीसुद्धा केली आहे. इस्लामी सत्तेने केलेल्या बाटवाबाटवीमध्ये फलटणचे मोठे प्रस्थ आणि बलाढ्य सरदार बजाजी निंबाळकर यांचा उल्लेख केला जातो.

विजापूरच्या दरबारात आदिलशाही राजवटीने बजाजी निंबाळकर यांना बाटवून मुसलमान केले होते; परंतु छत्रपती शिवरायांनी आदिलशाही सत्तेचा मोठा प्रभाव असतांनासुद्धा बजाजी निंबाळकर या प्रतिष्ठित सरदारास पुन्हा शुद्ध करून हिंदु धर्मात परत घेतले. बळाच्या माध्यमातून बजाजीस बाटवले असल्याने त्याचा काही दोष नसल्याने छत्रपती शिवाजी महाराज आणि मातोश्री जिजाबाई यांनी शुद्धीकरण घडवून आणले होते. त्यामुळेच त्यांच्या शुद्धीकरणास मान्यतासुद्धा मिळाली. शिखर शिंगणापूरच्या मंदिरात पंडितांकडून विधीपूर्वक ‘घरवापसी’, म्हणजेच शुद्धीकरण करून घेतले होते, तसेच शुद्धीकरणानंतर पुन्हा हिंदु समाजात पूर्णपणे एकरूप होऊन समाजात सन्मानाचे स्थान मिळणे आवश्यक असल्याने छत्रपती शिवरायांनी स्वतःची मुलगी सखुबाई हिचा विवाह बजाजी निंबाळकर यांचा मुलगा महादजी याच्याशी लावून दिला. यासह त्याला पुणे परगण्यात पाटीलकीसुद्धा दिली होती. छत्रपती शिवाजी महाराज यांनी केवळ शुद्धीकरण मोहीम राबवली नाही, तर त्या शुद्धीकरणास समाजात प्रतिष्ठाही मिळवून दिली.
हे ही वाचा → १९ जून हा ‘राष्ट्रीय घरवापसी दिन’ म्हणून साजरा करा ! – हिंदु जनजागृती समिती |
३. महंमद कुली खानचे पुन्हा नेताजी पालकर
छत्रपती शिवरायांनी बजाजी निंबाळकर यांच्याप्रमाणे दुसरी महत्त्वाची ‘घरवापसी’ नेताजी पालकर यांची घडवून आणली होती. नेताजी पालकर हे शिवकालीन इतिहासामधील पराक्रमी योद्धा होते. सरसेनापती नेताजी पालकर यांना ‘प्रति शिवाजी महाराज’सुद्धा म्हटले जात असे. छत्रपती शिवाजी महाराज आगरा येथून सुटल्यानंतर चवताळलेल्या औरंगजेबाच्या आदेशाने नेताजी यांना अटक करण्यात आली. धारूर किल्ल्यावर त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्यांना देहलीला नेण्यात आले. इस्लाममध्ये धर्मांतर करून त्यांचे ‘महंमद कुली खान’, असे नामकरण करण्यात आले होते. नेताजी पालकर महंमद कुली खान म्हणून जवळपास १० वर्षे औरंगजेबाच्या चाकरीत होते. स्वराज्यापासून दूर ठेवण्यासाठी त्यांना औरंगजेबाने अफगाणिस्तानातील काबूल-कंदहार मोहिमेवर पाठवले होते.

वर्ष १६७६ च्या मोहिमेत ते दिलेरखानासह महाराष्ट्रात आले. त्याच काळात इस्लामी फौजेला चकमा देऊन ते रायगडावर पोचले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना भेटले. दरबारात त्यांनी पुन्हा हिंदु धर्मात घेण्याची विनंती केली. त्यानंतर छत्रपती शिवरायांच्या आदेशाने आषाढ कृष्ण चतुर्थी, म्हणजेच १९ जून १६७६ या दिवशी रायगडावर त्यांचे शुद्धीकरण करण्यात आले होते. नेताजी पालकर यांच्या शुद्धीकरणानंतर त्यांना समाजात प्रतिष्ठा मिळावी; म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांचे आपल्या घराण्याशी वैवाहिक संबंध जोडले. प्रचलित ऐतिहासिक उल्लेखांनुसार छत्रपती शिवरायांची कन्या कमळाबाई हिचा विवाह नेताजी पालकर यांचा मुलगा जानोजीराव पालकर यांच्याशी लावून दिला होता.
– श्री. अशोक राणे, मुक्त पत्रकार तथा लेखक; पूर्व सदस्य, मुंबई येथील साहित्य आणि संस्कृती मंडळ, अकोला.
‘नशामुक्त’ राज्य ?
हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी हिंदुत्वाचा पुन्हा एकदा जागर करण्यासाठी, हीच ती योग्य वेळ !
कर्नाटकातील गृहमंत्री तथा काँग्रेसचे प्रियंक खरगे यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका, म्हणजे बौद्धिक दिवाळखोरी !
अनंत कोटी ब्रह्मांडांचा नायक असलेला भगवंत सूक्ष्मातून कार्य करत असूनही त्याला देहधारणा करून पृथ्वीवर अवतार घ्यावे लागण्यामागील अध्यात्मशास्त्र !
गुर्वाज्ञापालनाचे महत्त्व सांगणारी एक बोधप्रद कथा !