सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर श्रद्धा असलेल्या आणि शारीरिक त्रासांतही नृत्यकलेतून आनंद मिळवणार्‍या मडगाव (गोवा) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (कु.) चांदणी आसोलकर (वय ३१ वर्षे) !

कै. (कु.) चांदणी आसोलकर

५.६.२०२६ या दिवशी कु. चांदणी आसोलकर (वय ३१ वर्षे) हिचे निधन झाले. कु. चांदणी ६ – ७ वर्षांपासून डायलिसिसवर (टीप १) होती. वर्ष २०२५ च्या गोवा येथे झालेल्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’ पासून महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत विभागातील साधिकांचा तिच्याशी संगीत सेवेच्या निमित्ताने संपर्क आला. ती चिकाटीने भरतनाट्यम् शिकली आणि ती कथ्थकही शिकत होती. ती भरतनाट्यम् नृत्य शिकवण्याचे वर्गही घेत होती. १५.६.२०२६ या दिवशी तिच्या निधनानंतरचा ११ वा दिवस आहे. त्यानिमित्त ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत विभागातील साधिकांच्या लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

कै. (कु.) चांदणी आसोलकर

टीप १ – ‘मूत्रपिंडांची कार्यक्षमता न्यून झाल्याने रक्तातील अशुद्ध घटक आणि अधिक मात्रेतील द्रवपदार्थ यंत्राद्वारे शरिरातून बाहेर काढून टाकण्याची प्रक्रिया !’

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘मडगाव, गोवा येथील कु. चांदणी आसोलकर हिला नृत्याची आवड होती. ती भरतनाट्यम् आणि कथ्थकही शिकत होती. वर्ष २०२५ मध्ये झालेल्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’तील नृत्यात ती सहभागी झाली होती. पुष्कळ शारीरिक त्रास असूनही तिच्यातील तळमळीमुळे ती महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत शिबिरालाही उपस्थित राहिली होती. त्या वेळी तिने उत्तम प्रकारे नृत्याचे सादरीकरण केले होते. कु. चांदणीने तिच्या शारीरिक स्थितीविषयी कधीही दुःख व्यक्त केले नाही. ती सतत आनंदी असायची. ‘शारीरिक त्रासांतही तिची नृत्य करण्याची जिद्द आणि देवावरील श्रद्धा अन् भाव यांमुळे तिची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाली आहे.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (११.६.२०२६) 

१. सौ. भक्ती कुलकर्णी, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. 

सौ. भक्ती कुलकर्णी

१ अ. शारीरिक व्याधी असूनही प्रसन्न दिसणे : ‘चांदणीकडे पाहिल्यावर तिला इतक्या शारीरिक व्याधी आणि त्रास आहेत’, असे वाटत नव्हते. ती नेहमी प्रसन्न असे.

१ आ. प्रेमभाव : चांदणी ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त सादर करायच्या नृत्यात सहभागी होती. तेव्हा ती प्रतिदिन नृत्याच्या सरावासाठी येत असे. ती तिच्या घरची चाफ्याची फुले आणि केळी साधकांसाठी आणत असे.

१ इ. सेवेची तळमळ : चांदणीचे मनोबलही पुष्कळ चांगले असल्याने तिने असाध्य गोष्टी साध्य केल्या होत्या, उदा. तीव्र शारीरिक त्रासांतही घंटोन्‌घंटे नृत्याचा सराव करणे आणि नृत्यातील गिरक्या घेणे.’

२. कु. अपाला औंधकर (आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय १९ वर्षे), भरतनाट्यम् विशारद, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा.  

कु. अपाला औंधकर

२ अ. इतरांचे मनापासून ऐकून त्याप्रमाणे कृती करणे : ‘चांदणीताई  ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त समूह नृत्यसेवेत सहभागी झाली होती. नृत्याचा सराव करतांना तिला मुद्रा किंवा पदन्यास (पायांच्या लालित्यपूर्ण हालचाली) यांविषयी सांगत असतांना ती ते मनापासून ऐकून त्याप्रमाणे कृती करायची. तिला नृत्यसेवेत कुणीही सुधारणा सांगितल्यावर ती त्वरित प्रयत्न करायची. ‘मी वयाने मोठी आहे आणि साधिका वयाने तिच्यापेक्षा लहान आहेत’, असा विचार ती करत नव्हती.

२ आ. स्वतःच्या शारीरिक स्थितीविषयी कधीही दुःख व्यक्त न करणे आणि ती सतत आनंदी असणे : चांदणीताईने तिची शारीरिक स्थिती पूर्णतः स्वीकारली होती. तिने तिच्या शारीरिक स्थितीविषयी कधीही दुःख व्यक्त केले नाही. ती सतत आनंदी असायची. वर्ष २०२५ च्या मे मासात आम्ही प्रतिदिन नृत्याचा सराव करायचो. तेव्हा पुष्कळ उन्हाळा होता. तिला एक आड एक दिवस ‘डायलिसिस’साठी जावे लागायचे. ती ‘डायलिसिस’ करून नृत्याच्या सरावाला येत असे. त्याविषयी तिने कधीही गार्‍हाणे केले नाही. तिची पुष्कळ तळमळ होती.

२ इ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या समोर नृत्य करण्याची संधी मिळणे आणि तेव्हापासून ‘नृत्य केवळ कला नाही, तर भगवंताला अनुभवण्याचे माध्यम आहे’, याची जाणीव होणे : ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’मध्ये समूह नृत्यसेवेत चांदणीताईला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या समोर नृत्य करण्याची संधी मिळाली होती. तेव्हापासून तिचा नृत्याकडे पहाण्याचा दृष्टीकोनच पालटला होता. ‘नृत्य केवळ कला नाही, तर भगवंताला प्रभावीपणे अनुभवण्याचे माध्यम आहे’, याची तिला जाणीव होऊ लागली. ‘तिच्या जीवनात शारीरिक त्रासांमुळे अनेक कठीण प्रसंग आले, तरीही तिला नृत्यकलेमुळे आनंद मिळत होता’, असे तिने सांगितले.

२ ई. ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी आपल्याला आणि संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी साधना शिकवली आहे’, या प्रती तिचा पुष्कळ कृतज्ञताभाव होता.’

२ उ. ‘देवाला प्रत्येक साधकाच्या साधनेची काळजी असते’, हे लक्षात येणे : ‘चांदणीताईचे शारीरिक प्रारब्ध तीव्र होते; मात्र तिच्या देवावरील श्रद्धेमुळे देवाने गत एका वर्षात तिला ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त, तसेच संगीत शिबिर, संगीत सत्संग यांत तिला सहभागी करून घेतले आणि या माध्यमांतून तिला साधनेची संधी दिली. यावरून ‘देवाला प्रत्येक साधकाच्या साधनेची काळजी असते’, हे माझ्या लक्षात आले.’

३. सौ. अनघा शशांक जोशी (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय ४५ वर्षे), बी.ए. संगीत, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा.

सौ. अनघा जोशी

३ अ. शिकण्याची वृत्ती : ‘वर्ष २०२५ च्या नोव्हेंबरमध्ये महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने ३ दिवसीय संगीत शिबिर आयोजित केले होते. शिबिराला २ दिवस शेष असतांना चांदणीताईचा त्रास वाढल्यामुळे तिला रुग्णालयात भरती करावे लागले. तिला पुष्कळ शारीरिक त्रास आणि थकवा असल्याने आधुनिक वैद्यांनी तिला संपूर्ण विश्रांती घेण्यास सांगितली होती, तरीही संगीत साधना शिबिराला येण्याची तिची तीव्र तळमळ होती.

३ आ. सेवेची तीव्र तळमळ 

३ आ १. शारीरिक स्थिती नाजूक असूनही ‘जिद्द आणि गुरूंवरील श्रद्धा’ या बळावर शिबिरात नृत्य सादर करणे : चांदणीची शारीरिक स्थिती नाजूक असूनही ती शिबिराला आली होती. ती केवळ शिबिराला आली नाही, तर तिने शिबिरातील एका प्रयोगातील नृत्यात सहभाग घेतला होता. तिला पुष्कळ थकवा असूनही ‘तिच्यातील जिद्द आणि गुरूंवरील श्रद्धा’ या बळांवर तिने शिबिरात नृत्य सादर केले. तिचे नृत्य पाहून उपस्थित सर्वांना विविध आध्यात्मिक अनुभूतीही आल्या.

३ आ २. रुग्णालयात असल्याने सेवा करता येत नसल्याची खंत वाटणे : २१.५.२०२६ या दिवसापासून ती रुग्णालयात भरती होती. ती त्याच कालावधीत सेवेला येणार होती; मात्र ती सेवेला येऊ शकली नाही. ती रुग्णालयात असतांना माझे तिच्याशी भ्रमणभाषवरून बोलणे झाले. तेव्हा ‘‘मला सेवेसाठी यायला मिळाले नाही’’, अशी खंत तिने माझ्याकडे व्यक्त केली. यातून तिची सेवेची तळमळ माझ्या लक्षात आली.

३ इ. जिज्ञासू वृत्ती : चांदणीला संगीत शिबिरातील एखादा विषय समजला नाही, तर ती त्वरित विचारून घेत असे. शिबिरातील गटचर्चेच्या वेळी ती संगीत साधनेविषयक सगळी सूत्रे जिज्ञासेने जाणून घेत होती.

३ ई. संगीत शिबिर झाल्यावर शिबिरातील मुलांसाठी संगीत सत्संग चालू केला. या सत्संगालाही ती नियमित उपस्थित असायची.

३ उ. चांगली आकलनक्षमता : उत्तरदायी साधक संगीत सत्संगात आधीच्या सत्संगातील विषयांचा आढावा घेत असतांना चांदणी आधीच्या सत्संगातील सूत्रे अचूक सांगायची.

३ ऊ. मनमोकळेपणा : संगीत शिबिरातील गटचर्चा असो किंवा सत्संग असो, ती मोकळेपणाने त्यात सहभाग घ्यायची. ‘ती मोकळ्या स्वभावाची होती’, असे मला जाणवले.

३ ए. प्रामाणिकपणा : सत्संगात एखादे ध्येय दिले असेल आणि कधी तिचे ते ध्येय पूर्ण झाले नाही, तर ती तसे प्रामाणिकपणे सांगायची. संगीत शिबिराच्या वेळी असलेल्या गटचर्चेतही ती प्रामाणिकपणे तिची सूत्रे सांगत असे.’

३ ऐ. कु. चांदणी आसोलकर हिने संगीत शिबिरात गुरूंप्रती व्यक्त केलेली भावपूर्ण कृतज्ञता ! : ‘संगीत शिबिराला येऊ शकणे’, हीच माझ्यासाठी एक अनुभूती आहे. हे गुरूंच्याच (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) कृपेने शक्य आहे. मी एकटी काहीच करू शकत नाही. प्रत्येक वेळी गुरुदेव मला प्रेरणा देतात.’

‘देवाने चांदणीची साधनेत प्रगती करून घ्यावी’, अशी आमची ईश्वरचरणी प्रार्थना आहे.’

(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : ६.६.२०२६)