‘हिंदु जनजागृती समिती विविध उपक्रमांच्या माध्यमातून हिंदूंमध्ये स्वधर्माविषयी जागृती निर्माण करण्यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न करत आहे, उदा. धर्मशिक्षणवर्ग, साधना-सत्संग, आंदोलने, प्रवचन, ग्रंथप्रदर्शने इत्यादी. या सर्व उपक्रमांमध्ये हिंदु समाजाचे लक्ष वेधून घेणारा अत्यंत सोपा आणि प्रभावी असा उपक्रम, म्हणजे ‘फलकप्रसिद्धी’ ! हिंदु जनजागृती समिती फलकप्रसिद्धीच्या उपक्रमांद्वारे राष्ट्र आणि धर्म जागृतीचे कार्य करत असतांना एक समविचारी संस्था म्हणून सनातन संस्थेचे ग्रंथ, नियतकालिके अन् सात्त्विक उत्पादने यांविषयीचीही माहिती लोकांपर्यंत पोचवते. हिंदु धर्मातील विविध आचार, सण-उत्सव, विशेष दिवस, तसेच धर्मशास्त्रातील अनेक विषय यांची माहिती काळ्या फलकावर साध्या आणि समजण्यास सोप्या भाषेत लिहिण्यात येते. ही माहिती वाचून अनेक हिंदूंमध्ये धर्मजागृती होत असल्याचे दिसून येत आहे. विविध मंदिरे, भजनी मंडळे, चौक इत्यादी ठिकाणी लावलेले हे फलक वाचण्यासाठी अनेक जिज्ञासू येतात. त्यांना या माहितीचा लाभ होतो. ते ती माहिती कृतीत आणत आहेत, तसेच स्वत:च्या जीवनातही सकारात्मक पालट घडवून आणत आहेत. कर्नाटक राज्यात फलकप्रसिद्धी करतांना आलेले वैशिष्ट्यपूर्ण अनुभव पुढे दिले आहेत.

१. जिज्ञासूंनी केवळ फलक वाचण्यासाठी मंदिरात येणे
‘दक्षिण कन्नड जिल्ह्यातील मंगळुरू येथे एका जिज्ञासूने फलकावर दिलेल्या दूरभाष क्रमांकावर संपर्क साधून सांगितले, ‘‘मी अनेक वेळा केवळ फलक वाचण्यासाठी मंदिरात जातो. मी फलकावरील सर्व माहिती वाचून ती आचरणात आणण्याचा प्रयत्न करतो.’’ त्यांच्या या जिज्ञासेमुळे त्यांनी साधनेविषयी अधिक माहितीही जाणून घेतली.
२. धर्माचरण करणे
फलकावर लिहिलेल्या धर्माचरणाविषयीच्या सूचना वाचून जिज्ञासूंना त्या आचरणात आणता येत असल्याचे ते आनंदाने सांगतात. अनेक मंदिरांमध्ये हे अनुभवास येत आहे.
३. आश्रमासाठी अर्पण देणे
उडुपी जिल्ह्यातील कार्कळ येथील बैलूर मारिगुडी मंदिरात साधक श्री. बालकृष्ण नायक फलक लिहितात. त्यांनी फलकावर मकरसंक्रांतीच्या दानाचे महत्त्व लिहिले होते. ते वाचून एका धर्मप्रेमीने फलकावर दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून मकरसंक्रांतीच्या निमित्ताने गूळ खरेदी करून मंगळुरू सेवाकेंद्रात पाठवला.

४. ग्रंथ आणि उत्पादने विकत घेणे अन् ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदार होणे
४ अ. कुशालनगर, जिल्हा कोडगू
१. येथे एका साधकाच्या दंत चिकित्सालयात लावलेल्या फलकामुळे दोन धर्मप्रेमी ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदार झाले.
२. अनेक जण फलकाचे छायाचित्र काढतात आणि त्यातील माहितीचे कौतुक करतात.
३. एका उपाहारगृहात (‘हॉटेल’मध्ये) लावलेला फलक वाचून अनेक जिज्ञासूंनी सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने खरेदी केली. एका जिज्ञासूने ग्रंथ घेऊन त्यांचे शाळांमध्ये वाटप केले.
४ आ. कारवार, जिल्हा उत्तर कन्नड : येथे सीता नायक नावाच्या जिज्ञासूंनी फलक पाहून साधकांशी संपर्क साधला. त्यांनी संबंधित ग्रंथ विकत घेतला आणि त्या प्रत्येक आठवड्याला मंदिरात येऊन फलक वाचू लागल्या. एकदा फलकावर अग्निहोत्राविषयी माहिती लिहिलेली होती. ती वाचून त्यांनी सनातनचा ‘अग्निहोत्र’ हा ग्रंथ विकत घेतला आणि घरी अग्निहोत्र चालू केले. काही दिवसांनी त्यांनी सांगितले, ‘‘अग्निहोत्र केल्याने घरातील वातावरण अत्यंत सकारात्मक झाले आहे.’’
४ इ. मुरुडेश्वर, जिल्हा उत्तर कन्नड : येथे एका जिज्ञासूंनी फलक वाचून ‘लव्ह जिहाद’, ‘फलक प्रसिद्धी’ आणि ‘अभ्यास कसा करावा ?’, हे ग्रंथ विकत घेतले.
४ ई. तीर्थहळ्ळी, जिल्हा शिवमोग्गा : येथील आंजनेयस्वामी मंिदरातील फलक पाहून एका जिज्ञासूने सनातनच्या आकाशकंदिलाची आणि ‘धर्मशिक्षण फलक’ या ग्रंथाची मागणी केली.
४ उ. सात्त्विक उत्पादने विकत घेणे : फलकावर लिहिलेल्या वास्तूशुद्धीविषयीच्या माहितीचा लाभ घेऊन काही जिज्ञासूंनी सनातन कापूर, उदबत्ती, गोमूत्र-अर्क इत्यादी साहित्य सनातनच्या प्रदर्शनातून विकत घेतले आणि त्यांविषयी अधिक माहितीही जाणून घेतली.
नियमितपणे फलक लिहिणार्या साधकांचा मंदिर समितीने सत्कार करणे
१. श्री. प्रवीण बेन्नूर, गदग
‘हे त्यांच्या घराजवळील मंदिरात नियमितपणे फलक लिहून धर्मशास्त्रातील विविध विषयांची माहिती समाजापर्यंत पोचवतात. हा फलक वाचून मंदिरात येणारे भाविक त्यानुसार आचरणही करतात. या सेवेमुळे प्रभावित होऊन मंदिर समितीने हनुमान जयंतीच्या कार्यक्रमात श्री. प्रवीण बेन्नूर यांचा सत्कार केला.
२. श्री. आकाश मेदार, निडगुंदी, बागलकोट
हे मारुति मंदिरात फलक लिहितात. भाविकांनी त्या मंदिरातील पुजार्यांना सांगितले, ‘‘या फलकामुळे आम्हाला पुष्कळ उपयुक्त माहिती मिळते.’’ त्यामुळे आनंदी होऊन पुजार्यांनी श्री. आकाश मेदार यांचा शाल देऊन सत्कार केला.’
– श्री. गुरुप्रसाद गौडा (१६.३.२०२६)
५. धर्मशिक्षणवर्गात सहभागी होणे
बदामी (जिल्हा बागलकोट) येथे फलक वाचून धर्मप्रेमींनी सांगितले, ‘‘असे फलक पुष्कळ ठिकाणी लावा.’’ त्यामुळे आधी २ फलक लिहिणारे धर्मप्रेमी ६ फलक लिहू लागले. फलकावरील विषय वाचून ६ जिज्ञासूंनी धर्मशिक्षणवर्गात येण्यास आरंभ केला.
६. मंदिरातील पुजार्यांनी फलक लिहिण्याची सेवा स्वीकारणे
तुमकूर जिल्ह्यातील सोमेश्वर मंदिरात साधक फलक लिहित असत. मंदिरातील पुजार्यांना ते विषय अत्यंत आवडले आणि पुढे त्यांनीच स्वतः फलक लिहिण्याची सेवा स्वीकारली. ही सेवा करतांना त्यांना पुष्कळ आनंद मिळतो.
७. मंदिरातील पुजार्यांनी फलकाला कुंकू लावून त्याची आरती करणे
बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग येथील एका मंदिरातील फलक पाहून पुजार्यांनी त्या फलकाला कुंकू लावून त्याची आरती केली आणि ‘हा फलक प्रत्येक आठवड्याला नक्की लावा’, असे सांगितले.
वरील सर्व उदाहरणांवरून असे लक्षात येते की, भगवंताला काहीही शक्य आहे. धर्मप्रसाराच्या हेतूने केवळ एका फलकाच्या माध्यमातून गुरु जिज्ञासूंना शोधून त्यांना धर्मकार्याशी जोडत आहेत. एक फलक जणू पूर्णवेळ साधकाप्रमाणे दिवसातील २४ घंटे धर्मप्रसार करतो आणि अनेक जिज्ञासूंना धर्माचरणासाठी प्रेरित करतो. गुरूंनी काळानुसार हे अत्यंत सोपे आणि अल्प व्ययाचे (खर्चाचे) प्रभावी माध्यम साधकांसाठी उपलब्ध करून दिले आहे. ‘या माध्यमातून अधिकाधिक जिज्ञासूंना लाभ होवो आणि ते सर्व साधक बनोत’, अशी मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी प्रार्थना करतो. त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– श्री. गुरुप्रसाद गौडा (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ४४ वर्षे), हुब्बळ्ळी, कर्नाटक. (१६.३.२०२६)
नव्या ‘ग्रेट गेम’च्या (राजकीय डावपेचांच्या) केंद्रस्थानी बीजिंग
भारत आधीपासून जे आचरणात आणत होता, तेच पाश्चिमात्य देश आता शोधून काढत आहेत !
कर्नाटक येथील श्री श्री श्री वामनाश्रम स्वामीजी यांनी धर्माभिमान जागृत होण्यासाठी भक्तांना केलेले मार्गदर्शन आणि ‘सनातन संस्थे’च्या साधकांविषयी काढलेले कौतुकाद्गार !
युवकांनी राष्ट्र आणि धर्म यांच्यासाठी सज्ज व्हावे ! – सचिन कल्याणशेट्टी, आमदार, भाजप
कॉर्पोरेट क्षेत्रातील षड्यंत्रांविषयी हिंदु जनजागृती समिती बिंग फोडणार !