कर्नाटक येथील श्री श्री श्री वामनाश्रम स्वामीजी यांनी धर्माभिमान जागृत होण्यासाठी भक्तांना केलेले मार्गदर्शन आणि ‘सनातन संस्थे’च्या साधकांविषयी काढलेले कौतुकाद्गार !

‘श्रीसंस्थान हळदीपूर मठ (हळदीपूर, उत्तर कन्नड जिल्हा, कर्नाटक) येथील श्री श्री श्री वामनाश्रम स्वामीजी हे वैश्य समाजाचे गुरु आहेत. आषाढ शुक्ल एकादशी ते कार्तिक शुक्ल एकादशी या चार मासांच्या काळात स्वामीजी एकाच ठिकाणी राहून कठोर तपश्चर्या आणि श्रीविष्णूची पूजा करतात. वर्ष २०२५ मध्ये चातुर्मास व्रत (टीप) सोहळा गुंटूर, आंध्रप्रदेश येथील ‘कन्यका परमेश्वरी मंदिर’ येथे आयोजित केला होता. त्या वेळी बोलतांना स्वामीजींनी ‘सनातन संस्थे’ची पुष्कळ प्रशंसा केली आणि भक्तांना मार्गदर्शन केले. त्या वेळी मी तिथे उपस्थित होते. श्री श्री श्री वामनाश्रम स्वामीजींनी केलेले मार्गदर्शन पुढे दिले आहे.

टीप : आषाढ शुक्ल एकादशी (देवशयनी) ते कार्तिक शुक्ल  एकादशी (प्रबोधिनी) हा चार मासांचा काळ.

श्री श्री श्री वामनाश्रम स्वामीजी

१. प्रत्येकाने कठोर परिश्रम घेऊन आपल्या धर्माचे रक्षण करणे आवश्यक !

स्वामीजी म्हणाले, ‘‘सध्या आपल्या धर्माची स्थिती पुष्कळ दयनीय झाली आहे. प्रत्येकाने कठोर परिश्रम घेऊन आपल्या धर्माचे रक्षण केले पाहिजे. हे आता आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे.

आजची तरुण पिढी ‘आर्थिक लाभ किती अधिक मिळेल’, हा विचार करूनच शिक्षण घेते. ‘शिक्षण पूर्ण झाल्यावर विदेशात जायचे, आपला देश आणि आपली माणसे यांना विसरून तिथेच नोकरी करायची अन् स्थायिक व्हायचे’, असा त्यांचा विचार असतो. जणू ‘आता इथे काहीच लागेबांधे नाहीत’, असे त्यांचे वागणे असते.’’

२. धर्माभिमान जागृत रहाण्यासाठी मुलांना मातृभाषा शिकवणे आवश्यक !

श्रीमती विजयाकुमारी

स्वामीजींना आणखी एक गोष्ट पुष्कळ खटकत होती, ती म्हणजे सध्या बहुतेक पालक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालतात. स्वामीजी म्हणाले, ‘‘पालक मुलांना इंग्रजी शाळेत शिकवत असल्यामुळे त्यांचा स्वतःच्या मातृभाषेचा अभ्यास होत नाही. पालकांनी स्वत:च्या मुलांना घरामध्ये तरी मातृभाषा शिकवली पाहिजे. घरी सर्वांनी मातृभाषेतच संभाषण केले पाहिजे. मुलांना हिंदु धर्माविषयीची माहिती सांगून धर्माचे माहात्म्य समजावले पाहिजे, तरच त्यांच्यात धर्माभिमान निर्माण होईल अन् ते सदैव जागृत रहातील ! आजचा युवक मौजमजा करणे आणि चैन करणे, यांत इतका दंग झालेला आहे की, आपण समाजासाठी काहीतरी केले पाहिजे’, याची त्याला जाणीवच नाही.’’

३. स्वामीजींनी सनातनच्या साधकांचे केलेले कौतुक !

नंतर स्वामीजींचे माझ्याकडे (श्रीमती विजयाकुमारी यांच्याकडे) लक्ष गेले. तेव्हा ते सर्वांना सांगू लागले, ‘‘सनातनचे साधक पुष्कळ मनापासून आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत.’’

त्यांचे बोलणे ऐकून मला संकोच वाटू लागला. त्या वेळी मी स्वतःलाच विचारले, ‘मी खरंच या स्तुतीला पात्र आहे का ?’ तेव्हा ‘मी प्रयत्न वाढवले पाहिजेत’, असे माझ्या लक्षात आले.’

– श्रीमती विजयाकुमारी (आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय ६१ वर्षे), कोचीन, केरळ. (सप्टेंबर २०२५)