१५.५.२०२६ या दिवशी रात्री १२.३० वाजता अमरावती येथील साधिका श्रीमती वंदना पंजाबराव कळमकर (वय ६५ वर्षे) यांचे निधन झाले. १२.६.२०२६ या दिवशी त्यांचे पहिले मासिक श्राद्ध आहे. त्यानिमित्त त्यांची मुलगी आणि एक साधिका यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये, तसेच त्यांच्या निधनापूर्वी अन् निधनानंतर जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

१. सौ. नम्रता नीलेश वानखडे (कै. (श्रीमती) वंदना कळमकर यांची मुलगी), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

१ अ. व्यष्टी साधनेची तळमळ
१. ‘आईला भ्रमणभाष वापरण्याविषयी अधिक माहिती नव्हती; पण तिने ‘भ्रमणभाषवर व्यष्टी साधनेचा आढावा देणे आणि भाववृद्धी सत्संग ऐकणे’, हे शिकून घेतले.
२. तिला स्वभावदोष आणि अहं यांच्याविषयीचे लिखाण फारसे जमत नव्हते; पण ती प्रयत्न करत असे.
३. एकदा ती एकटी बसली होती. तेव्हा मी तिला विचारले, ‘‘काय विचार करत आहेस ?’’ तेव्हा ती म्हणाली, ‘‘मी नामजप करत आहे. माझ्या मनात इतर कोणताच विचार येत नाही.’’
१ आ. आई रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आल्यापासून तिला सांगितलेले ती सर्व ऐकत असे. तिने कोणत्याच गोष्टीचे गार्हाणे केले नाही.
१ इ. सकारात्मक राहून चूक स्वीकारणे आणि क्षमायाचना करणे : आईची ‘अँजिओग्राफी’ (हृदयाच्या रक्तवाहिन्यांतील अडथळे शोधण्यासाठी करायची वैद्यकीय चाचणी) करण्यासाठी रुग्णालयात जायचे होते. तेथे जाण्याच्या आदल्या दिवशी दुपारी ४ वाजता तिने अल्पाहारासाठी ठेवलेला खाऊ एका साधिकेला विचारून रुग्णालयात नेण्यासाठी घेतला; पण उत्तरदायी साधिकेने आईला सांगितले, ‘‘उत्तरदायी साधकांना विचारल्याविना खाऊ घ्यायचा नसतो.’’ त्या वेळी आईने त्या साधिकेची क्षमा मागितली आणि ‘यापुढे विचारून खाऊ घेईन’, असे सांगितले. ही चूक तिने पू. रेखा काणकोणकर (सनातनच्या ६० व्या (समष्टी) संत, वय ४८ वर्षे) यांनाही सांगितली. तेव्हा पू. रेखाताई म्हणाल्या, ‘‘ठीक आहे.’’ जेव्हा मला हा प्रसंग समजला, तेव्हा मला ताण आला होता; कारण तिच्यासाठी हे सर्व नवीन होते. ‘आईच्या मनात काय विचार चालू असेल ?’, असा विचार माझ्या मनात येत होता. मी आईशी बोलल्यावर ती मला सहजतेने म्हणाली, ‘‘माझी चूक झाली आणि मी क्षमा मागितली.’’
१ ई. स्थिरता : रामनाथी आश्रमातील एक साधिका मला म्हणाली, ‘‘आईकडे पाहून असे वाटते की, त्यांची कोणाकडून काही अपेक्षा नाही. त्या आतून पुष्कळ स्थिर आहेत. या वयात एवढे स्थिर रहाणे कठीण असते.’’
१ उ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रतीचा भाव
१. आई ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’, हा ग्रंथ पहातांना प्रार्थना करायची, ‘मला आश्रमात ठेवून घ्या. माझ्यासारख्या दगडामध्ये तुम्ही पालट करून घ्या. माझी साधना करून घ्या.’
२. ‘माझ्यात भाव नाही, तरी प.पू. डॉक्टर (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) माझ्यासाठी पुष्कळ करतात’, असे तिला वाटत असे.
३. आई रामनाथी आश्रमात आल्यावर काही दिवसांनी मी आईला विचारले, ‘‘तुला ‘प.पू. डॉक्टरांना भेटावे’, असे वाटते का ?’’ तेव्हा ती मला म्हणाली, ‘‘ते २४ घंटे सूक्ष्मातून माझ्या समवेत असतात, तर मी स्थुलातून त्यांना वेगळे काय भेटू ? मी डोळे बंद केले की, प.पू. डॉक्टरांचे चरण माझ्या डोळ्यांसमोर येतात.’’ आईचे बोलणे ऐकून मला आश्चर्य वाटले; कारण आईने प.पू. डॉक्टरांना पुष्ळळ वर्षांपूर्वी पाहिले होते.
१ ऊ. आईच्या निधनानंतर जाणवलेली सूत्रे
१. आईचे निधन झाल्यावर रामनाथी आश्रमातून मला अनेक साधकांचे भ्रमणभाष आले. आई ४ मासच आश्रमात होती; पण तिची बर्याच साधकांशी जवळीक झाली होती.
२. आईचे निधन झाल्यावर काही दिवसांनी मला पू. संदीप आळशी (सनातनचे ११ वे (समष्टी) संत, वय ५१ वर्षे) यांचा भ्रमणभाष आला. त्या वेळी ते मला म्हणाले, ‘‘तुमच्या आईविषयीचा दैनिक ‘सनातन प्रभात’मधील लेख वाचला. ‘शेवटच्या क्षणी त्यांचा नामजप चालू होता’, हे महत्त्वाचे आहे. हे सर्वांना जमते, असे नाही. देवाने त्यांचे कल्याण केले. त्यांना चांगली गती मिळाली.’’
३. आईच्या निधनानंतर १० दिवस प्रतिदिन सकाळी घरी १ पांढरी गाय आणि वासरू येत असे.
४. निधनानंतरचे सर्व विधी कोणतेही अडथळे न येता पार पडले.’
२. सौ. स्वाती संदीप शिंदे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ३८ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

अ. ‘श्रीमती कळमकरकाकू काही कालावधीसाठी रामनाथी आश्रमात आल्या होत्या. त्यांना जे नियोजन घालून दिले होते, त्याचे त्यांनी काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न केला. ‘आश्रमात सर्व गोष्टी ठरवून दिलेल्या वेळेनुसार कशा करता येतील ?’, यासाठी त्यांचा प्रयत्न असे.
आ. माझा काकूंशी यापूर्वी कधी संपर्क आला नाही, तसेच त्या आश्रमात आल्यावरही थोडाच संपर्क येत असे; पण त्यांच्याविषयी मला जवळीक वाटत असे. त्यांच्यातील ‘प्रेमभाव आणि निर्मळता’, यांमुळे मला त्यांच्याविषयी आपलेपणा वाटत असे.
इ. एकदा त्यांना सत्संगाला येण्यास उशीर झाला. तेव्हा त्यांनी स्वतःची चूक सांगून क्षमायाचना केली. ‘त्यांना त्यांच्या या चुकीची पुष्कळ खंत वाटली’, असे मला जाणवले.
ई. ‘मला लिहिण्या-वाचण्याची अडचण आहे’, असे त्यांनी मला सांगितले; पण त्यांना जमेल तसे त्या स्वतःच्या चुका सत्संगात सांगण्याचा प्रयत्न करत असत.
उ. एकदा त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. तेव्हा त्यांनी एका साधिकेला त्यांच्या छातीवर हात ठेवून जप करायला सांगितले. त्यांना स्वतःला बोलता येत नव्हते; पण खुणा करून त्यांनी ते सांगितले, तसेच त्या स्वतःही गुरुदेवांचे भावपूर्ण स्मरण करत होत्या. थोड्या वेळाने त्यांना बरे वाटले. त्या वेळी त्यांना साहाय्य करणार्या साधिकेविषयी पुष्कळ कृतज्ञता वाटली.
ऊ. त्या प्रत्येक क्षणी गुरुदेव सूक्ष्मातून समवेत असल्याचे अनुभवत असत. त्यांची भावस्थिती मला जाणवत असे. ‘त्या अंतर्मुख आहेत’, असे त्यांच्या चेहर्यावरून मला वाटत असे.
‘गुरुदेवांनी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी) ज्या जिवाला जवळ केले, त्याच्या नकळत गुरुदेव त्याच्या अंतर्मनावर साधनेचा संस्कार करतात आणि त्याला साधनेत पुढे नेतात. ‘गुरुदेवांच्या कृपेने काकूंच्या सहवासात मला त्यांचे विविध गुण शिकायला मिळाले’, याबद्दल गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता !’
(सर्व सूत्रांचा दिनांक : ३१.५.२०२६)
Puri Rath Yatra Stampede : पुरी रथयात्रेत चेंगराचेंगरी : एकाचा मृत्यू, तर १०० हून अधिक भाविक घायाळ
यांसाठी मंदिरांचे सरकारीकरण नको !
मुंबई येथे सनातन संस्थेने केलेल्या ‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञा’च्या संदर्भात सनातन संस्थेच्या हितचिंतकांनी व्यक्त केलेले मनोगत !
श्री जगन्नाथदेवाची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
साधकांनो, स्वतःमधील स्वभावदोषांमुळे खचून न जाता सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी सांगितलेल्या साधनेवर अढळ श्रद्धा ठेवून प्रयत्नरत रहा !