जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या वारीसाठी नवीन रथ 

पुणे – जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा ३४१ वा ‘आषाढी पायी वारी पालखी सोहळा’ ७ जुलैला श्रीक्षेत्र देहू (पुणे) येथून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. या पालखी सोहळ्यात अत्याधुनिक आणि आकर्षक असा नवीन पालखी रथ सिद्ध करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. नवीन पालखी रथाच्या निर्मितीसाठी कर्नाटक राज्यातील दांडोली येथील उच्च प्रतीच्या २ टन सागवानी (बर्मा टीक) लाकडाचा वापर केला आहे. त्यावर दाक्षिणात्य शैलीतील अत्यंत सुबक आणि कलात्मक कोरीव काम सिरोही गावातील (राजस्थान) येथील कुशल कारागिरांनी केले आहे. कोंढवा येथील सुरेश मिस्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम पूर्ण झाले आहे. रथाला ३०० किलो चांदीचा मुलामा देण्यात आला आहे. रथाचे एकूण वजन ४ टन असून जुन्या रथाच्या तुलनेत हा रथ ६०० किलोंनी हलका आहे. त्यामुळे पालखी सोहळ्यामध्ये बैलजोडींना रथ ओढणे सुलभ होणार आहे.

रथावरील विविध धार्मिक आणि सांस्कृतिक प्रतिकृतींमुळे रथ अधिक आकर्षक अन् भव्य बनला आहे. पारंपरिकता आणि आधुनिकतेचा संगम साधणारा रथ आषाढी वारीचे विशेष आकर्षण ठरणार असल्याची माहिती ‘जगद्गुरु संत तुकाराम महाराज संस्थान’चे विश्वस्त ह.भ.प. दिलीप महाराज मोरे, ह.भ.प. वैभव महाराज मोरे, तसेच पालखी सोहळा प्रमुख विक्रमसिंह मोरे यांनी दिली.