थोडक्यात महत्त्वाचे

यंत्रात हात अडकून ४ बोटे तुटली !

वसई – नालासोपारा येथील आस्थापनात १३ वर्षांच्या बालकामगाराचा बांधणी यंत्रात हात अडकून गंभीर अपघात झाला. यात त्याच्या हाताची चार बोटे तुटली आहेत. या प्रकरणी आस्थापन मालक आणि व्यवस्थापक यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.


अवैध गुटखा वाहतुकीवर कारवाई !

परभणी – येथे पोलिसांनी प्रतिबंधित गुटखा आणि वाहतुकीसाठी वापरलेले वाहन यांचा ६ लाख २८ सहस्र ४६८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. एका आरोपीला कह्यात घेतले असून दुसर्‍या आरोपीचा शोध चालू आहे.


महिलांची फसवणूक करणारा अटकेत !

महिलांनीच अशा प्रकरणात सतर्क रहायला हवे ! 

ठाणे – विवाह जुळवणार्‍या संकेतस्थळांचा गैरवापर करून उच्च शिक्षित आणि घटस्फोटित महिलांशी ओळख वाढवून त्यांना लग्नाचे आमीष दाखवल्याप्रकरणी सुरेश रवींद्र (वय ३७ वर्षे) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना रशियातून भारतात आणण्यात आले.


श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणार्‍या १० जणांवर कारवाई

५ सहस्र रुपयांचा दंड !

तुळजापूर – श्री तुळजाभवानी मंदिराच्या परिसरात स्वच्छता राखण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत परिसरात थुंकतांना आढळलेल्या १० जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. संबंधितांकडून प्रत्येकी ५०० रुपये याप्रमाणे एकूण ५ सहस्र रुपयांचा दंड आकारण्यात आला. मंदिर संस्थानच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या विशेष पथकांनी मंदिर परिसरात पहाणी करत ही कारवाई केली. मंदिर परिसर स्वच्छ, सुंदर आणि पवित्र राखण्यासाठी थुंकणे, घाण करणे आणि कचरा टाकणे यांविरोधात मंदिर प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.