परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना केलेले अनमोल मार्गदर्शन !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

एक साधक : माझ्यात स्वभावदोष आहेत.
परात्पर गुरु डॉ. आठवले : लोक संतांचे ऐकतात. आपल्यात स्वभावदोष असतील, तर आपले कोण ऐकणार ? आपल्या वाणीत चैतन्य आले पाहिजे.

एक साधिका : प्रतिमा जपण्याचा भाग होतो. साधकांना त्यांच्या चुका सांगितल्या जात नाहीत.
परात्पर गुरु डॉ. आठवले : देवाला सर्व ठाऊक आहे ना ? मग सांगायचे. साधकांना स्थुलातून सांगायला पाहिजे. जे बोलत नाहीत, त्यांनी स्वत:च्या प्रगतीसाठी आपला प्रत्येक विचार आणि प्रत्येक चूक सांगणे आवश्यक आहे.

एक साधिका : सेवा समर्पितभावाने होण्यासाठी आपल्याला प्रार्थना करण्याचा भाग होतो.
परात्पर गुरु डॉ. आठवले : ‘मी काहीच प्रयत्न करणार नाही. केवळ प्रार्थना करते’, असे नसावे. संत किंवा ईश्वर यांना यासाठी प्रार्थना करू नये. कृतीच्या स्तरावर प्रयत्न करायला पाहिजेत. कसरत करूनच शरीर सिद्ध होते.

एक साधक : सेवा आणि घरातील काम यांचे नियोजन व्यवस्थित करता येत नाही.
परात्पर गुरु डॉ. आठवले : विचारून पावले टाकायची आहेत. व्यवहारात आपण आधुनिक वैद्य आणि अधिवक्ता यांना विचारतो ना ? मग साधनेत उत्तरदायी साधकांना का विचारत नाही ? गंभीर चूक आहे. विचारणे किंवा मनमोकळेपणाने बोलणे झाले नाही, तर प्रगती होणार नाही. केवळ प्रशिक्षण झाले. बाकीचे काय ? शारीरिक होऊन जाईल; पण केवळ त्याचा उपयोग नाही.

एक साधक : माझ्याकडून साधनेचे अधिक प्रयत्न होत नाहीत.
परात्पर गुरु डॉ. आठवले : १५ – २० वर्षे साधना केल्यावर अर्जुनासारखा होशील. पूर्वजन्मीचे प्रारब्ध नष्ट करण्यासाठी साधनेचा वापर होतो.

एक साधक : आम्ही रामनाथीला यायला निघणार होतो, त्याच दिवशी जिल्ह्यात संचारबंदी लागू होणार होती. सद्गुरूंनी सांगितल्यानुसार आम्ही लगेच निघालो. आम्ही निघाल्यानंतर एक घंट्यातच तिकडे संचारबंदी लागू झाली.
परात्पर गुरु डॉ. आठवले : संतांविषयीचे लिखाण लिहून दे, म्हणजे समाजाला संतांचे महत्त्व लक्षात येईल.

एक साधक : मी अगोदर रामनाथी आश्रमात होतो. तेव्हा माझ्याकडून भाववृद्धीसाठी चांगले प्रयत्न व्हायचे. प्रसारात गेल्यावर भाव वाढण्यासाठी प्रयत्न न्यून झाले; पण प्रसारातून समष्टी सूत्रे शिकायला मिळाली.
परात्पर गुरु डॉ. आठवले : आपल्याला रामनाथी आश्रमासारखे सर्वत्र हिंदु राष्ट्र स्थापन करायचे आहे.

एक साधक : स्वतःविषयी नकारात्मक विचार येतो.
परात्पर गुरु डॉ. आठवले : समाजातील रज-तम प्रधान वातावरणाचा परिणाम होतो. समष्टी साधनेला व्यष्टी साधनेची जोड द्यायला पाहिजे. नामजपाला प्राधान्य द्यायचे.

एक साधक : सेवेमध्ये बोलण्याचा भाग अल्प होतो. उत्तरदायी साधक आणि सहसाधक मार्गदर्शन करतात. सहसाधकांचे प्रयत्न बघून आता माझे प्रयत्न चालू झाले आहेत.
परात्पर गुरु डॉ. आठवले : ईश्वरापर्यंत जायचे, तर सगळ्यांच्या समवेत बोलता आले पाहिजे.

एक साधक : मागील वेळी इकडे आलो होतो, तेव्हाचा आनंद वेगळा होता. आता पुढच्या टप्प्याचे शिकायला मिळत आहे.
परात्पर गुरु डॉ. आठवले : पहिल्या वेळी शिकलेले प्रयत्नात आणले, तर दुसर्‍या वेळी आणखी आनंद मिळतो.