कोल्हापुरातील रस्ते आणि उड्डाणपूल दुरुस्तीसाठी पालकमंत्री आबीटकर यांचे केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्र्यांना निवेदन

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी (उजवीकडे) यांना निवेदन देतांना कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबीटकर

कोल्हापूर – कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबीटकर यांनी देहली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन कोल्हापूर जिल्ह्यातील मुदाळतीठ्ठा उड्डाणपूल, तसेच अन्य रस्ते यांच्या दुरुस्तीसाठी निवेदन सादर केले. राज्य महामार्गावरील मुदाळतीठ्ठा येथे उड्डाणपूल उभारणीसाठी केंद्रीय राखीव निधी अंतर्गत संमती, संकेश्वर-आजरा राष्ट्रीय महामार्गावरील विद्यमान पथकर नाका स्थलांतरित करणे आणि गारगोटी-कोल्हापूर रस्ता दुरुस्तीसाठी निधीची मागणी या वेळी करण्यात आली.

भुदरगड तालुक्यातील आदमापूर येथील सदगुरु संत बाळूमामा यांच्या पवित्रस्थळी प्रतिवर्षी लाखो भाविक महाराष्ट्र, कर्नाटकसह विविध राज्यांतून येतात. त्यामुळे कोल्हापूर-गारगोटी मार्गावरील मुदाळतीठ्ठा परिसरात वाहतूककोंडीची समस्या निर्माण होते. या पार्श्वभूमीवर राज्य महामार्गावर मुदाळतीठ्ठा येथे उड्डाणपूल उभारण्याची मागणी पालकमंत्री आबिटकर यांनी केली. उड्डाणपुलामुळे भाविक, स्थानिक नागरिक आणि मालवाहतूक यांना मोठा दिलासा मिळेल.

संकेश्वर-आजरा-आंबोली राष्ट्रीय महामार्गावरील विद्यमान पथकर नाका आजरा शहराजवळ असल्याने स्थानिक नागरिकांना प्रवासात अडचणी निर्माण होत आहेत. शहराचा विस्तार आणि वाढती वस्ती लक्षात घेता हा पथकरनाका घाटकरवाडी-आंबोली मार्गादरम्यान स्थलांतरित करण्याची नागरिकांची मागणी आहे. या सर्व विषयांवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.