कुदळवाडी (पिंपरी-चिंचवड) येथील पोलिसांवर दगडफेक करणार्‍या ३३ मुसलमानांना अटक !

३ अल्पवयीन मुलांचा समावेश

पिंपरी (पुणे) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून ९ जूनला मध्यरात्री चिखलीतील कुदळवाडी परिसरातील अनधिकृत धार्मिक स्थळे आणि अतिक्रमणे भुईसपाट करण्यात आली. या कारवाईस ५०० हून अधिक मुसलमानांनी विरोध केला. या वेळी अतिक्रमण पथकांवर दगडफेक करण्यात आली. या प्रकरणी चिखली पोलिसांनी आतापर्यंत ३३ मुसलमानांना अटक केली असून त्यात ३ अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे. या प्रकरणी साहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे यांनी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. महापालिकेने ९ जूनच्या मध्यरात्री अतिक्रमण काढण्यास प्रारंभ केला. तेव्हा त्याला विरोध करण्यासाठी मुसलमान मोठ्या संख्येने गोळा झाले. त्या वेळी त्यांनी केलेल्या दगडफेकीमध्ये ७ पोलीस अधिकारी, कर्मचार्‍यांसह राज्य राखीव पोलीस दलातील १३ जवान घायाळ झाले. २ पोलीस गंभीर घायाळ असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

दगडफेक अचानक झाली कि त्यामागे पूर्वनियोजत कट होता. जमावाला कुणी चिथावणी दिली का ? संपूर्ण घटनाक्रमामागे कोण सूत्रधार आहे का ? अशा विविध अंगांनी पोलिसांनी अन्वेषण चालू केले. घटनास्थळावरील सीसीटीव्ही चित्रीकरण, भ्रमणभाष संदेश आणि संभाषण अन् सामाजिक माध्यमांतील संदेश यांची छाननी चालू आहे. मुख्य सूत्रधार आणि चिथावणीखोर यांचा शोध चालू आहे.