‘सनबर्न’ आणि प्रशासन यांवर मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा !

  • ‘नशाविरोधी संघर्ष अभियाना’च्या वतीने दादर येथील आंदोलनात मागणी !

  • वरळीमधील पाश्चात्त्य संगीत कार्यक्रमातील तरुणाच्या मृत्यूचे प्रकरण

आंदोलनात सहभागी धर्मप्रेमी

मुंबई – शिवडीच्या वादग्रस्त ‘सनबर्न फेस्टिव्हल’ ते गोरेगावमधील नेस्को येथील पाश्चात्त्य संगीत कार्यक्रमात २ तरुणांचा अमली पदार्थांच्या अतीसेवनामुळे झालेल्या मृत्यूपर्यंत पोलिसांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळेच वरळीच्या पाश्चात्त्य संगीत कार्यक्रमातही एका निष्पाप तरुणाला जीव गमवावा लागला. वरळी डोममध्ये तरुणाचा मृत्यू आणि एक तरुणी बेशुद्ध पडणे, हे राज्यातील अमली पदार्थांच्या वाढत्या विळख्याचे भयानक वास्तव आहे. शिवडी आणि वरळी येथील दोन्ही कार्यक्रमांचे मुख्य आयोजक हे ‘सनबर्न फेस्टिव्हल’चे आयोजक अन् त्यांचे स्थानिक भागीदार ‘स्टार स्टेज इव्हेंट्स’ आणि ‘ई व्हेंचर एक्स’ हेच आहेत. या पार्श्वभूमीवर ‘नशा विरोधी संघर्ष अभियाना’च्या सौ. धनश्री केळशीकर यांनी वरळी येथील मृत्यूला कारणीभूत असणार्‍यांवर सनबर्नच्या आयोजकांवर आणि त्यांना जाणीवपूर्वक पाठीशी घालणार्‍या भ्रष्ट प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्याची आणि ‘सनबर्न फेस्टिव्हल’वर महाराष्ट्रात बंदी घालण्याची मागणी राज्य सरकारकडे केली. ‘नशा विरोधी संघर्ष अभियाना’च्या वतीने ११ जून या दिवशी दादर रेल्वेस्थानकाबाहेर जनआंदोलन करण्यात आले. या वेळी युवक, राष्ट्रप्रेमी नागरिक आणि विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. त्या आंदोलनात सौ. केळशीकर बोलत होत्या.

या वेळी सौ. केळशीकर म्हणाल्या,

१. वरळी येथील कार्यक्रमाला प्रारंभी कायदा-सुव्यवस्थेच्या कारणास्तव पोलिसांनी अनुमती नाकारली होती; परंतु नंतर वरिष्ठांच्या सांगण्यावरून अनुमती मिळणे, हे गंभीर आहे. यापूर्वी शिवडी येथे आयोजित केलेल्या ‘सनबर्न फेस्टिव्हल’मुळे स्थानिक नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला होता आणि युवा पिढीने त्याला रस्त्यावर उतरून तीव्र विरोध केला होता; मात्र प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई न करता वादग्रस्त कार्यक्रमांना अभय दिले.

२. ‘सनबर्न फेस्टिव्हल’मध्ये अमली पदार्थांच्या अतीसेवनामुळे अनेक तरुणांचे मृत्यू झाल्याचा काळाकुट्ट इतिहास आणि हिंदु जनजागृती समितीसह विविध संघटनांचे अनेक वर्षांपासून प्रशासनाला लेखी स्वरूपात आक्षेप अवगत केलेले असतांनाही पैशापुढे लोटांगण घालून गोरेगाव आणि वरळी येथे मृत्यूच्या मेजवान्यांना पायघड्या का घातल्या गेल्या ? याचे उत्तर पोलीस आणि प्रशासन यांना द्यावेच लागेल !

३. छत्रपती शिवरायांच्या आणि सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये पैशाच्या जोरावर तरुण पिढीला अमली पदार्थांच्या गर्तेत ढकलून राज्याला पंजाबच्या धर्तीवर ‘उडता महाराष्ट्र’ बनवण्याचा हा प्रयत्न आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. प्रशासनाच्या दायित्वशून्य, भ्रष्ट आणि असंवेदनशील कारभारामुळे ज्या कुटुंबातील तरुण मृत्युमुखी पडले, त्या पालकांची कधीही न भरून निघणारी हानी प्रशासन कशा प्रकारे भरून देणार आहे ?

४. वरळी डोम ही मुंबई महानगरपालिकेची, म्हणजेच शासकीय जागा असतांनाही तिथे तरुण पिढीला उद्ध्वस्त करणार्‍या घातक मेजवान्यांचे आयोजन कसे होऊ दिले जाते ? महापालिकेने ज्यांना हे डोम भाड्याने चालवण्यासाठी दिले आहे, तो कंत्राटदार आणि संबंधित व्यवस्थापन यांच्यावर सरकार काय कठोर कारवाई करणार ?

५. जोपर्यंत तरुणांच्या रक्ताने हात माखलेल्या या ‘सनबर्न’वर आणि दोषी प्रशासकीय अधिकार्‍यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवला जात नाही, तोपर्यंत आमचा लढा थांबणार नाही. छत्रपती शिवरायांच्या भूमीत अमली पदार्थ विकृतीचे उदात्तीकरण आणि मेजवान्यांचा नंगानाच करणारे विघातक कार्यक्रम शासकीय पातळीवर तात्काळ बंद झाले पाहिजेत.

संपादकीय भूमिका

‘सनबर्न फेस्टिव्हल’वर महाराष्ट्रात कायमची बंदी घाला !