पोलिसांत तक्रार प्रविष्ट

दापोली, ११ जून (वार्ता.) – तालुक्यातील चिखलतळे फाटा येथे १० जूनच्या रात्री १ वाजता एका महागड्या महिंद्रा ‘एक्स्.यू.व्ही.’ चारचाकीमधून बैल चोरी करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ग्रामस्थांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा डाव फसला असला, तरी चोरटे गाडीसह पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत.
काय आहे घटना ?
१० जूनच्या रात्री १ वाजण्याच्या सुमारास चिखलतळे फाट्यावर काही अज्ञात चोरटे एका महिंद्रा ‘एक्स्.यू.व्ही.’ गाडीमध्ये बैल कोंबण्याचा प्रयत्न करत होते. हा संशयास्पद प्रकार परिसरातील काही ग्रामस्थांच्या नजरेस पडला. ग्रामस्थांनी तातडीने हालचाल करत चोरट्यांना पकडण्यासाठी नाकाबंदी करण्याचा प्रयत्न केला; मात्र चोरट्यांनी गाडी सुकोंडीच्या दिशेने सुसाट वेगाने पळवून नेली.
बैलाला दिले होते गुंगीचे औषध !
बैल चोरण्याचा प्रयत्न फसल्यानंतर पीडित बैल रस्त्यावरच बेशुद्ध अवस्थेत पडला होता. या घटनेची माहिती मिळताच श्री शिवशंभू मित्र परिवाराचे सदस्य तातडीने साहाय्यासाठी धावून आले. चोरट्यांनी बैलाला मागून ‘हुक’ लावला होता आणि त्याला गुंगीचे औषध दिले होते, अशी माहिती पशूवैद्यकीय अधिकार्यांनी बैलाची पडताळणी केल्यानंतर दिली.
श्री शिवशंभू मित्र परिवाराचे साहाय्य आणि पोलिसांत तक्रार
श्री शिवशंभू मित्र परिवाराच्या सदस्यांनी स्थानिक प्रशासनाच्या साहाय्याने पहाटे ५ वाजेपर्यंत अथक परिश्रम घेऊन बैलावर उपचार केले आणि त्याला शुद्धीवर आणले. यानंतर पोलिसांना पाचारण करून घटनेची रीतसर तक्रार नोंदवण्यात आली असून, पोलीस या प्रकरणाचे पुढील अन्वेषण करत आहेत. बैलाचे प्राण वाचवल्याबद्दल श्री शिवशंभू मित्र परिवाराचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
मोकाट गुरांचा प्रश्न ऐरणीवर
या घटनेमुळे चोरट्यांची नवीन क्लृप्ती समोर आली असली, तरी परिसरातील मोकाट गुरांचा गंभीर प्रश्नही पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सुकोंडी आणि आडे फाटा परिसरात सध्या तब्बल ७० ते ८० मोकाट गुरे रात्रंदिवस रस्त्यावर फिरत असतात. या मोकाट गुरांमुळे चोरट्यांचे फावले आहे.
अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा अटकेत !
आपत्कालीन परिस्थितीसाठी नवी मुंबई महानगरपालिका परिवहन सिद्ध !
जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या वारीसाठी नवीन रथ
सोमवती अमावास्येच्या भाविकांसाठी सजला जेजुरीतील ‘श्री खंडोबा गड’ !
रिक्शाचालकाने मीटरपेक्षा अधिक भाडे आकारल्यास तक्रार करा ! – पुणे शहर वाहतूक शाखा
बिनखांबी गणेश मंदिर ते महाद्वार चौक परिसरात महापालिकेची अतिक्रमण निर्मूलन कारवाई !