मूर्तीला लेपन करणार्यांचे पुढील दायित्व निश्चित करण्याची वारकरी संप्रदायाची मागणी !
प्रसंगी न्यायालयात जाण्याची चेतावणी !

पंढरपूर – ‘श्री विठ्ठलाची मूर्ती २८ युगांपासून उभी आहे’, अशी श्रद्धा असलेल्या आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या श्री विठ्ठलाच्या मूर्तीच्या चरणांची झीज झाल्याचे कारण पुढे करत मंदिरे समितीने पुरातत्व विभागाकडून रासायनिक लेपन करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीचे पदाधिकारी, जिल्हाधिकारी, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण आणि राज्य पुरातत्व विभागाचे अधिकारी, मूर्तीसंवर्धन तज्ञ, वारकरी प्रतिनिधी, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर संरक्षण कृती समिती यांच्या झालेल्या संयुक्त बैठकीत मूर्तीला रासायनिक लेपन करण्यास वारकरी संप्रदाय आणि त्यांची महाराज मंडळी यांनी कडाडून विरोध दर्शवला. जिल्हाधिकारी तथा मंदिरे समितीचे अध्यक्ष यांनी ‘पुरातत्व विभागाच्या निर्देशानुसारच मूर्तीला लेपन होईल’, असे घोषित केल्यावर वारकर्यांनी प्रसंगी न्यायालयात जाण्याची चेतावणी दिली आहे. ही बैठक नवीन भक्तनिवास येथे झाली.
या संदर्भात ह.भ.प. हनुमंत वीर महाराज म्हणाले, ‘‘श्री विठ्ठलाच्या मूर्तीला लेपन करण्याच्या संदर्भात प्रशासन घाई का करत आहे ? ही मूर्ती ५ सहस्र वर्षे प्राचीन आहे, असे सांगितले जाते, तर मग इतकी वर्षे इतक्या भाविकांनी दर्शन घेऊनही मूर्ती कशी काय टिकली ? या मूर्तीची यापूर्वी का झीज झाली नाही ? यापूर्वी कोणत्याही प्रकारचे रासायनिक लेपन केलेले नसतांना मूर्तीची हानी का झाली नाही ? रासायनिक लेपन करण्यास वारकरी संप्रदायाचा तीव्र विरोध असून प्रशासन मूर्तीकडे दगड म्हणून का पहात आहे ? ही मूर्ती म्हणजे वारकर्यांसाठी साक्षात् पांडुरंग आहे.’’
ह.भ.प. हनुमंत वीर महाराज पुढे म्हणाले, ‘‘या संदर्भात रासायनिक लेपन सोडून आयुर्वेदाची पद्धत, वैदिक पद्धत किंवा अन्य सर्व गोष्टींचा सर्व प्रकारे प्रशासन विचार करण्यास का सिद्ध नाही ? आम्ही २ दिवसांत बल्लारी येथून मूर्ती अभ्यासक बोलावू शकतो, तर प्रशासन देशातील सर्वाेत्तम मूर्ती अभ्यासकांना का बोलावत नाही ? या ठिकाणी दगडपांसून लेपन करणारे तज्ञ उपस्थित आहेत, त्यांचा सल्ला शासन का घेत नाही ? प्रशासन मूर्तीला परत परत लेपन करायला लागू नये म्हणून यावर ठोस उपाययोजना काढत नाही ? प्रशासन जर रासायनिक लेपनावर ठाम असेल, तर प्रसंगी आम्हाला न्यायालयाचे दार ठोठावावे लागेल.’’

या प्रसंगी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर संरक्षण कृती समितीचे सदस्य श्री. गणेश लंके म्हणाले, ‘‘कोरोना महामारीच्या काळात मंदिरात दर्शन पूर्णत: बंद होते. असे असतांना त्या काळात देवीच्या मूर्तीच्या पायाला खड्डा पडला ? तो कसा पडला ? त्यामुळे आता कोणत्याही प्रकारचे लेपन करण्यापूर्वी त्याचे दायित्व निश्चित करण्यात यावे.’’
या बैठकीसाठी बल्लारी येथून उपस्थित असलेल्या भक्त पुंडलीक यांचे वंशज आशीर्वाद हे उपस्थित होते. ते म्हणाले, ‘‘आम्ही आयुर्वेदाच्या पद्धतीने मूर्तीला लेपन करतो. यात २७ प्रकारची फळे, आयुर्वेदीय औषधे, तसेच विविध प्रकारच्या वनस्पती यांचा समावेश असतो. वर्ष २०१४ मध्ये याच मूर्तीवर आम्ही हे लेपन केलेले आहे. आम्ही करत असलेल्या लेपनामुळे कधीही आताच्या रासायनिक लेपनाप्रमाणे खड्डे पडत नाहीत. मूर्तीवर जे १६ प्रकारचे उपचार केले जातात, त्यामुळे मूर्तीची कोणत्याही प्रकारची झीज होत नाही.’’
सोलापूरचे जिल्हाधिकारी तथा मंदिरे समितीचे अध्यक्ष कार्तिकेयन म्हणाले, ‘‘भारतातील एकमेव असे मंदिर आहे जिथे भाविकांना पददर्शन घेता येते. मूर्ती दीर्घकाळ टिकावी यासाठी तिचे जतन आणि संवर्धन करणे अत्यावश्यक आहे. वज्रलेप करण्याविषयी तज्ञांनी त्यांची मते मांडली असून ‘लेपनाची कोणती पद्धत वापरायची ?’ याविषयी पुरातत्व विभागाचा सल्ला घेऊन २ ते ३ दिवसांत निर्णय घेण्यात येईल. प्रतिदिनच्या नित्योपचारात दही, दूध, मध यांसारख्या पदार्थांचा वापर होत असल्याने मूर्तीच्या आतील बाजूस काही हानी झाली का ? याची पडताळणी करण्यासाठी ‘लायडार स्कॅन’ करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला; मात्र ‘स्कॅनिंग’मुळे मूर्तीला हानी होऊ शकते का ?, याचा अभ्यास करूनच निर्णय घेण्यात येईल. यासाठी केंद्र शासनाची अनुमती आवश्यक आहे.’’
मंदिरे समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर म्हणाले, ‘‘श्रीविठ्ठलाची मूर्ती स्वयंभू असून वारकरी भाविकांचा श्वास आहे. मूर्तीचे जतन आणि संवर्धन मंदिरे समितीच्या वतीने पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येईल. वज्रलेप करण्यास समितीचा विरोध नाही; मात्र सर्व महाराज मंडळी आणि तज्ञ यांच्या सामोपचाराने निर्णय घेतला जाईल.’’
| बैठकीत पद्मश्री पुरस्काराने सन्मानित तज्ञ एस्. सुब्रमण्यम् ‘ऑनलाईन’ पद्धतीने जोडले होते. त्यांनी वर्ष १९८८ मध्ये अशाच प्रकारचे रासायनिक लेपन केले होते. ‘हे लेपन नंतर निघाले’, असे त्यांनी बैठकीत सांगितले. |
अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा अटकेत !
आपत्कालीन परिस्थितीसाठी नवी मुंबई महानगरपालिका परिवहन सिद्ध !
जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या वारीसाठी नवीन रथ
सोमवती अमावास्येच्या भाविकांसाठी सजला जेजुरीतील ‘श्री खंडोबा गड’ !
रिक्शाचालकाने मीटरपेक्षा अधिक भाडे आकारल्यास तक्रार करा ! – पुणे शहर वाहतूक शाखा
बिनखांबी गणेश मंदिर ते महाद्वार चौक परिसरात महापालिकेची अतिक्रमण निर्मूलन कारवाई !